मुंबई : महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांचा निकाल लोकशाहीचा गळा घोटणारा असल्याची टीका भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) चे राज्य सचिव डॉ. उदय नारकर यांनी केली आहे.
डॉ. नारकर म्हणाले, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या खरी शिवसेना कोणाची, आणि आमदार पात्रतेच्या निकालात अनपेक्षित काहीच नाही. लोकशाहीचे पूर्ण वस्त्रहरण करत आपण कुणाच्या इशाऱ्यानुसार काम करत आहोत, याचा दाखलाच अध्यक्षांनी दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवलेले सरकार केवळ दिल्लीश्वरांच्या आदेशानेच आजवर तगले आहे. विधानसभा अध्यक्षांचे वर्तन कळसूत्री बाहुलीसारखे असल्याचे या निकालावरून दिसून आले आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा धाकदपटशा आणि सग्यासोयऱ्या भांडवलदारांनी पुरवलेल्या थैल्यांच्या जोरावर अनीतीने राज्याची सत्ता काबीज केलेल्यांनी राजकीय नीतीमत्ता भ्रष्ट करत राहण्याचा वसा सोडलेला नाही. ही महाराष्ट्राच्या लोकशाही परंपरांची शोकांतिका आहे.
विधानसभा अध्यक्षांनी आपल्या घटना तुडवणाऱ्या निकालाने मृतावस्थेकडे वाटचाल करणाऱ्या या सरकारला तात्पुरते जीवदान दिले आहे. या ना त्या प्रकारच्या व्हेन्टिलेटरवर ठेवत फार काळ हे सरकार जगवता येणार नाही. येत्या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता हा भाजप-प्रणित नीतीभ्रष्ट राजकीय तमाशाचा खेळ बंद केल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी जनतेने आतापासूनच सिद्ध झाले पाहिजे, असेही डॉ. नारकर म्हणाले.