Thursday, December 26, 2024
Homeआरोग्यसुरगाणा : कोरोना काळात आदिवासींच्या जीवाशी खेळणा-या बोगस डाॅक्टरांवर कठोर कारवाईची मागणी

सुरगाणा : कोरोना काळात आदिवासींच्या जीवाशी खेळणा-या बोगस डाॅक्टरांवर कठोर कारवाईची मागणी


कोविड प्रतिबंध बैठकीत स्थानिक लोकप्रतिनीधींची मागणी

सुरगाणा (दौलत चौधरी) : कोरोनावर मात करणे हि सामाजिक जबाबदारी आहे. केवळ सरकारवर अवलंबून राहू नका. आपला जीव वाचवायचा असेल तर सर्वानींच खबरदारी घेऊन प्रशासनास सहकार्य केले पाहिजे असे प्रतिपादन विधानसभेचे अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी पंचायत समिती सुरगाणा येथे आयोजित कोविड 19 प्रतिबंधक उपाययोजना  आढावा बैठकीत केले. 

यावेळी आमदार नितीन पवार, माजी आमदार जे.पी. गावित, आदिवासी सेवक चिंतामण गावित, तहसिलदार किशोर मराठे, सभापती मनिषा महाले, गटविकास अधिकारी दिपक भावसार, रत्नाकर पगार, तालुका वैद्यकीय अधिकारी दिलीप रणवीर, एन.डी. गावित, मुख्याधिकारी सचिन पटेल, गटशिक्षणाधिकारी धनंजय कोळी, बालविकास  प्रकल्प अधिकारी संदीप भिंगारे, अर्जुन  झरेकर, माजी सभापती सुवर्णा गांगुर्डे, आदि उपस्थित होते. 

यावेळी झिरवाळ म्हणाले की, प्रसंग खुपच बिकट आहे सद्या परिस्थिति चांगली आहे अजूनही हाता बाहेर गेलेली नाही. जनतेने मला काहीच झाले नाही मी चांगला आहे या भ्रमात राहू नये. दिवस अतिशय वाईट आहेत. त्यामुळे कोरोनाची भीती न बाळगता लक्षणे दिसताच सरकारी दवाखान्यात यावे, असे आवाहनही त्यांनी केले. 

यावेळी आमदार पवार यांनी आक्सीजन तात्काळ उपलब्ध करुन द्यावेत. ग्रामीण रुग्णालयात  पाईपलाईन  झाली आहे. आता सिलेंडरची आवश्यकता आहे. अन्यथा आमच्यावरच  कुलूप ठोकण्याची पाळी येऊ देऊ नका. तालुक्यात बोगस डॉक्टर तसेच बंगाली बाबू यांचेवर कडक कारवाई करण्यात यावी अशा सूचना त्यांनी तहसीलदार यांना केल्या. 

माजी आमदार जे.पी. गावित यांनी सांगितले की, तालुक्यात बोगस डॉक्टर हे आदिवासी जनतेच्या जीवाशी खेळ करीत आहेत. बोगस डॉक्टर दिवसाला लाखो रुपये कमवित आहेत. त्यांच्याकडे कोणत्याही  प्रकारचे वैद्यकीय शिक्षण नाही. त्यांच्यावर अजून कारवाई का कोणी करत नाही असा जाब त्यांनी विचारला. लोक घाबरून सरकारी दवाखान्यात येत नाहीत, बोगस डाॅक्टरांवर भरोसा ठेवून उपचार करतात. ते जो पर्यंत सरकारी दवाखान्यात येत नाहीत, तो पर्यंत कोरोना पेशंट सापडूच शकत नाहीत. ते कोणत्याही प्रकारची कोरोना तपासणी न करताच उपचार करतात, त्यामुळे लोक त्यांच्या कडेच जातात. सरकारी दवाखान्यात गेले की कोरोनाच काढतात हि भीती मनातून काढली पाहिजे. बोगस डाॅक्टरांवर सक्त कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली. 

जे.पी. गावित झिरवाळ यांना म्हणाले की, तुम्ही सर्वांत मोठे आहेत. तुमच्या पुढे सर्व सरकार हादरले पाहिजे. आदिवासी नेहमी दुस-याला मोठं करतो. पदाचा वापर समाजा करीता करा. आमच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत तुमच्या कडून, अशी मिश्कील टिप्पणी केली.

या बैठकीतील चर्चेत सुभाष चौधरी, धर्मेन्द्र पगारीया, एकनाथ बिरारी, नवसू गायकवाड, राजेंद्र पवार, विजय कानडे, शिक्षक रतन चौधरी, पांडुरंग पवार, पोलीस निरीक्षक निलेश बोडके, राजेंद्र लोखंडे, डाॅ. यशवंत चौधरी सहभाग घेतला. 


संबंधित लेख

लोकप्रिय