Thursday, December 5, 2024
Homeराज्यकोरोना पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील यंत्रणांमधील समन्वय उल्लेखनीय - पालकमंत्री जयंत पाटील

कोरोना पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील यंत्रणांमधील समन्वय उल्लेखनीय – पालकमंत्री जयंत पाटील

सांगली : कोरोना प्रादुर्भावाच्या सुरवातीच्या काळात परदेशवारी करून आलेल्या काही इस्लामपूर येथील प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याने जिल्ह्यात घबराटीचे वातावरण निर्माण झाले. परंतु कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अचूक व गतीने करण्यात आल्याने कम्युनिटी प्रादुर्भावाचा धोका टळला. यामध्ये महसूल, पोलीस, आरोग्य या सर्वच यंत्रणांचा सहभाग अत्यंत उल्लेखनीय होता. यंत्रणांमधील उत्तम समन्वयामुळेच जिल्ह्यातील कोरोनाच्या प्रार्दुभावावर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.

कोरोना संसर्गामुळे उद्भवलेल्या परिस्थितीबाबत तसेच कायदा व सुव्यवस्थेबाबत जलसंपदा मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, खासदर संजय पाटील, आमदार सुमनताई पाटील, आमदार विक्रम सावंत, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, राज्य गुप्तवार्ता विभागाचे अप्पर उपायुक्त संजीवकुमार पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात कोरोना बाधितांवर त्वरीत आणि अतिशय चांगले उपचार केले जात आहेत. 

लॉकडाऊननंतर स्थलांतराला परवानगी मिळाल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव असणाऱ्या मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे या कोरोना हॉटस्पॉट भागातून नोकरीधंद्यासाठी बाहेर गावी असणारे अनेक लोक आपल्या मुळ गावी परत आले. त्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना बाधितांची संख्या वाढली. असे असले तरी संपूर्ण प्रशासन व आरोग्य विभाग यांनी अत्यंत सुक्ष्म नियोजन करून स्थिती नियंत्रणात ठेवली असल्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. कोविड -१९ ची जशी काळजी आहे, तशी लोकांच्या मनात पूराचीही धास्ती आहे, असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, संभाव्य पूरकाळातील आपत्तीला सामोरे जाण्यासाठी प्रशासनाची जय्यत तयारी झाली आहे. तसेच आवश्यकता भासल्यास लोकांना स्थलांतरीत करण्यासाठी जागा निश्चित करून आवश्यक आराखडे तयार करण्यात आले आहेत. जलसिंचन विभागाच्या वतीने पाण्याचा विसर्ग नियोजनबध्द करण्यात येणार आहे, असे सांगून आपत्तीच्या काळात जिल्हा पोलीस दल अत्यंत उल्लेखनीय कामगिरी करत आहे. तसेच प्रशासकीय टीमचा परफॉर्मन्स ही अत्यंत चांगला आहे, अशा शब्दात त्यांनी यंत्रणांचे कौतुक केले.


संबंधित लेख

लोकप्रिय