पुणे – सध्या दारू पिणे हा अनेकांचा छंद बनला आहे. दारूची नशा अशी आहे की भले भले जानेमाने लोक रस्त्यावर येऊन धिंगाणा घालतात. जगात असे अनेक लोक आहेत जे दारू पिल्याशिवाय राहू शकत नाहीत.
दारू पिऊन अनेकजण घरात आणि बाहेर गोंधळ घालतात. त्यामुळे जगातील अनेक देशांनी दारूशी संबंधित कायदे केले आहेत, ज्याचे उल्लंघन केल्यास लोकांना शिक्षा होऊ शकते. शिवाय, दंडही आकारला जातो. दरम्यान, राज्यातील गडकिल्ल्यांवर मद्यपान करणाऱ्यांना कडक शिक्षा मिळावी यासाठी असा एक कठोर कायदा बनवला जावा, असा प्रस्ताव नुकताच राज्य सरकारने विधी व न्याय विभागाकडे पाठवला आहे.
राज्यातील गडकिल्ल्यांच्या संरक्षणाबाबत काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर उत्तर देताना सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली. ‘ज्या गडकिल्ल्यांनी वीररस पाहिला तिथे समाजातील काही प्रवृत्तींकडून सोमरस घेतला जातो असे प्रकार दिसून आले आहेत. त्याविरुद्ध कडक कायदा बनवला गेला तर गडकिल्ल्यांच्या रक्षणासाठी हेरिटेज मार्शल उपलब्ध होऊ शकतील, असे ते म्हणाले.
त्यामुळे येणाऱ्या काळात गडकिल्ल्यांवर मद्यपान केल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे. गडकिल्ल्यांवर मद्यपान केल्यास किमान तीन महिने कारावास; तसेच किमान दहा हजार रुपये दंड वसूल करण्यात येणार असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. त्यासाठी हेरिटेज मार्शल नेमण्याचे प्रस्तावित असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.
राज्यात 387 संरक्षित स्मारके आहेत. मागील सरकारच्या काळात या स्मारकांच्या देखभालीकडे दुर्लक्षच झाले होते. निधीदेखील पुरेसा दिला जात नव्हता. आता मात्र जिल्हा नियोजनपैकी सुमारे 513 कोटींचा निधी देण्यात येणार आहे. 75 स्मारकांच्या ठिकाणी जनसुविधा निर्माण करण्याचे कार्यही हाती घेण्यात आले असून त्यासाठी 65 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. सर्व 387 स्मारकांवर त्यांची माहिती क्यूआर कोडच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. असं मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितलं.