रामटेक (नागपूर) : रामटेक तालुक्यातील फुलझरी गावात तात्काळ विद्युत व्यवस्था उपलब्ध देण्यात यावी, या मागणीला घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महावितरणाचे मुख्य अभियंत्यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, रामटेक तालुक्यातील फुलझरी हे आदिवासी बहुल गाव आहे. मध्यप्रदेश राज्याला लागून असलेल्या ह्या सीमेवरील गावात आज हि वीज उपलब्ध नाही ह्याहून खेदाची आणि लाजिरवाणी बाब दुसरी कोणतीही असू शकत नाही. स्वातंत्र्याला ७३ वर्षे पूर्ण होऊन हि महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यातील एका सीमावर्ती आदिवासी बहूल गावात वीज उपलब्ध असू नये हि आपल्यासाठी नामुष्कीची बाब म्हणावी लागेल.
तरी फुलझरी गावात तात्काळ विद्युत पुरवठा देण्याबाबत योग्य ती यंत्रणा उभी करण्याबाबत तात्काळ दिशा निर्देश द्यावेत. जेणेकरून अंधःकार असलेले फुलझरी गाव प्रकाशमय होईल ज्याद्वारे तेथील विकास होणे शक्य होईल, असेही म्हटले आहे.
मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी मनसेचे रामटेक तालुका अध्यक्ष शेखर दुंडे, मनसे प्रणीत ‘जन-हित कक्ष’चे राज्य सरचिटणीस महेश जोशी, जिल्हाध्यक्ष इकबाल रिजवी, जिल्हा सचिव पराग सावजी, तालुका अध्यक्ष सुरज सोनवाने, सुखदेव मोरे, अरविंद रावते, मयूर पटले, दामोदर खोडके, मुरलिधर पटले, सुभाष बसेशंकर उपस्थित होते.