Sunday, May 12, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडभामा आसखेड आंद्राच्या पाण्याला घटस्थापनेचा मुहूर्त !

भामा आसखेड आंद्राच्या पाण्याला घटस्थापनेचा मुहूर्त !

येत्या २४ ऑगस्टपर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण होणार, शहराच्या पाण्याचा प्रश्न सुटणार – आमदार महेश लांडगे यांचा यशस्वी पाठपुरावा

पिंपरी चिंचवड
: पिंपरी-चिंचवड शहरातील पाणीपुरवठा सक्षम करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या आंद्राच्या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून, येत्या २४ ऑगस्टपर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात येईल. वीज जोडणी करुन प्रकल्प कार्यान्वयीत होईल. त्यानंतर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जलशुद्धीकरण केंद्रांतील पाण्याचे ‘टेस्टिंग’ करण्यात येईल. त्यानंतर सप्टेंबरअखेर अर्थात घटस्थापनेच्या मुहुर्तावर पिंपरी-चिंचवडकरांच्या दारात आंद्राचे शुद्ध पाणी मिळणार आहे.

भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी भोसरी विधानसभा मतदार संघातील समाविष्ट गावांसह पिंपरी-चिंचवडचा पाणी पुरवठा सुरळीत आणि सक्षम करण्यासाठी आंद्रा व भामा- आसखेड प्रकल्पाचे काम मार्गी लावले होते.काहीदिवसांपूर्वी प्रकल्पाची पाहणी करण्यात आली होती. तसेच, प्रकल्पाचे काम जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून भामा आसखेड इंद्रा प्रकल्पांतर्गत निघोजे आणि तळवडे येथील इंद्रायणी नदीजवळ उपसा केंद्र या ठिकाणी पंपिंग मशिनरी उभारणीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. प्रकल्पासाठी २२ केव्ही उच्चदाब क्षमतेची वीजजोडणी करण्याचे काम दि. २४ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर नदीजवळ उपसा करुन पाणी चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाईल. तसेच, चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्राचे काम येत्या २० दिवसांत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर पाण्याचे टेस्टिंग सुरू होईल. सर्व तापासणी केल्यानंतर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात शुद्ध पाणी पुरवठा शहराला होईल,असा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.

पिंपरी-चिंचवडकर पाण्यासाठी स्वयंपूर्ण होतील…

सध्यस्थितीला पिंपरी-चिंचवडसाठी पवना धरणातून पाणी पुरवठा होतो. त्यामुळे पवना धरणाव्यतिरिक्त शहरासाठी पाणी पुरवठ्याचे अन्य स्त्रोत निर्माण करणे गरजेचे होते. भाजपाचे तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सकारात्मक निर्णय घेतला. आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने महापालिकेतील भाजपाच्या सत्ताकाळात आंद्रा धरणातून १०० एमएलडी आणि भामा आसखेडमधून १६७ एमएलडी पाणी पिंपरी-चिंचवडला मिळण्यासाठी प्रकल्पाला मंजुरी मिळाली. कोविड आणि लॉकडाउनच्या परिणामामुळे नियोजित वेळेत प्रकल्प पूर्ण करण्यात प्रशासनाला अडचणी आल्या. अखेर सर्व अडचणींवर मात करीत प्रकल्प पूर्णत्वास येत आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकर आता पाण्यासाठी स्वयंपूर्ण होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

– क्रांतिकुमार कडुलकर

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय