जुन्नर (रफिक शेख) : मराठा समाजासाठी शासकीय आदेशानुसार कुणबी प्रमाणपत्र कसे काढावे या संदर्भात जुन्नर पंचायत समितीच्या जिजामाता सभागृह येथे शिबीर आयोजित करण्यात आले होते. जुन्नरचे तहसीलदार रवींद्र सबनीस यांचे मार्गदर्शनाखाली शुक्रवार हे शिबिर पार पडले.
यावेळी जुन्नरचे नायब तहसीलदार, गटविकास अधिकारी, मराठा समाज समन्वयक समिती, तसेच तालुक्यातील अनेक गावांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तहसीलदार यांनी याबाबत शासकीय आदेश तसेच आदेशातील शब्दांचे अर्थ, कुणबी प्रमाणपत्रासाठी लागणारे पुरावे, कागदपत्र आदी विविध बाबींवर मार्गदर्शन केले. नागरिकांनी विचारलेल्या शंकांचे निरसन तहसीलदार सबनीस यांनी केले. तसेच तालुक्यात गावोगावी याबाबत लवकरच कॅम्प आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच तहसील कार्यालयात कुणबी प्रमाणपत्रासाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करून सर्व सहकार्य करण्यात येणार आहे.