जुन्नर : जुन्नर तालुक्यातील केळी-माणकेश्वर येथील प्राथमिक शाळेला काही महिन्यांपूर्वी तार कंपाउंड बसविण्यात आले होते. मात्र गेल्या आठवड्यात शाळेचे प्रवेशद्वारच चोरीला गेल्याची गजब घटना घडली आहे.
केळी-माणकेश्वर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला काही महिन्यांपूर्वी ग्रामपंचायतच्या माध्यमातून तार कंपाउंड बसविण्यात आले होते. हे काम ठेकेदार ऋषिकेश जोशी यांनी पूर्ण करून ग्रामपंचायतमध्ये तशी नोंद केलेली आहे. परंतु ठेकेदार आणि कामगार यांच्यातील अंतर्गत आर्थिक व्यवहारामूळे सदर कामगाराने शाळेच्या कंपाउंडचे प्रवेशद्वार चोरून नेल्याचे ग्रामस्थ सांगतात.
ठेकेदार आणि ग्रामसेविका यांनी ढकलली एकमेकांवर जबाबदारी
याबाबत “महाराष्ट्र जनभूमी”ने ग्रामसेविका डिंपल विरणक यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी “ठेकेदार ऋषिकेश जोशी यांना प्रवेशद्वार पुन्हा बसवण्याचे सांगितले असल्याची माहिती दिली” तर ठेकेदार ऋषिकेश जोशी यांनी सरपंच रामा भालचिम आणि ग्रामसेविका डिंपल विरणक यांना घटनेचा पंचनामा करून चोरी करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी केल्याचे सांगत प्रवेशद्वाराचे काम पूर्ण झाले असल्याने पुढील जबाबदारी ग्रामपंचायतची असल्याचे सांगितले. त्यामुळे ठेकेदार आणि ग्रामसेविका यांनी एकमेकांवर जबाबदारी ढकलत असल्याचे निदर्शनास येत आहे.
दरम्यान, स्थानिक नागरिकांनी ग्रामपंचायतीला वेळोवेळी सांगूनही ग्रामपंचायत मार्फत अद्याप कोणत्याही प्रकारचा पंचनामा किंवा पोलीस तक्रार करण्यात आली नाही. त्यामुळे या प्रकरणावर तात्काळ कारवाई न झाल्यास वरिष्ठ पातळीवर याबाबत कळविण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे.