Sunday, May 5, 2024
Homeजिल्हाआरटीओ अविनाश राऊत यांची सीबीआय व खातेनिहाय चौकशी करा - माकप

आरटीओ अविनाश राऊत यांची सीबीआय व खातेनिहाय चौकशी करा – माकप

माकपचे दोन दिवशीय उपोषण व धरणे आंदोलन 

नांदेड : उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री अविनाश राऊत हे मुजोर व कर्तव्यात कसूर करून भ्रष्ट मार्गाने बेहिशोबी मालमत्ता जमविनारे अधिकारी असून त्यांची केंद्रीय अन्वेशन विभाग नवी दिल्ली व केंद्रीय सडक परिवहन व सडक मार्ग मंत्रालय नवी दिल्लीच्या वरिष्ठ समिती मार्फत चौकशी करून त्यांच्या नातेवाईकासह त्यांची खातेनिहाय चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी करीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर  दि.१४ जुलै पासून अमरण उपोषण व धरणे आंदोलन करून नितीन गडकरी व राज्याचे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांच्यासह केंद्र व राज्याच्या अनेक वरिष्ठांकडे केली आहे.

नांदेड परिवहन अधिकारी हे अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या हायवा, टीपर, ट्रक व टॕक्टरवर कारवाई न करण्यासाठी भ्रष्ट मार्गाने पैसे घेतात तसेच वरिष्ठांच्या आदेशाचे उल्लंघन करून शासनाची व वरिष्ठांची दिशाभूल करण्यात तरबेज आहेत. दि.२०-०५-२०२१ च्या परिवहन आयुक्तांच्या आदेशाचे राऊत यांनी उल्लंघन केले असून उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात दलालांचे शेकडो टेबल व दुकाने स्थापन करून कोड स्वरूपात दररोज लाखो रूपये गैर मार्गाने जमा करीत आहेत. अनेक वर्षापासून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना जम बसल्यामुळे बदली न करता त्याच ठिकाणी सोईस्कर पध्दतीने नोकरी करण्यासाठी मदत करीत आहेत. त्यांची वृत्ती गुंड प्रवृत्तीची असून त्यांना कायद्याचा थोडा देखील धाक नाही. वाळू माफीया व बंदी असलेल्या अन्न व औषध पुरवठा करणाऱ्या सराईत गुन्हेगारा सोबत त्यांचे सलोख्याचे संबंध असल्यामुळे कुणी तक्रार केलीच तर तक्रारदाराच्या जिवितास धोका निर्माण होण्याची शक्यता असते अशी चर्चा आहे.

कार्यालयीन सुशोभिकरण व दुरूस्ती मध्ये त्यांनी भ्रष्टाचार केला असून वरिष्ठ समितीने चौकशी केल्यास निश्चितपणे ते दोषी म्हणून सिद्ध होऊ शकतात.

जिल्हा व काही सिमेवर चेक पोस्ट तयार करून महिनेवारी हफ्ते घेण्यासाठी विशेष विश्वासू कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. अनेक वाहनावर कारवाई करणाऱ्या परिवहन अधिकाऱ्यांना वाळू पुरवठा करणारे एकही हायवा,टीपर किंवा अन्य वाहन मिळत नाही म्हणजे नक्कीच काहीतरी काळेबेरे असल्याचे सिद्ध होते. म्हणून संबंधित कार्यालयातील वरिष्ठ व कनिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी करून कठोर कारवाई करावी व अन्य मागण्या घेऊन आंदोलन केले.

या आंदोलनास अनेक वाहतूक संघटनांनी पाठिंबा दिला असून यापूर्वी दि. १७ जून रोजी झालेल्या तीव्र आंदोलनात माकपचे राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ.विजय गाभणे, सीटू राज्य सचिव कॉ.उज्वला पडलवार, जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड, कॉ.मारोती केंद्रे यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांचे विशेष लक्ष या मुद्यावर वेधले होते. परंतु दखल घेण्यात आली नसल्यामुळे आंदोलनाची मोहिम राबविण्यात येणार असे या पूर्वीच कॉ.गंगाधर गायकवाड यांनी घोषित केले होते.

संबंधित अधिकाऱ्यांवर जो पर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत सतत आंदोलने करण्याचा इशारा दिला असल्यामुळे पुढील आठवड्यात या पेक्षाही तीव्र आंदोलन करणार असल्याचे मनोगत माकप सचिवांनी व्यक्त केले आहे.

दि.१५ जुलै रोजी जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी  पोलीस अधिक्षक प्रमोद कुमार शेवाळे यांना कारवाई करण्यासाठी कळविण्यात आल्यामुळे व तसे पत्र उपोषणार्थींना देण्यात आल्यामुळे  माकपचे बेमुद्दत उपोषण व धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आल्याचे पक्ष सचिव कॉ.गंगाधर गायकवाड यांनी लेखी स्वरूपात कळविले आहे. कारवाई झाली नाहीतर पुढील आठवड्यात सर्व भातृभावी संघटनांना घेऊन व्यापक आंदोलन करण्यात येईल असे मत देखील त्यांनी व्यक्त केले आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय