जुन्नर, (आनंद कांबळे) : जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील उच्छिल येथील पदवीधर शिक्षक अन्वर अब्दुल सय्यद यांना पुणे जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहिर झाला आहे.
पुणे जिल्हा परिषदेने आज केंद्र प्रमुख, शिक्षक व अध्यक्ष चषक शाळा पुरस्कार जाहीर केले. जुन्नर तालुक्यातून दोन शिक्षकांना आदर्श पुरस्कार जाहीर झाले. त्यामध्ये उच्छिल येथील अन्वर सय्यद तर ठिकेकरवाडी येथील संतोष गडगे यांना पुरस्कार जाहीर झाले.
जि.प प्राथमिक शाळा वडगाव आनंद (इ.१ ते ५) या गटात अध्यक्ष चषक प्रथम क्रमांक तर जि.प प्राथमिक शाळा देवळे (इ.१ ते ८ ) या गटात अध्यक्ष चषक तृतीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
आदिवासी भागातील उच्छिल येथील पदवीधर शिक्षक अन्वर सय्यद यांनी शिक्षण क्षेत्रात मोठे कार्य करत अनेक विद्यार्थी घडवले आहेत. अन्वर सय्यद यांना पुणे जिल्हा परिषदेचा पुरस्कार जाहिर झाल्याने त्यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन व कौतुक होत आहे.