Sunday, May 12, 2024
HomeNewsदेशात 5 G सेवा सुरू ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पनवेलच्या...

देशात 5 G सेवा सुरू ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पनवेलच्या पोदी येथील शाळेला मान !

पनवेल: भारतात ५ जी सेवेला सुरुवात झाली आहे.महाराष्ट्रात पनवेल पालिकेच्या पोदी येथील सावित्रीबाई फुले शाळेला याचा पहिला मान मिळाला आहे. शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रिलायन्स जिओ आणि एअरटेल हाय स्पीड ५ जी सेवेला सुरुवात झाली.

दिल्लीहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रगती मैदानावर ५ जी सेवेचा प्रारंभ इंडियन मोबाईल काँग्रेसमध्ये केला. येथूनच पंतप्रधान मोदी यांनी देशभरात ५ जी सेवेशी जोडलेल्या ३० शाळांसोबत एकत्रित संवाद साधला. महाराष्ट्रात पनवेलमधील पोदी शाळेत सकाळी दहा वाजता उपस्थित राहून मुख्यमंत्री शिंदे ऑनलाईन पंतप्रधानांशी जोडले गेले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत खुर्चीऐवजी त्यांनी बेंचवर बसणे पसंत केले.

विद्यार्थ्यांशी गप्पा मारताना मुख्यमंत्र्यांनी ५ जीचे महत्त्व सांगितले. क्रांतिकारक क्षणाचे आपण साक्षीदार असल्याचे सांगत शिक्षण, कृषी, आरोग्य, बॅँकिंग यासह सर्वच क्षेत्रात फाईव्ह जी तंत्रज्ञानाने क्रांती होणार असल्याचे म्हटले. या तंत्रज्ञानामुळे इंटरनेटचा स्पीड वाढणार आहे. त्याचा फायदा सर्वाधिक शिक्षण क्षेत्राला होणार असून, विद्यार्थ्यांना अधिक दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. इंटरनेटला मिळणाऱ्या स्पीडचा फायदा अभ्यासासाठी करा. गेम आणि चित्रपट डाऊनलोड करण्यासाठी नाही, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.

या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून पनवेलच्या शाळेची निवड झाली त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतानाच पंतप्रधानांचेही आभार मानले. या नवीन तंत्रज्ञानामुळे विद्यार्थ्यांना डिजिटल दृष्यांच्या माध्यमातून विषय समजण्यास अधिक सोपे होईल आणि शाळेचे वर्ग सामान्य वर्गवारीत न राहता ते स्मार्ट क्लास होतील, असा विश्वास व्यक्त करीत त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय