Saturday, May 18, 2024
Homeराजकारणदिघंची येथील ॲट्रॉसिटी प्रकरणी विट्याचे डीवायएसपी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची दलित महासंघाची...

दिघंची येथील ॲट्रॉसिटी प्रकरणी विट्याचे डीवायएसपी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची दलित महासंघाची मागणी

(आटपाडी / प्रतिनिधी): मागासवर्गीय लोकांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन दाखल गुन्ह्यात आरोपींना अटक न करता त्यांना अभय देऊन मागासवर्गीयांना गुन्हे मागे घेण्यासाठी दबाव आणला म्हणून विटा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी  यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी दलित महासंघाचे आटपाडी तालुका अध्यक्ष बळीराम रणदिवे यांच्यासह महादेव रणदिवे व शेखर रणदिवे यांनी सांगलीच्या जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

      निवेदनात म्हटले आहे की,दिघंची येथील मागासवर्गीय महिलेवर अत्याचार करून तिला जातीवाचक शिवीगाळ केली, म्हणून सरपंच अमोल मोरे व विकास मोरे यांचे विरुद्ध गुन्हा नोंद आहे.त्याचबरोबर काही मागासवर्गीय बांधवावर आटपाडी पोलिसांनी दरोड्यासारखा खोटा व गंभीर गुन्हा नोंद केला आहे. अमोल मोरे,विकास मोरे यांच्यावरचा ॲट्रॉसिटीचा गुन्हा मागे घ्यावा,म्हणून जाणून-बुजून दबाव यावा म्हणून 18 जून रोजी रात्री आटपाडी पोलिसांनी अचानक मागासवर्गीय बांधवांना अटकसत्र राबवून अटक केली व सांगितले की तुम्ही ॲट्रॉसिटीचा गुन्हा मागे घ्या. अशा पद्धतीने विट्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी हे पक्षपाती काम करीत असून ते मागासवर्गीयांवर अन्याय करीत आहेत. ॲट्रॉसिटी गुन्ह्यातील आरोपींना अटक न करता त्यांना अभय देत आहेत. त्यामुळे कायद्यातील तरतुदीनुसार त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा दलित महासंघ व समस्त मागासवर्गीय बांधव यांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा निवेदनाद्वारे इशारा दिला आहे.

     निवेदनाच्या प्रती  महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री, सांगलीचे जिल्हा पोलीस प्रमुख, आटपाडीचे तहसीलदार, आटपाडी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांना देण्यात येत आहेत. दलित महासंघाचे आटपाडी तालुकाध्यक्ष बळीराम रणदिवे, महादेव बापू रणदिवे,शेखर सावता रणदिवे यांच्या निवेदनावर सह्या आहेत.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय