जुन्नर (पुणे) : आंबे पिंपरवाडी ग्रामपंचायत मध्ये मनरेगा योजनेतुन 5 पानंद रस्त्यांच्या कामाचे उद्घाटन सरपंच मुकुंद घोडे यांच्या हस्ते करुन सुरुवात करण्यात आली. या कामातून गावातील कामगारांना मिळणार साधारणतः तीन ते चार महिने गावातच रोजगार मिळणार आहे.
रोजगार हमीच्या माध्यमातून गावामध्येच ‘मागेल त्याला काम’ देण्याचे आश्वासन ग्रामपंचायतीने दिले होते, ते पुर्णत्वास नेले जात असल्याचे गावचे सरपंच मुकुंद घोडे यांनी सांगितले.
अखिल भारतीय किसान सभेच्या जुन्नर तालुका समितीच्या प्रयत्नाने आणि ग्रामपंचायत आंबे पिंपरवाडी च्या सहकार्याने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कायद्याअंतर्गत आंबे पिंपरवाडी गावामध्ये 5 पानंद रस्त्यांच्या कामास सुरुवात करण्यात आल्याचे ही घोडे म्हणाले.
कोरोना महामारीमुळे संपूर्ण देश लॉकडाऊन केला, पर्यायाने वाहतूक व्यवस्था बंद झाली. प्रवासासाठी साधने उपलब्ध नसल्यामुळे आदिवासी मजुरांना रोजगार मिळू शकला नाही आणि पुढेही काही महिने अशी स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. अर्थार्जनाचे दुसरे कोणतेही साधन नसल्याने कौटुंबिक उदरनिर्वाहचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा किसान सभेच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे मनरेगा अंतर्गत प्रत्येक गावामध्ये मजूरप्रधान कामे चालू करावीत आणि लोकांच्या हाताला रोजगार मिळावा यासाठी सातत्याने पाठपुरावा चालू ठेवला होता. त्याला यश आल्याचे ते म्हणाले.
तसेेेच ‘हर घर गोठे घर घर गोठे’ या जिल्हा परिषदेच्या घोषणेची परिपूर्ण अंमलबजावणी करण्यासाठी अधिकाधिक नागरिकांनी अर्ज करण्याचे ग्रामपंचायतीच्या वतीने आवाहन केले. किसान सभेच्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. या वेळी ग्रामसेवक लहू भालींगे, उपसरपंच अलका काठे, ग्राम रोजगार सेवक संदीप शेळकंदे, विलास चिमटे, दीपक डामसे तसेच मोठ्या संख्येने मजूर व ग्रामस्थ उपस्थित होते.