पिंपरी चिंचवड/क्रांतीकुमार कडुलकर:पिंपळेगुरव येथील बुद्धभूषण सेवा संघ व मराठवाडा जनविकास संघ एकसंघ समिती पिंपळे गुरव,पिंपरी-चिंचवड, शहर,पुणे आणि मित्रपरिवार यांच्यावतीने पिंपळेगुरव येथे पाच फूटउंचीचे,पिंपळ,चाफा,कडूलिंब,करंज,नारळ या वृक्षांची लागवड करून बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली.यावेळी अरुण पवार,छत्रपती शिवाजी महाराज वनश्री वृक्षमित्र राज्यस्तरीय महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त संस्थापक अध्यक्ष यांनी सांगितले की,वैशाख महिन्यात येणारी पौर्णिमा ही निसर्ग आणि अध्यात्म याची अनुभूती देणारा दिवस आहे. त्याच दिवशी गौतम बुद्धांना बोधी वृक्षाखाली आत्मअनुभूतीचा साक्षात्कार झाला,त्या पिंपळ वृक्षासहीत इतर प्राणवायू देणाऱ्या वृक्षांची लागवड केली आहे.
यावेळी शशिकांत दुधारे,रमेश जाधव,अरुण पवार,पुनाजी रोकडे,पी.एन.कांबळे,मनोहर कांबळे,गौतम रोकडे,यंकाप्पा कटीमनी,गोरख साळुंके,शिवाजी कांबळे,सुरेश भालेराव,आण्णाराव गायकवाड,आण्णाराव उबाळे,राजेंद्र जानराव,विजय गरजमल,सुभेदार साबळे,बंडू ससाणे,मोहन कांबळे,प्रशांत खिराडे तसेच बुद्धविहार येथील सर्व पदाधिकारी आदी उपस्थित होते.
या उपक्रमाबाबत बोलताना अरुण पवार म्हणाले, संपूर्ण भारतात आढळणारा प्रसिद्ध वृक्ष म्हणजे पिंपळ. पिंपळ हा एक अरण्यवृक्ष आहे. पिंपळाच्या झाडाचा विशेष गुणधर्म म्हणजे याचे आयुष्य खूप असते त्यामुळे यास अक्षय वृक्ष असेही म्हटले जाते. अनेक ठिकाणी चारशे ते पाचशे वर्ष जुने पिंपळ आजही पाहावयास मिळतात. तथागत गौतम बुद्धांनी बोधगया येथे एका पिंपळाच्या झाडाखाली ध्यान केले तेव्हापासून पिंपळास बोधिवृक्ष या नावाने सुद्धा ओळखले जाते. आम्ही संयुक्तपणे गेल्या दाहा वर्षापासून महाराष्ट्र मराठवाडा पुणे शहर पिंपरी-चिंचवड परिसरात वृक्ष लागवड आणि संवर्धनाचे काम केले जाते. गेल्या दाहा वर्षात हजारो झाडांची लागवड आणि जोपासना या संस्थांमार्फत केली जात आहे. वृक्षलागवड आणि संवर्धन ही सामाजिक चळवळ व्हावी, यासाठी असे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.