’31 डिसेंबरला म्हैसखडकमध्ये सपत्निक सन्मान’
सुरगाणा / गणेश चौधरी : जय किसान फार्मर्स फोरम व आमची माती आमची माणसंतर्फे भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंती निमित्त देण्यात येणारे “कृषिरत्न” हा प्रेरणा पुरस्कार राज्यातील ४० शेतकरी – कृषी उद्योजकांना देण्यात आले. नाशिक येथील प. सा. नाट्यगृहात मान्यवरांच्या शुभहस्ते सपत्निक सन्मान करण्यात आले, अशी माहिती फोरमचे अध्यक्ष प्रा. डॉ. संजय जाधव यांनी दिली.
सुरगाणा तालुक्यातील मौजे म्हैसखडक येथील रामदास देशमुख यांना ‘आमची माती आमची माणसं’ इंडियन फोरम ऑफ फार्मर्स या संस्थेकडून डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार देण्यात आला. उंबरठाण येथील जेष्ठ नागरिक माळीबाबा यांच्या हातून सरस्वती व बिरसा मुंडा यांचे पूजन करण्यात आले व कार्यक्रमाची सुरुवात केली.
यावेळी कृषी विभागामार्फत रामदास देशमुख व त्याची पत्नी शांतीबाई देशमुख यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. रामदास देशमुख म्हैसखडक येथील आदिवासी शेतकरी असून त्यांनी कृषी विभागामार्फत आंबा रोपवाटिकेचा परवाना घेऊन मागील पंधरा वर्षापासून आंबा कलमे विक्रीचा व्यवसाय करीत आहेत. तसेच पशुसंवर्धन विभागाच्या मार्गदर्शनाखाली अति पावसाच्या प्रदेशात कुकूटपालन व्यवसाय यशस्वी करून दाखवलेला आहे. तसेच त्यांनी उंबरठाण परिसरात सफेद मुसळी या औषधी वनस्पतीची लागवड करून गावातील शेतकऱ्यांना जास्तीचे उत्पादन देणारे पीक लागवडीसाठी प्रोत्साहित केले आहे. तसेच त्यांनी 19 जोडप्यांचा सामूहिक विवाह त्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेला आहे.
दुष्काळी परिस्थितीत गावासाठी पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे म्हणून स्वतःच्या विहिरीचे पाणी उपलब्ध करून दिलेले आहे. तसेच भात व नागली या पिकांची सुद्धा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भरघोस उत्पन्न मिळवीत आहेत. आमची माती आमची माणसं या संस्थेने त्यांची या पुरस्कारासाठी निवड करून आदिवासी बांधवांना खूप प्रोत्साहन देण्याचा एक स्तुत्य उपक्रम राबविला असून रामदास देशमुख याची निवड योग्य केलेली आहे. असे उपविभागीय कृषी अधिकारी कळवण के. पी. खैरनार यांनी सांगितले.
यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी कळवण के. पी. खैरनार, कृषिसेवक भोये, सुनील गायकवाड, पांडुरंग भोये, सरपंच देविदास देशमुख, पोलिस पाटील सीताराम देशमुख, माधव पवार, यशवंत माळेबाबा, बुध्या चौधरी, बाबुराव महाले, काशीनाथ गायकवाड, पांडुरंग गावित आदी मान्यवर उपस्थित होते.