Sunday, May 12, 2024
Homeजुन्नरअबब! तब्बल "इतक्या" कोटींचा जुन्नर तालुका पर्यटन विकास आराखडा

अबब! तब्बल “इतक्या” कोटींचा जुन्नर तालुका पर्यटन विकास आराखडा

जुन्नर : ‘‘जुन्नर तालुक्याच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी डीपीआर (अंदाजपत्रक) त्वरित तयार करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पर्यटन विभागाला दिले आहेत. तालुक्यातील पर्यटन विकासाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी राज्य शासनाकडून सुमारे 2 हजार कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. टप्प्याटप्प्याने पुढील पंधरा वर्षात विकास कामे पूर्ण होऊन पर्यटनाने परिपूर्ण तालुका असा जुन्नर तालुक्याचा राज्यात नावलौकिक होईल, अशी माहिती आमदार अतुल बेनके यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आरोग्य, दळणवळण, पर्यटन या संदर्भातील विकास कामांना मंजूर झालेल्या निधीबाबत माहिती देण्यासाठी आमदार बेनके यांनी नारायणगाव येथे रविवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार उपस्थित होते. 

यावेळी आमदार बेनके म्हणाले, ‘‘जुन्नर तालुक्याला पर्यटन दर्जा मिळाला, मात्र त्यानंतर कोणत्याही तांत्रिक बाबी पूर्ण न झाल्याने निधी उपलब्ध झाला नाही. अजित पवार यांनी डीपीआर त्वरित तयार करण्याचे आदेश पर्यटन विभागाला दिल्याने या कामाला चालना मिळाली आहे. या संदर्भात प्राथमिक चर्चा करण्यासाठी जुन्नर येथे नुकतीच वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक माझ्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीला पर्यटन संचालन विभागाच्या उपसंचालिका क्षमा पवार, तहसीलदार रवींद्र सबनीस, पुरातत्त्व, महसूल, वन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या वेळी तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींच्या सरपंचांना निमंत्रित केले होते.’

आमदार बेनके म्हणाले, ‘‘पहिल्या टप्प्यात किल्ले शिवनेरीसह तालुक्यातील वीस पर्यटनस्थळे विकसित करण्यात येणार आहेत. या ठिकाणी नाम फलक, दिशादर्शक फलक, क्यूआर कोडद्वारे सर्व माहिती पर्यटकांना उपलब्ध होणार आहे. पर्यटनाची थ्रीडी तयार केली जाणार असून, पर्यटकांना गाइड शिवाय पर्यटनस्थळाची माहिती क्यूआर कोड स्कॅन करून मिळणार आहे. पर्यटकांना तालुक्यातील नैसर्गिक, धार्मिक, ऐतिहासिक, सजीव सृष्टी आदींची माहिती क्यूआर कोडद्वारे उपलब्ध होणार आहे.’’

पर्यटनस्थळांची माहिती संकलित करण्यासाठी तालुक्यातील सर्व सरपंच, ग्रामसेवक, पर्यटन क्षेत्राशी संबंधित यंत्रणेची मदत घेण्यात येणार आहे. संकलित माहिती तहसीलदारांकडे सादर केली जाईल. त्यांच्यामार्फत कन्सल्टंट यांना ही माहिती दिली जाईल. ६ जानेवारीपर्यंत कन्सल्टंटद्वारे तालुक्यातील पर्यटनस्थळांची माहिती संकलित केली जाणार आहे. त्यानंतर पर्यटनस्थळांचा डेटा तयार केला जाईल. पर्यटन विकासासाठी पहिल्या टप्प्यात 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार असल्याचेही आमदार बेनके म्हणाले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय