Wednesday, May 8, 2024
Homeविशेष लेखविशेष लेख: हिमालयाची सावली; त्यागमूर्ती माता रमाई जयंती

विशेष लेख: हिमालयाची सावली; त्यागमूर्ती माता रमाई जयंती

आज ७ फेब्रुवारी, भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाई यांची जयंती. ७ फेब्रुवारी १८९७ रोजी माता रमाई यांचा जन्म एका गरीब कुटूंबात झाला.त्यांच्या वडिलांचे नाव भिकू धोत्रे (वलंगकर) तर आईचे नाव रुक्मिणी असे होते. दाभोळजवळील वनंदगावात नदीकाठी महारपुरा वस्तीमध्ये त्या राहत होत्या. त्यांना तीन बहिणी व एक भाऊ होता. त्यांचे वडील दाभोळ बंदरात माशांनी भरलेल्या टोपल्या पोहचवत असत. रमाई लहान असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले. काही दिवसांनी वडिलांचेही निधन झाले. लहान वयातच आई वडिलांचे छत्र हरपल्याने कोवळ्या रमाईच्या मनावर मोठा आघात झाला. आई वडिलांविना पोरक्या झालेल्या या भावंडांना वलंगकर काका व गोविंदपूरकर मामा यांनी मुंबईला आणले. मुंबईतील भायखळा मार्केटच्या चाळीत ते राहू लागले.


त्याच सुमारास सुभेदार रामजी आंबेडकर हे आपल्या भीमरावसाठी मुलगी पाहत होते. वलंगकारांकडे लग्नाची मुलगी असल्याचे त्यांना समजले. सुभेदार रामजी आंबेडकर यांनी रमाईला पाहिले. रमाईला पाहता क्षणिच सुभेदाराने तिला आपल्या भीमरावासाठी पसंत केली. रमाई आणि भीमराव यांचा भायखळ्याच्या मार्केटमध्ये विवाह झाला. विवाहाप्रसंगी बाबासाहेबांचे वय चौदा तर रमाईचे वय नऊ वर्ष होत. त्यावेळी बाल विवाहाची प्रथा समाजात रूढ होती. लग्नात पंच पक्वान्ने नव्हती. झगमग रोषणाई नव्हती. अतिशय साध्या पद्धतीने हा विवाह पार पडला. माता रमाईला जीवनात अनेक दुःखे सहन करावी लागली.



१९२३ साली बाबासाहेब लंडनला गेले. त्यावेळी रमाईची खुप वाताहत झाली. ती दुष्काळाच्या आगीत होरपळत होती. बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांना त्यांचे हाल पहावले नाही त्यांनी काही पैसे जमा केले व ते पैसे रमाईला देऊ केले. त्यांनी कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर केला मात्र पैसे स्वीकारण्यास नम्रपणे नकार दिला. रमाई या बाबासाहेबांप्रमाणेच स्वाभिमानी होत्या. माता रमाई या आयुष्यभर दुःखाशी, गरीबीशी जिद्दीने झगडत होत्या मात्र हार मानत नव्हत्या. मृत्यूसत्र, दुःख, त्याग, समजूतदारपणा , कारुण्य, उदंड मानवता आणि मृत्यू यांचे सर्जनशील ज्वलंत प्रेरणास्थान म्हणजे माता रमाई. रमाईने अनेक दुःखे झेलली. त्यांच्या इतके मरण कोणीही पाहिले नसेल. लहान वयातच आई वडिलांचा मृत्यू, १९१३ साली सासरे शुभेदार रामजी आंबेडकर यांचा मृत्यू, बाबासाहेबांचे मोठे बंधू आनंदराव, त्यांचा मुलगा गंगाधर यांचा मृत्यू, १९२१ साली बाबासाहेबांचा मुलगा बाळ गंगाधर, १९२६ मध्ये राजरत्न असे अनेक मृत्यू त्यांनी पाहिले पण त्या डगमगल्या नाहीत.


पती बाबासाहेब आंबेडकर परदेशात शिकायला गेल्यावर त्या एकट्या घर चालवत होत्या. घर चालवण्यासाठी तिने शेण गोवऱ्या वेचल्या. बॅरिस्टर पतीची पत्नी शेण गोवऱ्या गोळा करते असे लोक नावे ठेवतील म्हणून त्या पहाटे लवकर उठून शेण गोवऱ्या गोळा करत. आयुष्यभर काबाड कष्ट करून त्यांचे शरीर पोखरून गेले होते. त्यामुळे त्या आजारी पडल्या. जानेवारी १९३५ पासून आजार वाढत गेला. मे १९३५ ला त्यांचा आजार विकोपाला गेला. बाबासाहेबांनी सर्व नामांकित डॉक्टरांना पाचारण केले. मात्र त्यांचे शरीर औषधोपचारांना प्रतिसाद देत नव्हते. बाबासाहेब त्यांना फळांचा ज्यूस, चहा, कॉफी पाजत. मात्र त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत नव्हती. अखेर २७ मे १९३५ रोजी रमाईची प्राणज्योत मावळली. सर्व परिसर आकांतात बुडाले. बाबासाहेबांना हे दुःख पचवणे अवघड गेले. ते रमाईच्या पार्थिवाशेजारी बसून ढसाढसा रडले. जवळ जवळ तीस वर्षे हिमालयासारख्या महामानवाला धैर्याने व प्रेमाने साथ देणारी हिमालयाची सावली सोडून गेल्याने बाबासाहेब एकाकी पडले. हिमालयाची सावली बनलेल्या त्यागमूर्ती माता रमाई यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय