Friday, November 22, 2024
Homeआरोग्यकोरोना योध्दा : सरकारने मागण्या मान्य न केल्यास आशा व गटप्रवर्तक करणार...

कोरोना योध्दा : सरकारने मागण्या मान्य न केल्यास आशा व गटप्रवर्तक करणार बेमुदत संप ! ठाकरे सरकारला इशारा

मुंबई, दि. ३ जूूून : आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचे प्रश्न न सोडविल्यास दि. १५ जून २०२१ पासून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचा  महाराष्ट्रव्यापी बेमुदत संप करणार असल्याची माहिती आशा व गटप्रवर्तक फेडरेशनच्या महासचिव कॉ. आनंदी अवघडे यांनी दिली. तसेच महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समिती एकमताने हा निर्णय घेतल्याचेही त्या म्हणाल्या.

कॉ. आनंदी अवघडे म्हणाल्या, महाराष्ट्र राज्यात कोविड -१ ९ चा प्रार्दुभाव आटोक्यात आणण्यासाठी व मृत्युचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्य शासनाने कडक निर्बंध लागु करुन सार्वत्रिक लसीकरणाची मोहिम हाती घेतली आहे. कोविड -१९ चा प्रार्दुभाव रोखण्यासाठी सरकारने जी मोहिम हाती घेतली आहे, त्या कामामध्ये आशा स्वयसेविकांचा व गटप्रवर्तकाचा सक्तीने समावेश करण्यात आला आहे. त्यात आशांनी घरोघरी जाऊन विविध प्रकारच्या तपासण्या करून सर्व्हे करणे, त्यांचे रेकॉर्ड ठेवणे, कोरोना लसीकरण अंतर्गत कॅम्पमध्ये हजर राहून कामे करणे, इ . जबाबदाऱ्या आशा स्वयंसेविकांवर सोपविण्यात आल्या आहेत. तसेच या व्यतिरिक्त त्यांना नियमितपणे नेमुन दिलेली ७२ पेक्षा जास्त कामे करावी लागतात. सदर कामाचा बोझा आशा व गटप्रवर्तकांवर टाकल्यामुळे त्यांच्यावर शारिरिक ताण येत आहे व त्यांचे मानसिक संतुलन बिघडत चालले आहे.

तसेच मार्च २०२१ पासून ग्रामिण व शहरी भागात आशा व गटप्रवर्तकांची प्राथमिक आरोग्य केंद्र, लसीकरण केंद्र व कवारंटाईन कॅम्प येथे सकाळपासून संध्याकाळपर्यंत ८ तासांची डयुटी लावण्यात आली आहे. काही ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन आशांना कोरोना संशयित व्यक्तींची अँटीजेन टेस्ट करावी लागते. दैनंदिन लसीकरणाच्या आढाव्यापासुन शासनाच्या सर्व योजनांचा तसेच आशांनी केलेल्या सर्व्हेच्या कामाचा दैनंदिन आढावा गटप्रवर्तकांना वरिष्ठांना सादर करावा लागतो. २० ग्रामीण भेटी देण्याचे गटप्रवर्तकाचे मुळ काम आहे. परंतु त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र व क्वारंटाईन कॅम्पमध्ये ८ ते ९ तास काम करावे लागते. त्यामुळे त्यांच्यावर कामाचा आत्यंतिक बोझा पडत असल्याचे अवघडे म्हणाल्या

अवघडे पुढे म्हणाल्या, आशा स्वयंसेविकांच्या कामाच्या वेळा लवचिक असुन त्यांनी आपले घरदार सांभाळून आठवडयातून चार दिवस २ ते ३ तास काम करावे, असे त्याच्या सेवाशर्तीमध्ये नमूद करण्यात आले आहे . परंतू त्यांना रविवारसह आठवडयातील सातही दिवस सुमारे आठ तास काम करावे लागते. त्यांच्याकडून हे काम विनामोबदला करुन घेण्यात येते. आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांची परिस्थिती वेठबिगारी व गुलाम सदृश झाली आहे . कोणाकडूनही विनामूल्य काम करून घेण्यामुळे घटनात्मक तरतुदींचा भंग होतो, असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

आशा व गटप्रवर्तकांच्या मागण्या पुढीलप्रमाणे :

१. महाराष्ट्र सरकारने आशा व गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा दयावा, तसेच ही मागणी मान्य होईपर्यंत आशा स्वयंसेविकांना १८००० रुपये व गटप्रवर्तकांना २२००० रुपये प्रतिमहा वेतन देण्यात यावे. 

२. सर्व नगरपालिकांतील आशा स्वयंसेविकांना , तसेच ग्रामीण विभागातील आशा स्वयंसेविकांना व गटप्रवर्तकांना प्रतिदिन ३०० रुपये व केंद्रसरकारचे १००० रुपये प्रतिमाह भत्ता देण्यात यावा. 

३. दि. १७ जुलै २०२० च्या शासकीय आदेशानुसार, आशा स्वयंसेविकांच्या मोबदल्यात रू. २००० व गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात रु. ३००० ची दरमहा कायम व निश्चित स्वरुपाची वाढ केलेली आहे. सदर वाढ बहुतांश जिल्हयांमध्ये नोव्हेंबर २०२० पासून मिळालेली नाही. ती विनाविलंब देण्यात यावी. २००० रुपये ची वाढ कायम व निश्चित स्वरुपाची असल्यामुळे त्याच्यात काटछाट न करता ती रक्कम पुर्ण देण्यात यावी. 

४. माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याचा मोबदला आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना पुर्णतः देण्यात आलेला नाही. तसेच जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार, सध्याच्या टप्प्याचे काम आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना लावण्यात आले आहे. त्याचा मोबदला निश्चित करून तो देण्यात यावा. 

