(जुन्नर):- देशभर कोरोनाने हाहाकार माजवला आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर जुन्नर नगरपरिषद हद्दीतील व्यावसायिक आस्थापनांनी कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी तोंडावर मास्क घालणे बंधनकारक केले आहे.
जुन्नर नगरपरिषद क्षेत्रात रहिवासी असलेल्या व कामानिमित्त जुन्नर शहरात येणाऱ्या नागरिकांनी, जुन्नर शहरात सार्वजनिक ठिकाणी वावरताना कोणीही रस्त्यावर अथवा सार्वजनिक ठिकाणी फिरत असताना, थांबलेले असताना, गाडी चालवीत असताना मास्कचा वापर करण्याचे आवाहन जुन्नर नगरपरिषदेने केले आहे.
जे नागरिक मास्कचा वापर न करता सार्वजनिक ठिकाणी फिरत असताना, थांबलेले असताना, गाडी चालवीत असताना आढळून आल्यास त्या व्यक्ती कडून ५०० ते १ हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येणार आहे. त्याच बरोबर सार्वजनिक ठिकाणी पान, तंबाखू, गुटखा खाऊन किंवा त्याशिवाय थुकल्यास ५०० ते १ हजार रुपयांपर्यंत नगरपरिषदेच्या आरोग्य निरीक्षक यांच्या अधिनस्त नेमण्यात आलेल्या पथकामार्फत आपणावर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा जुन्नर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी डॉ. जयश्री काटकर बोराडे यांनी दिला आहे.