FILE |
धडगांव : देवमोगरा मेडिकल धडगांव येथे मुदतबाह्य औषधांची विक्री करणाऱ्या औषधविक्रेत्यावर गुन्हा दाखल करून अटक करा व तात्काळ परवाना रद्द करा, अशी मागणी बिरसा क्रांती दलाचे अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंञी राजेश टोपे, अन्न औषध पुरवठा मंञी छगन भुजबळ, जिल्हाधिकारी नंदुरबार राजेंद्र भारूड यांच्या कडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, धडगांव या आदिवासी तालुक्यात देवमोगरा मेडिकल व जनरल स्टोअर्स दुकानात औषधविक्रेत्याने मुदतबाह्य औषधे विक्री केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने या दुकानाची 61 दिवस परवाना रद्दची कारवाई केली होती. परवाना निलंबित कालावधी सुरू असतानाच 18 मार्च रोजी सदर औषधविक्रेते यांनी मंत्रालयात जाऊन वशिल्याने परवाना स्थगिती आदेश आणला आहे. आदेशाची अंमलबजावणी सुरू होणार असतानाच पुन्हा दुसऱ्याचा याच औषधविक्रेत्याने मुदतबाह्य औषधे विक्री केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
यापूर्वीही मुदतबाह्य औषधे विक्री केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाकडे सहाय्यक आयुक्त यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीनुसार अन्न व औषध प्रशासन धुळे यांनी सदर दुकानाचा 61 दिवस परवाना रद्द केला होता. या आदेशा विरोधात राज्य आरोग्य मंत्री यांच्याकडे अपिल दाखल करून दुकानदाराने स्थगिती आदेश मिळवला. हा आदेश 2 फेब्रुवारी पासून सुरु झाला. याच कालावधीत सुरवाणी तालुका धडगांव येथील एका ग्राहकाला मुदतबाह्य त्वचारोगाचे औषध विक्री केल्याचा प्रकार घडला आहे. औषधावर सन 2019 ची अंतिम तारीख होती. याबाबत तक्रार दाखल करण्यात आली असून अन्न व औषध प्रशासनाने पुन्हा या प्रकरणाची चौकशी करत पाहणी केली आहे. मात्र अद्याप संबंधित औषधं विक्रेत्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही.
या औषध विक्रेत्यांकडून वारंवार मुदतबाह्य औषधे विक्री होत असल्यामुळे धडगांव येथील गरीब व अडाणी लोकांची फसवणूक होऊन आरोग्याशी खेळले जात आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर असून मुदतबाह्य औषधाच्या वापराने रोगी व ग्राहकांवर विपरीत परिणाम होऊन लोकांचा जीव जाऊ शकतो. तेव्हा गरीब व अडाणी लोकांच्या आरोग्याशी खिलवाड करणाऱ्या देवमोगरा मेडिकल व जनरल स्टोअर्स धडगांव तालुका धडगांव जिल्हा नंदुरबार या दुकानातील औषधविक्रेत्यावर गुन्हा दाखल करून अटक करा व तात्काळ दुकानाचा परवाना रद्द करा. अन्यथा या विरोधात बिरसा क्रांती दल सह इतर आदिवासी संघटना तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा बिरसा क्रांती दलाचे अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांनी दिला आहे.