५. कोरोना बाधित झालेल्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांसाठी, व त्यांच्या कुटुंबियांसाठी उपचार करण्यासाठी देंटीलेटरसह बेड राखीव ठेवण्यात यावेत व त्यांना विनामूल्य उपचार देण्यात यावा. आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना संबधीत काम केल्यामुळे मृत्यु झाल्यास त्यांच्या वारसांना ५० लाख रुपयांचे विमाकवच देण्याचे आदेश राज्य शासनाने काढले आहेत. त्या आदेशामध्ये आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचा स्पष्टपणे उल्लेख नाही. तो उल्लेख स्पष्टपणे करण्यात यावा.

६. आशास्वयंसेविकांना पोलिओ, कुष्ठरोग, क्षयरोग व सांसर्गिक रोग यांच्या सर्वेक्षणाचा थकीत मोबदला देण्यात यावा.

७. जेथे आरोग्य वर्धिनी अंतर्गत सीएचओची नेमणुक केलेली नाही, तेथे आशांना कामास भाग पाडले जाते. परंतु आशांना त्या कामाचा मोबदला दिला जात नाही. तरी तो मोबदला देण्यात यावा. 

८. आरोग्य वर्धिनी अंतर्गत विविध सर्वेचे काम हे समुहावर आधारीत काम असुन सदर टीम मध्ये समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, बहुउद्देशीय आरोग्य सेवक व आशा स्वयंसेविका यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात गटप्रवर्तकांचा समावेश केलेला नसताना सुध्दा आशांनी केलेल्या विविध सर्व्हेचे रिपोर्टिग करण्याचे काम गट प्रवर्तकांना करावे लागते. एल एच.व्ही व एम.पी. डब्ल्यु हे पगारदार शासकीय कर्मचारी असुन त्यांना आरोग्य वर्धिनी अंतर्गत टिम बेस्ड इन्सेन्टिव्ह रु. १५०० मिळतो. गटप्रवर्तकांना या कामाचा मोबदला काहीच मिळत नाही. गट प्रवर्तकांचा समावेश आरोग्यवर्धिनी ( Team Based work ) मध्ये सामाविष्ट करुन गटप्रवर्तकांना सुध्दा या कामासाठी प्रतिमहा रु.१५०० मोबदला देण्यात यावा. 

९. प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचे काम गटप्रवर्तकांना सांगितले जाते. त्यात आशा स्वयंसेविकाकडून फॉर्म गोळा करून त्यावर ए.एन.एम. , एल.एच.व्ही , सी.एच.ओ व वैदयकीय अधिकारी इ . च्या स्वाक्षरी घेऊन सदरील फॉर्म ऑनलाईन भरण्याचे काम गटप्रवर्तकांना सांगितले जाते. या अतिरिक्त कामामुळे गटप्रवर्तकांच्या मुळ कामावर विपरित परिणाम होत आहे. सदरील काम गटप्रवर्तकांच्या जॉबचार्ट मध्ये येत नाही. तेव्हा गटप्रवर्तकांना त्यांचे मुळ काम प्रभावीपणे व सुरळीतपणे करता यावे, यासाठी प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे अतिरिक्त काम गटप्रवर्तकांना सांगण्यात येऊ नये. 

१०. प्रेरणा प्रकल्पाच्या रिपोर्टिगसाठी दर सहामाही रु. १५०० मोबदला गटप्रवर्तकांना देण्यात यावा व स्टेशनरीसाठी रु. ३००० प्रतिवर्ष रक्कम गटप्रवर्तकांच्या बँक खात्यात जमा करावी.

११. आरोग्य विभागातील रिक्त पदे भरतीच्या वेळी ज्या आशा व गटप्रवर्तकांनी एएनएम व जीएनएम चा कोर्स पुर्ण केलेला आहे, त्यांना प्रथम प्राधान्य देऊन शासकीय सेवेत समाविष्ट करून घेण्यात यावे. 

१२. आरोग्यसेविका पदभरती मध्ये आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना ५० टक्के आरक्षण मिळावे. उदा. क्षेत्रिय कर्मचारी, फवारणी कर्मचारी यांना ५० टक्के आरक्षण आरोग्य सेवक भरतीमध्ये असते. 

१३. आशा स्वंयसेविकांना योजनाबाहय काम सांगण्यात येऊ नये व मोबदल्याशिवाय त्यांच्याकडून कोणतेही काम करून घेऊ नये. 

१४. आशा स्वयंसेविकांना मास्क, हॅण्डग्लोझ, सॅनिटायझर नियमितपणे व पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत, ती देण्यात यावी. 

१५. आशा कार्यकर्तीना पिड अँण्टीजन टेस्ट करण्याचे काम तसेच त्यांना थर्मामीटर, ऑक्सिमीटर, थर्मलगनची किट देऊन त्यांनी टेस्ट घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. बहुसंख्य आशा स्वयंसेविकांचे शिक्षण कमी आहे . रॅपिड अॅण्टीजन टेस्ट करण्याचा त्यांना अनुभव नाही. अपुरे शिक्षण व अपुरा अनुभव असलेल्या आशा स्वयंसेविकांना अशाप्रकारचे काम देणे, योग्य आहे का ? आशा स्वयंसेविकांना सांगितली जाणारी कामे कुशल स्वरुपाची आहेत. त्याचा मोबदला शासनाने ठरविलेला नाही. मोबदल्याशिवाय काम करून घेणे, बेकायदेशीर द असमर्थनीय आहे.


संबंधित लेख

लोकप्रिय