Thursday, December 26, 2024
Homeविशेष लेखविशेष लेख : आंतरराष्ट्रीय फळ आणि भाजीपाला वर्ष : मानवाला सुधारण्याची एक...

विशेष लेख : आंतरराष्ट्रीय फळ आणि भाजीपाला वर्ष : मानवाला सुधारण्याची एक संधी – नवनाथ मोरे

युनायटेड नेशन्स (UN) च्या जनरल असेंब्लीने २०२१ हे वर्ष आंतरराष्ट्रीय फळ आणि भाजीपाला वर्ष (आयवायएफव्ही) वर्ष जाहीर केले आहे. युनो’ला आतंरराष्ट्रीय फळ आणि भाजीपाला वर्ष साजरे का करावे वाटले असे? याचा मागोवा…

बदलते वातावरण आणि मानवापुढे येऊ घातलेली आव्हाने यानिमित्ताने विचारत घेणे गरजेचे आहे. मानवी पोषण, अन्न सुरक्षा आणि आरोग्यामध्ये तसेच युनायटेड नेशन्स ची शाश्वत विकासाची लक्ष्ये साध्य करण्यासाठी, फळ आणि भाज्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेविषयी जागरूकता वाढवणे, तसेच धोरण निर्देशित करणे; फळे आणि भाज्यांच्या वापराद्वारे विविधता, संतुलित आणि निरोगी आहार आणि जीवनशैलीचा प्रचार करणे; फळे आणि भाज्या अन्न प्रणालीतील तोटा आणि कचरा कमी करणे, यासाठी हे वर्ष साजरे केले जात आहे. 

मानवी आहारात फळे व पालेभाज्यांंना अनन्यसाधारण महत्त्व आहे. एकल पिक पध्दतीने मोठ्या प्रमाणावर एकच पिक घेतले जाते. उदा. पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर ऊसाची लागवड केली जाते. परंतु कुटुंबाच्या, स्थानिक जनतेला पोषक असे अन्नधान्य मोठ्या प्रमाणावर एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात आयात करावे लागते. एकल पिक पध्दतीमुळे जमीनचा पोत दिवसेंदिवस घसरत चालेला आहे. सातत्याने ऊसाचे पिक घेतल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यामध्ये अनेक जमीनी क्षारपड झालेल्या आहे. त्यामुळे विविध पिके घेत असताना निसर्गाचे चक्र संतुलित राखण्याचा प्रयत्नही करणे तितकेच गरजेचे आहे. 

हे वर्ष साजरे करत असताना मानवी जीवनातील फळे आणि भाजीपाल्याचे महत्त्व अधोरेखित करणे गरजेचे आहे. 

फळांचे आहारामधील महत्त्व : 

आहारात विविध प्रकारच्या फळांच्या समावेशाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. फळांमध्ये ९० ते ९५ टक्के शुद्ध पाणी असते. त्याने रक्ताचे शुद्धीकरण होते. शरीराची अंतर्गत स्वच्छता करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य फळातील पाणी करू शकते. फळांमध्ये मोठ्या प्रमाणात ‘तंतुमय’ म्हणजे चोथायुक्त पदार्थ असतात. तंतुमय पदार्थांनी आतड्यांच्या स्नायूंचे आकुंचन – प्रसरण चांगले झाल्याने मलप्रवृत्ती चांगली होऊन मलविसर्जन क्रिया सुलभ, सुकर होते. शौचास साफ होते, तसेच अपचन होत नाही किंवा अपचनाने पोटात दुखणे, बद्धकोष्ठता, मलावरोध, आतड्यांना व्रण निर्माण होणे इत्यादी विकार जडत नाहीत.

आवळा, लिंबू, संत्री, मोसंबी आणि अन्य काही फळात ‘क’ जीवनसत्व मोठ्या प्रमाणात आढळते. सर्दी कमी करण्यास ‘क’ जीवनसत्व उपयुक्त ठरते. फळात जीवनसत्वे, आम्ले आणि संप्लवनशील तेले (व्होलाटाईल ऑईल्स) असतात. व्होलाटाईल तेलामुळे चांगली भूक लागण्यास मदत होते. आंबा, कलिंगड, चेरी आणि अन्य काही फळात ‘बीटा कॅरॉटीन’ नावाचे द्रव्य असते.

आरोग्य तज्ञांच्या मतानुसार या द्रव्यामुळे कर्करोगापासून बचाव होऊ शकतो. फळात 10 ते 15 टक्के मिनरल्स म्हणजेच खजिनद्रव्ये म्हणजेच धातू , अधातू , क्षार असतात. 

या खजिनद्रव्यात सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, गंधक, फॉस्फर या धातू मूलद्रव्याचा समावेश होतो. कॅल्शियममुळे हाडांना बळकटी येते. दातांचे आरोग्य चांगले राहते. रक्तात योग्य प्रमाणात कॅल्शियम नसल्यास माणसे चिडक्या स्वभावाची बनतात. मॅग्नेशियम मेंदूचे आरोग्य चांगले ठेवण्यास उपयुक्त ठरते. रक्तातील लोहाचे प्रमाण कमी झाल्यास व्यक्तीचा उत्साह मंदावतो. माणसास थकवा जाणवतो. रक्तातील सोडियम अन्नपचनाला मदत करते. पोटॅशियममुळे जखमांच्या वेळी रक्त थिजण्याच्या (क्लॉटिंग) क्रियेला मदत होते. थिजण्याच्या सक्षम क्रियेमुळे रक्तस्त्राव जास्त होत नाही. पोटॅशियम यकृताला उत्तेजित करते. आयोडीनमुळे कंठस्थ ग्रंथीचे आरोग्य चांगले राहते. त्यायोगे थायरॉईड ग्रंथीच्या संबंधित विकार जडू शकत नाहीत. सर्वसमावेषक संतुलित आहारामध्ये सर्व प्रकारच्या फळांचा, मोसमी किंवा बिगरमोसमी , त्याचबरोबर बदाम, पिस्ते, काजू, अक्रोड, चारोळी, इ . ड्रायफ्रुटसचा समावेश असणे अगत्याचे आहे. विविध फळांमध्ये केळी, डाळिंब, अंजीर, करवंदे, जांभूळ, चिकू, इत्यादी अनेक प्रकारची फळे समाविष्ट होतात. ज्या आहारात फळांचा समावेश अधिक त्या आहाराला संरक्षक आहार म्हणून संबोधले जाते . 

फळे हि मानवी जीवनाला लाभलेले ‘वरदान’ आहे . ‘फलाहार’ हा उत्तम आहार आहे. निसर्ग फळांच्या माध्यमातून मानवी आरोग्याचे रक्षण करतो. फलाहाराकडे सकारात्मक दृष्टीने पाहून आपल्या आहारात योग्य ते बदल घडविण्याची जिद्द बाळगण्याची गरज आहे.

पालेभाज्यांचे आहारातील महत्त्व : 

औषधीय वनस्पतीच्या ताज्या व खाद्य भागांना भाजीपाला ही संज्ञा आहे. खाद्य भागांत मूळ, खोड, पाने, फुले व फळे यांचा समावेश होतो. हे खाद्य भाग ताज्या स्थितीत अगर त्यांवर प्रक्रिया करून खाण्यासाठी वापरण्यात येतात. तसेच बांबूच्या झाडांचे कोवळे अंकूरही काही लोक भाजीसाठी वापरतात. भारतात एकूण लागवडीखालील क्षेत्रापैकी फक्त २.५ % क्षेत्र भाजीपाला पिकाखाली आहे. महाराष्ट्रात ते १.६ % आहे. नाशिक, पुणे व सातारा या तीन जिल्ह्यांत भाजीपाल्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. इतर कोणत्याही कृषि व्यवसायापेक्षा भाजीपाल्याच्या लागवडीपासून जास्त उत्पन्न मिळते. एकाच शेतात वर्षातून एकापेक्षा जास्त पिके घेता येतात व त्यामुळे कुटुंबातील पोषण आहार उत्तम होऊ शकतो. 

मनुष्याच्या आहारात भाजीपाल्याला महत्त्वाचे स्थान आहे. मांस, चीज व इतर अन्नपदार्थांच्या पचनामध्ये तयार होणारी आम्लता नाहिशी करते. त्यातील चोथ्यामुळे अन्नपचनास मदत होते व बद्धकोष्ठता जडत नाही. भाजीपाल्यात खनिज द्रव्ये असतात. कॅल्शियम, फॉस्फरस व लोह ही खनिज द्रव्ये बटाटे, रताळी व कांदे यांत विशेष प्रमाणात असतात. भाजीपाल्यांतील जीवनसत्तवांमुळे त्याला विशेष महत्त्व आहे. हिरव्या व पिवळ्या रंगाच्या भाज्यांत ‘अ’ आणि ‘क’ ही जीवनसत्त्वे विशेष प्रमाणात असून ‘ब’ गटातील जीवनसत्त्वेही आढळून येतात. काही भाज्यांंचा औषधी म्हणून उपयोगी असतात. आहारात दर माणशी दररोज कमीत कमी २८५ ग्रॅम. भाजीपाला असावा आणि त्यापैकी ११५ ग्रॅम. पालेभाज्या असाव्यात, असे आहारशास्त्रज्ञांचे मत आहे. परंतु भारतातील भाजीपाल्याचा वापर यापेक्षा फार कमी आहे.  

किटकनाशकांचा अतिरेकी वापर :

फळे आणि पालेभाज्या मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. पुर्वीच्या काळी लोकसंख्या मर्यादित होती. नैसर्गिक संसाधने मोठ्या प्रमाणात उपलब्ध होती. सेंद्रिय घटकांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात होता. लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असताना मोठ्या प्रमाणावर अन्नधान्याची गरज निर्माण होऊ लागली. मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेण्यासाठी अतिरिक्त मुलद्रव्याची गरज निर्माण झाली. सेंद्रिय घटक कमी होऊन रासायनिक खतांचा वापर वाढला गेला. जनावरे कमी झाल्यामुळे शेण कमी झाले, त्यामुळे शेतामध्ये शेणखतांचे प्रमाणात घटले. त्यामुळे रासायनिक खताचा वापर वाढल्यामुळे जमिनीचा कस कमी झाला. वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्य पुरविण्यासाठी जास्त उत्पादन देणारी पिकांची वाण निर्माण केली गेली. परंतु वाणांची रोगप्रतिकारशक्ती कमी झाली आणि मोठ्या प्रमाणावर किटक, रोगांंचा प्रादुर्भाव झाल्यामुळे अतिरिक्त किटकनाशक, रोगनाशकाचा वापर वाढला. भारतासह जगातील अनेक देशांंनी असंख्य किटकनाशकांंच्या वापरावरती बंदी घातली आहे. जगभरात डीडीटी, एचसीएच या किटकनाशकांवर बंदी घातली असली तरी त्याचे उत्पादन आजही सुरू आहे  भारतामध्ये बंदी असली तरी विक्री मात्र आजही आहे. रासायनिक खतांच्या अतिरिक्त वापरामुळे मानवीची रोगप्रतिकारशक्ती कमी झाली, त्यामुळे मानवी आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होत आहे. 

पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी शेतकरी रासायनिक औषधांची फवारणी करीत असतात. अनेकदा फवारणीचा अतिरेक होतो. त्याचे दुष्परिणाम आज संपूर्ण जग भोगत आहे. शेतकरी जे कीटकनाशक फवारतात, त्यापैकी केवळ एक टक्का फवारणी ही कीटकांना मारण्यासाठी उपयोगात येते. बाकी ९९ टक्के फवारणीचे अंश हे हवेत, भूगर्भातील पाण्यात, जमिनीवरच्या मातीत मिसळतात. यामुळे पृथ्वीवरील प्रदूषण वाढते आहे. कीटकनाशकांमध्ये जे विष असते, त्या विषामुळे जगभरातील २५ लाख लोक दरवर्षी प्रभावित होतात आणि त्यातले किमान सव्वादोन ते अडीच लाख लोक मृत्युमुखी पडतात. गतकाळात कीटकनाशकांच्या फवारणीमुळे यवतमाळ जिल्ह्यात फवारणी करताना श्वासावाटे शरीरात गेलेल्या विषामुळे अनेक शेतकरी मृत्युमुखी पडले होते. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात  दिवसेंदिवस कॅन्सरचे रुग्ण वाढताना दिसत आहेत.

फळे आणि भाजीपाला पिकवताना मोठ्या प्रमाणावर किटकनाशकांचा वापर केला जातो. उदाहरणार्थ मी ग्रामीण जागरूकता कामाचा अनुभव (Rural Awareness Work Experience – RAWE) साठी सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यात ६ महिन्यासाठी होतो. तेथील शेतकऱ्यांचे निरिक्षण करता आढळले की, मोठ्या प्रमाणावर रोग आणि कीटकांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औषधांची फवारणी केली जाते. एक दिवसाआड एक फवारणी केली आत होती. विशेष म्हणजे शेतकऱ्यांकडे औषधांच्या छोट्या स्टोअर रुम होत्या. इतक्या मोठ्या प्रमाणावर वापर केला जात होता. यातून हेच दिसते की अतिरेक वापरामुळे मानवी आरोग्य धोक्यात आले आहे. विशेषतः भाजीपाल्यावर अतिरिक्त किडकनाशकाचा वापर होत असल्याचे संशोधनातून दिसून आले आहे. त्यामुळे अतिरिक्त किटकनाशक, रोगनाशकाचा वापर थांबून मानवाला पोषक आणि आरोग्यदायक अन्न पुरवणे हे उद्दिष्ट गाठणे गरजेचे आहे. अन्यथा जिवंतपणी आपल्याच पाल्याला आपण विष देत आहोत, हे विसरून चालणार नाही. 

फळे व भाजीपाल्याच्या उपयुक्ततेविषय जागरूकता वाढवणे गरजेची 

फळे व भाजीपाल्याच्या उपयुक्त आणि त्यातील पोषक घटकांबाबत अजून ग्रामीण भागात खूप अज्ञान आहे. एकूणच अन्नधान्याबाबत ग्रामीण भागातील जनतेमध्ये जागृकता वाढविणे गरजचे आहे. अन्नधान्यातील पोषण घटकांची माहिती जनतेला झाल्यास कुपोषण, तसेच विविध व्हिटॅमिनची असलेली कमतरता भरुन काढण्यास मदत होईल. महाराष्ट्रातील विविध प्रदेशाचा विचार केला तर ग्रामीण भागातील लहान मुले आणि महिलांमध्ये व्हिटॅमिनची कमतरता जाणवते. परंतु त्या बाबतीत जागृकता वाढविण्यात प्रशासन अयशस्वी ठरले आहे.

कृषी विद्यापीठांतील शिक्षण पध्दतीची कमतरता :

कृषी शिक्षण काळाची गरज आहे. परंतु कृषी विद्यापीठे ही कमतरता पुर्ण करु शकले नाहीत. शासकीय विद्यापीठ दुय्यम ठरली असून खाजगी बी-बियाणे, किटकनाशक कंपन्यांचा बाजारात सुळसुळाट झालेला दिसतो. कृषी विद्यापीठातील बि – बियाणे, किटकनाशके शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात शासकीय यंत्रणा पुर्नत: निष्फळ ठरली आहे. कृषी विद्यापीठे हे तंत्रज्ञान शोधण्यापेक्षा आणि सेंद्रिय शेतीचा प्रसार करण्यापेक्षा कोणते खत वापरावे, कोणते कीटकनाशक वापरावे, बाजारात बीयाणे मिळते हे सांगणारी आणि सल्ले देणारी खाजगी कंपन्यांची केंद्र तर बनली नाही ना ? हा प्रश्न निर्माण होतो. कोणत्याही जिल्ह्यात कृषी विद्यापीठाने तयार केलेल्या पिकाचे वाण मिळत नाही, ही मोठी शोकांतिका बनलली आहे. त्यामुळे कृषी शिक्षणातील पठडीबाज, पारंपरिक आणि जुनाट शिक्षण पध्दती बदल करुन बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे. अन्यथा कृषी शिक्षणाची पदवी घेऊ शकेल, परंतु नवतंत्रज्ञान ग्रामीण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवू शकणार नाही.

साठवण क्षमता निर्माण करण्याची गरज 

फळे आणि भाजीपाल्याची साठवण क्षमतेची आजही कमतरता आहे. शासन अनुदान देत असले तरी त्यामध्ये. वाढ होऊ शकली नाही. खाजगी साठवण गृहे, तसेच शीतगृहे उभी करण्यात आली असली तरी सामान्य शेतकऱ्यांना ती परवडणारी नाहीत. फळे, भाजीपाल्याचे दरामध्ये घसरण झाल्यामुळे हजारो क्लिंटल माल फेकून द्यावे लागते. त्यामुळे साठवण क्षमता वाढविणे आणि शेतमालाला हमीभाव मिळण्यासाठी शासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. सध्या सुरु असलेले ‘शेतकरी आंदोलन’ शेतकरी पिचला जात असल्याचे उदाहरण आहे. शेतकरी आंदोलन बदलाची नांदी ठरु शकेल.

शाश्वत शेती काळाची गरज ! 

बदलते हवामान आणि पर्यावरणीय संकटे लक्षात घेतात. शाश्वत शेती काळाची गरज आहे. शाश्वत विकासाच मानवाला तारु शकेल. अन्यथा विनाशाकडे घेऊन जाणारा विकास आपला ही विनाश करेल. त्यासाठी हळूहळू रासायनिक खतांचा वापर करुन सेंद्रिय शेतीचा वापर वाढविणे गरजेचे आहे. त्यातून पोषक मूल्य मानवाला देऊ शकू. आंतरराष्ट्रीय फळ आणि भाजीपाला वर्ष निश्चितपणे मानवाला सुधारण्याची एक संधी ठरेल यात शंका नाही.

– नवनाथ मोरे

– 9921976460

– जुन्नर 

(लेखक हे पर्यावरणाचे अभ्यासक असून स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) चे राज्य सचिव मंडळ सदस्य आहेत.)

संबंधित लेख

लोकप्रिय