Tuesday, May 7, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडशिरुर मतदार संघात २०२४ मध्ये भाजपाचा विजय निश्चित - माधुरी मिसाळ

शिरुर मतदार संघात २०२४ मध्ये भाजपाचा विजय निश्चित – माधुरी मिसाळ

लोकसभा निवडणूक प्रभारी माधुरी मिसाळ यांचा विश्वास

केंद्रीय मंत्री रेणुका सिंग यांचा बुधवारपासून तीन दिवस दौरा

पिंपरी चिंचवड
: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात विकासाची वाटचाल सुरू असून, २०२४ मध्ये शिरुर लोकसभा मतदार संघात निश्चितपणे भाजपाचा उमेदवार निवडणून येणार, असा विश्वास शिरुर लोकसभा निवडणूक प्रभारी व आमदार माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केला.

भारतीय जनता पार्टी लोकसभा प्रवास योजनेंतर्गत केंद्रीय मंत्री रेणुका सिंग शिरुर लोकसभा मतदार संघात तीन दिवस दौरा करणार आहेत. दि.१४, १५ आणि १६ सप्टेंबर २०२२ असे तीन दिवस संघटनात्मक व सार्वजनिक कार्यक्रम होणार आहेत. त्या प्रवास योजनेची माहिती देण्याकरिता पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी आमदार मिसाळ बोलत होत्या.

यावेळी संयोजक ॲड.धर्मेंद्रजी खांडरे, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, पुणे जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद, माजी जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके, पिं. चिं.शहर संघटन सरचिटणीस अमोल थोरात, खेड तालुका अध्यक्ष अतुल देशमुख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

आमदार मिसाळ म्हणाल्या की, शिरुर, बारामती, शिर्डी अशा तीन मतदार संघाचे क्लस्टर केले असून, त्याची जबाबदारी रवि अनासपुरे व सुनील कर्जतकर यांच्याकडे आहे. हडपसर, आंबेगाव, मंचर, जुन्नर , शिरुर आणि भोसरी विधानसभा मतदार संघनिहाय केंद्रीय मंत्र्यांच्या दौऱ्याचे नियोजन केले आहे. भाजपाकडून केंद्रीय पातळीवर देशातील १४४ लोकसभा मतदार संघांची यादी केली असून, त्यामध्ये महाराष्ट्रातील १६ मतदार संघांचा समावेश आहे. या सर्व मतदार संघांमध्ये भाजपा विजयश्री खेचून आणण्याच्या दृष्टीने पुढील अडीच वर्षांचे नियोजन केले आहे. मतदार संघातील सहा विधानसभा मतदार संघामध्ये प्रवास योजनेची कमिटी नियुक्ती केली आहे. प्रभारी, संयोजक, सोशल मीडिया, कल्याणकारी योजना आदी विविध स्तरांवर समितीच्या नियुक्ती केल्या आहेत.

प्रलंबित प्रश्नांबाबत केंद्राकडे पाठपुरावा…


संघटनात्मक बांधणीमुळेच भाजपाने यशस्वी वाटचाल ठेवली आहे. आगामी दीड वर्षांत शिरुर लोकसभा मतदार संघातील प्रलंबित प्रश्न केंद्रापर्यंत पोहोचवून मार्गी लावण्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत. नदी सुधार प्रकल्प, पुणे-नाशिक महामार्ग, रेड झोन, तीर्थक्षेत्र विकास, ग्रामीण भागातील राष्ट्रीय महामार्ग आदी विविध प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही आमदार मिसाळ यांनी म्हटले आहे.

… असा असेल दौरा

केंद्रीय आदिवासी विकास मंत्री रेणुका सिंग यांच्या तीन दिवसीय दौऱ्यात संघटनात्मक आणि सार्वजनिक असे एकूण २१ कार्यक्रम होणार आहेत. पदाधिकाऱ्यांशी संवाद, लाभार्थींची चर्चा, भाजपा परिवारातील संस्था, संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद, हुतात्मे- महात्मे यांच्या स्मारकांना भेटी, वारकरी सांप्रदायातील लोकांशी संवाद, तीर्थक्षेत्र भीमाशंकर भेट, स्थानिक नागरिकांशी संवाद, आदिवासी बांधवांशी चर्चा, शासकीय अधिकाऱ्यांशी आढावा बैठक, महामार्ग समस्या पाहणी आदी कार्यक्रम नियोजित केले आहेत.

– क्रांतिकुमार कडुलकर

LIC
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय