भारतीय शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती ही संकल्पना काही नवीन नाही. देशातील विविध हवामान असलेल्या डोंगराळ भागात प्रदेशात कोरडवाहू शेतीमध्ये विविध प्रकारे सेंद्रिय शेतीच केली जाते. कालांतराने पिक उत्पादन वाढीचे नवीन तंत्रज्ञान विकसित झाले .पिकांची उत्पादकता वाढली. दरम्यानच्या काळात रासायनिक खतांचा पाण्याचा कीटकनाशकांचा वापरही वाढत गेला. या उत्पादन वाढवण्याच्या चढाओढी मध्ये पर्यावरणाचे संतुलन राखून शेती केली पाहिजे हा मुद्दा फारसा गांभीर्याने घेतला नाही.
दिवसेंदिवस सेंद्रिय पदार्थांचा वापर कमी होत असल्याने जमिनीची भौतिक जडणघडण होत गेली. त्याचा परिणाम जमिनीच्या सुपीकतेवर झाला. ही समस्या निव्वळ आपल्या राज्यात देशात आहे असे नसून ही एक जागतिक समस्या ठरली आहे. आणि म्हणूनच आज सर्व थरातून सेंद्रिय शेतीकडे लक्ष दिले जात आहे. जागरूकता वाढत आहे आज सेंद्रिय मालाला देशांतर्गत तसेच जगामध्ये फार मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे परंतु मालाचा दर्जा टिकविण्यासाठी उत्पादक ते बरोबर जमिनीची सुपीकता टिकवणे हे ही तितकेच महत्त्वाचे आहे. सेंद्रिय शेती ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी काही मुलभूत गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यासाठी खालील सेंद्रिय शेतीची मूलभूत तत्त्वांचा वापर करावा.
सेंद्रिय शेतीची मूलतत्त्वे –
■ स्थानिक उपलब्ध सुविधांचा वापर करून जास्तीत जास्त शाश्वत उत्पादन घेणे यामध्ये शेतावर उपलब्ध काडीकचरा, जनावरांचे मलमूत्र ,पिकांचे अवशेष या सेंद्रिय पदार्थांचा सेंद्रिय खत तयार करण्यासाठी वापर करून घेणे.
■ सोनखत, शेणखत, कंपोस्ट खत, लेंडी, वनस्पतिजन्य कीडनाशके व रोगनाशके आदींचा जास्तीत जास्त वापर करणे.
■ रासायनिक खते कीटकनाशके यांसारख्या बाह्य घटकांचा कमीत कमी वापर करणे किंवा पूरक घटक म्हणून वापर करणे.
■ जमीन पाणी अन्नद्रव्य व सुखी या जमिनीच्या मूलभूत जैविक क्रियांचा समन्वय बिघडू न देणे.
■ प्राणी आणि वनस्पती यांचे संवर्धन करून आर्थिक स्थैर्य मिळवणे.
■ स्थानिक लोकांचे समाधान होईल व ते आकर्षित होतील अशी सेंद्रिय शेती पद्धती विकसित करणे.
■ एकंदरीत शेती व्यवसायात आर्थिक स्थिरता आणण्यासाठी प्राणी व वनस्पती यांच्या विविध उत्पादन पद्धती वनशेती पद्धत एकात्मिक पीक पशु उत्पादन पद्धतीचा वापर करणे.
रत्नदीप कल्पना गुरुदेव सरोदे
बीएससी एग्रीकल्चर