Saturday, December 7, 2024
Homeजिल्हाकिसान सभेचे अकोले तालुका अधिवेशन संपन्न

किसान सभेचे अकोले तालुका अधिवेशन संपन्न

कॉ. एकनाथ गी-हे यांची अध्यक्षपदी निवड

अकोले :
अखिल भारतीय किसान सभेचे तालुका अधिवेशन अकोले येथील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयामध्ये उत्साहात संपन्न झाले. तालुक्यात 64 गावातील प्रतिनिधी या अधिवेशनासाठी उपस्थित होते. अधिवेशनाने आगामी तीन वर्षासाठी 27 जणांची कार्यकारणी एक मताने निवडली. यावेळी जेष्ठ कार्यकर्ते व पिंपळगाव खांड ग्रामपंचायतीचे सदस्य कॉ. एकनाथ गी-हे यांची तालुका अध्यक्षपदी व कॉम्रेड राजाराम गंभीरे यांची तालुका सचिवपदी एकमताने निवड करण्यात आली.

कॉ. एकनाथ गी-हे शिदवड येथील रहिवासी असून चळवळीचे जुने कार्यकर्ते आहेत. आदिवासी समाजामध्ये जुन्या पिढीतील कार्यकर्त्यांबरोबर सामाजिक कामांमध्ये ते उत्साहाने सहभागी राहत आले आहेत. वनाधिकार कायद्याच्या अंमलबजावणीसाठी झालेल्या आंदोलनामध्ये त्यांनी प्रदीर्घकाळ आदिवासी कष्टकऱ्यांचे नेतृत्व केले आहे. शेकडो कुटुंबांना कसत असलेल्या जमिनी मिळवून देण्यामध्ये व आदिवासी समाजाच्या वाड्या-वस्त्यांवर वीज, रस्ते, पाणी व शिक्षणाच्या सोयी पोहोचवण्यासाठी झालेल्या विविध आंदोलनांमध्ये कॉ. एकनाथ गी-हे यांनी महत्त्वाची भूमिका निभावली आहे. कॉ. राजाराम गंभीरे जाणीव संघटनेच्या काळापासून समाज कार्यात सक्रिय आहेत.

आदिवासी समाजातील तरुणांना शिक्षणाच्या, शहरांमध्ये सुविधा पुरविण्यासाठी व गावागावातील ग्रामपंचायतींचा कारभार अधिक लोकाभिमुख होण्यासाठी त्यांनी 1980 पासून आज तागायत मोठे सामाजिक योगदान दिले आहे. वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी, अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत सर्वांना रेशन मिळावे यासाठीच संघर्ष, वन धन केंद्रांची उभारणी करून आदिवासी समुदायाच्या हाताला काम देण्यासाठीचा पुढाकार घेऊन त्यांनी मोठी सामाजिक बांधणी केली आहे. सातेवाडी व गंभीरवाडी येथील रहिवासी असलेले राजाराम गंभीरे संपूर्ण तालुकाभर किसान सभेची संघटना बांधण्यासाठी सातत्याने सक्रिय राहिले आहेत. शेतकऱ्यांच्या लढ्यात प्रसंगी तुरुंगवासही त्यांनी भोगला आहे.

अकोले तालुक्याला किसान सभेच्या सक्रियतेचा प्रदीर्घ इतिहास लाभलेला आहे. 1945 साली टिटवाळा येथे संपन्न झालेल्या किसान सभेच्या स्थापना अधिवेशनासाठी तालुक्यातील शेकडो शेतकरी कॉ. बुवा नवले यांच्या नेतृत्वाखाली पायी चालत गेले होते. किसान सभेच्या या पहिल्या राज्य अधिवेशनामध्ये कॉ. बुवा नवले यांची राज्य अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. किसान सभा ने तेव्हापासून आजतागायत अकोले तालुक्यात व अहमदनगर जिल्ह्यामध्ये समर्थपणे शेतकरी श्रमिकांची बाजू घेतली आहे व श्रमिकांच्या रास्त हक्कांसाठी निर्णायक व फलदायी संघर्ष करत आली आहे.

किसान सभेने नेहमीच काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय दिला आहे व ध्येयवादी कार्यकर्त्यांच्या खांद्यावर तालुक्याच्या श्रमिक चळवळीची जबाबदारी सोपवली आहे. आपल्या या परंपरेनुसार काम करणाऱ्या ध्येयवादी कार्यकर्त्यांना संघटनेने न्याय देत नेतृत्वाची जबाबदारी दिली आहे. कार्यकारिणीत समाजाप्रती व शेतकरी समुदायाप्रति कटिबद्ध असलेल्या कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात आला असल्याने तालुक्यात आगामी काळात किसान सभा अधिक बळकट होईल व शेतकरी आणि श्रमिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी अधिक कार्यक्षमपणे काम करील असा विश्वास डॉ. अजित नवले, सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, ज्ञानेश्वर काकड, प्रकाश साबळे, शिवराम लहामटे, भीमा मुठे यांनी व्यक्त केला आहे.

Lic
संबंधित लेख

लोकप्रिय