मुंबई : पोलीस सेवेतील योगदानासाठी पोलीस शौर्य पदक, राष्ट्रपती पोलीस पदक आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठीचे पदक विजेत्या महाराष्ट्रातील ७८ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे.
“महाराष्ट्र पोलीस दलाचा आम्हाला अभिमान आहे. पोलीस दलाच्या ब्रिद वाक्याला जागून, या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावून महाराष्ट्राच्या गौरवात भर घातली,” अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र पोलीस दलातील या अधिकारी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातील १,३८० पदक विजेत्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची यादी जाहीर केली. यात महाराष्ट्रातील तीन अधिकाऱ्यांनी उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती पोलीस पदक’, २५ अधिकाऱी, कर्मचाऱ्यांनी ‘पोलीस शौर्य पदक’ तसेच गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ३९ अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ‘पोलीस पदक’ तसेच ११ पोलीस अधिकाऱ्यांनी ‘उत्कृष्ट तपासासाठीचे केंद्रीय गृहमंत्री पदक’ पटकावले आहे. याशिवाय राज्याच्या अग्निशमन दलातील आठ अग्निशन अधिकारी, कर्मचाऱ्यांना ‘अग्निशमन सेवा शौर्य पदक’ जाहीर झाले आहे. या सर्वांचेही मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले आहे, तसेच त्यांच्या धडाडीचे कौतुक केले आहे.