मुंबई :- महाविकास आघाडीमध्ये निर्णय प्रक्रियेत डावलण्यात येत असल्यामुळे नाराज असलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि राज्याचे मंत्री अशोक चव्हाण यांनी गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. काँग्रेसची कोणतीही नाराजी नव्हती, महाविकास आघाडी सरकार भक्कम आहे. ते पाच वर्षे टिकेल असा निर्वाळा थोरात यांनी भेटीनंतर दिला.
काँग्रेस पक्षाला विश्वासात न घेता सरकारच्या पातळीवर निर्णय होत असल्याने काँग्रेसमध्ये नाराजी आहे. त्यावर काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत ही नाराजी मुख्यमंत्र्यांच्या कानी घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता. गेले दोन दिवस लांबणीवर पडलेल्या या बैठकीला गुरुवारी अखेर मुहूर्त सापडला.
बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांनी मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी शिवसेना नेते खा. संजय राऊत आणि खा. अनिल देसाई हेदेखील उपस्थित होते. या एक तासाच्या भेटीनंतर बाळासाहेब थोरात यांनी नाराजी संपुष्टात आल्याचे संकेत दिले. कोकणात सुपारी, नारळ आदी फळबागांचे नुकसान झाले आहे, या नुकसानग्रस्तांना देखील अधिक मदत मिळावी यावर चर्चा झाली. सर्वच मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतली असेही थोरात यांनी सांगितले.
राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांच्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मंत्रीही नाराज असल्याची चर्चा आहे. मात्र या बैठकीत कोणत्याही अधिकार्यालबाबत चर्चा केली नाही, असेही थोरात यांनी स्पष्ट केले. शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून आम्हाला डावलले जात नाही. तशा प्रकारची कोणताही तक्रार आम्ही केलेली नाही, असे थोरात म्हणाले.