Tuesday, December 3, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडALANDI : पद्मावती देवी मंदिरात माऊलींची पालखी हरिनाम गजरात

ALANDI : पद्मावती देवी मंदिरात माऊलींची पालखी हरिनाम गजरात

पद्मावती देवीदर्शन नवरात्र उत्सवास भाविकांची गर्दी (ALANDI)

आळंदी / अर्जुन मेदनकर : येथील पद्मावती देवी मंदिरात आळंदीतील धार्मिक प्रथा परंपरांचे पालन करीत नवरात्र उत्सवास विविध धार्मिक कार्यक्रमांनी सुरुवात झाली असून सातव्या माळेस बुधवारी ( दि. ९ ) माऊली मंदिरातून श्रींची पालखी परंपरेने पद्मावतीस हरिनाम गजरात वैभवी लवाजम्यासह आली. अशी माहिती मंदिराचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी दिली. (ALANDI)

 नवरात्री निमित्त आळंदी देवस्थानच्या वतीने मंदिरात परंपरेने पूजा करून उत्सवास सुरुवात झाली आहे. नवरात्री निमित्त भाविकांची गर्दी वाढत आहे. पद्मावती मंदिरात परंपरेने आळंदी ग्रामस्थ श्री रानवडे परिवाराचे वतीने देवस्थानचे प्रमुख विश्वस्त राजेंद्र उमाप, विश्वस्त योगी निरंजननाथजी यांचा रानवडे परिवाराचे वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी व्यवस्थापक माऊली वीर, उपव्यवस्थापक तुकाराम माने, श्रीधर सरनाईक, मानकरी, सेवक, आळंदी ग्रामस्थ, वारकरी भाविक आदी उपस्थित होते. यावेळी श्रींची पूजा, आरती, भजन, श्री रानवडे परिवारासह देवस्थान तर्फे प्रसाद वाटप करण्यात आला. भाविकांचे, नागरिकांचे स्वागत, श्रींची पूजा आदी धार्मिक कार्यक्रमांना परिश्रम पूर्वक रानवडे परिवार सेवा रुजू केली.  

  नवरात्रात श्रीची पालखी माऊली मंदिरातून येथे परंपरेने येत असते. येथे पूजा आरती, महाप्रसाद, विसावा, हरिनाम गजर करीत श्रीची पालखी विश्रांतवड मार्गे परंपरेने भोसले वस्ती येथे विसावा घेत मंदिरात रात्री हरिनाम गजरात परत आणण्यात आली. भोसले वस्ती येथे मोहन भोसले परिवाराने श्रींचे पालखीचे स्वागत केले.

येथे भजन, आरती प्रसाद वाटप हरिनाम गजरात झाले, पद्मावती देवीचे मंदिराचे वैभवात वाढ केल्याने भाविकांची श्रीचे दर्शनास गर्दी वाढू लागली आहे. परिसरात लोकवस्ती देखील वाढल्याने पद्मावती मंदिर विकसित करण्याचे निर्णयाचे परिसरातून देखील स्वागत करण्यात आले आहे.

श्री पद्मावती देवी मंदिर परिसर प्रांगणात वैभवी सभागृह आणि बागबगीचा विकसित करून आळंदी देवस्थानने पद्मावती मंदिर परिसराचे वैभवात वाढ केली आहे. यामुळे आळंदी देवस्थानचे या वेगळ्या आणि आळंदीच्या वैभवात वाढ करणाऱ्या उपक्रमाचे परिसरात भाविकांतून कौतुक होत आहे.

पर्यटन स्थळ म्हणून देखील या कडे पाहिले जाऊ लागले आहे. काही तास विश्रान्ती घेत भाविक आळंदीत परततात. आळंदीतील श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी मंदिरा पासून सुमारे दीड किलो मीटर  अंतरावर व ज्ञानेश्वरांच्या भिंती पासून जाणाऱ्या रस्त्यावर पुढे पद्मावती देवीचे मंदिर आहे. नवरात्रात (अश्विन शुद्ध १ ते ९ ) या देवीची यात्रा असते.

प्रथा परंपरांचे पालन करीत आळंदी मंदिरातून श्रीची पालखी एक दिवस नवरात्रात अश्विन शुद्ध ५ किंवा ७ ला श्री ज्ञानेश्वर माउलींची पालखी हरिनाम गजरात जात असते. ही परंपरा अनेक वर्षांपासून सुरु आहे. येथे आळंदी ग्रामस्थ श्री रानवडे परिवाराचे वतीने परंपरेने धार्मिक सेवा, पूजा, स्वागत आदी नियोजन केले जाते.

आळंदी परिसरातील भाविक, महिला, नागरिक,शालेय मुले सहलीने नवरात्रात पद्मावती देवीचे दर्शनासह देवीला नैवैद्य अर्पण करून भोजन करतात. श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज सुरुवातीला एकांत वास आणि ध्यान धारणा यासाठी या परिसरातील मंदिरात येत असत. आळंदी देवस्थानने पद्मावती मंदिर परिसरात मंदिराचे वैभवात वाढ करणारे संगमरवरी दगडातील मंडपाचे बांधकाम करून कीर्तन, भजन मंडप विकसित केला आहे. या सह प्रांगणात विविध वृक्षांचे रोपण व संवर्धन करून बाग तयार केली आहे. येथील बागेत तुळशीची रोपे देखील बहरलेली पाहण्यास मिळतात.

भाविकांना बसण्याची उत्तम व्यवस्था आणि पिण्याचे पाणी, विद्युत व्यवस्था आकर्षक प्रवेशद्वार, संरक्षण भिंत, रंगसंगती ने आणखी वाढ करीत परिसराला महत्त्व प्राप्त करून दिले आहे. येथील ओढ्याचे मजबुतीकरण करून बाग देखील प्रशस्त विकसित केली आहे.

तीर्थक्षेत्रविकास आराखड्यातून येथील रस्ता देखील सिमेंटीकरणाने सजला आहे. यामुळे भाविकांची सोय झाली आहे. यामुळे पद्मावती देवींचे दर्शनास भाविकांची गर्दी वाढत आहे.  

   नवरात्रात भाविकांना महाप्रसाद वाटप भक्ती भावात केले जाते. गावकरी भजन, हरिनाम गजर धार्मिक कार्याने या मंदिराचे परिसरात समाधानाचे वातावरण कायम रहात असल्याने अनेक नागरिक, भाविक यांनी या परिसरात लोकवस्ती साठी जागा घेत आपापल्या निवासाची सोय केली आहे.

  आळंदी मंदिरात आदिशक्ती श्री मुक्ताई मंदिराचे सभागृहा पुढे महिला भजनी मंडळाचे भजन, पारायण आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी सांगितले. येथील व्यापारी तरुण मंडळाने परंपरेने महाद्वारात नवरात्री निमित्त देवीची मुर्ती स्थापित केली आहे. येथील श्री काळेश्वरी देवी मंदिरात देखील धार्मिक उपक्रम केले जात असून येथील नियोजन बंटी वाघमारे करीत आहेत.

संबंधित लेख

लोकप्रिय