औरंगाबाद (प्रतिनिधी) : आज पुन्हा एकदा औरंगाबाद शहर व ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. आज जिल्ह्यात १९४ नवीन कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर २५३ जणांना आज सुट्टी देण्यात आली. यामध्ये मनपा हद्दीतील १४५ तर ग्रामीण भागातील १०८ जणांचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ७ हजार १३४ इतकी झाली आहे तर आतापर्यंत ३२७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत बरे होऊन घरी परतणाऱ्याची संख्या देखील वाढली असून एकूण ३ हजार ८२४ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर सध्या २ हजार ९८३ कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
घाटीत चार तर खाजगी रुग्णालयात पाच कोरोना बधितांचा मृत्यू
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अर्थात घाटी मध्ये औरंगाबाद शहरातील शरीफ कॉलनीतील चार वर्षीय मुलाचा,वाळूज मधील ४७ वर्षीय स्त्री,चेतना नगर मधील ५३ वर्षीय पुरुष तर वैजापूर येथील इंदिरानगर मधील ५५ वर्षीय स्त्री या कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. घाटीत आतापर्यंत २५५ रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी २४७ कोरोना औरंगाबाद जिल्ह्यात वास्तव्यास होते. तर शहरातील विविध खासगी रुग्णालयात आज एकूण चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.