लता रविंद्र जगताप या १९८९ पासून गेले ३० वर्षे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आकुर्डी येथील दवाखान्यात कार्यरत आहेत. आकुर्डी येथील मनपाचा हा दवाखाना प्रसूती गृह आणि कुटुंब कल्याणासाठी सुप्रसिद्ध आहे.
त्यांनी सांगितले की, माझा जन्म मध्यम वर्गीय कुटुंबात झाला. माझ्या दोन मोठ्या बहिणींची लग्ने झाली होती. वडिलांनी मला कसे बसे १२ वी पर्यंत इंग्रजी मध्ये शिकवले. आर्थिक सक्षम होण्यासाठी केईएम हॉस्पिटल पुणे येथे वसतिगृहात राहून नर्सिंग (BPNA) अभ्यासक्रम पूर्ण केला. वडिलांच्या निधनानंतर दोन्ही बहिणींनी आम्हाला आर्थिक पाठबळ दिले. त्यांच्यामुळे माझे शिक्षण पूर्ण झाले.
त्यांनी प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर पुणे जिल्हा परिषदेच्या भीमाशंकर येथील आरोग्य केंद्रामध्ये नोकरीला सुरवात केली. बाल संगोपन गर्भवती मातांचे आरोग्य आणि केंद्र राज्य सरकारच्या महिला बालकल्याण विभागाच्या अनेक ग्रामीण योजना सामान्य जनते पर्यंत पोचवण्यासाठी काम केले. दोन वर्षांच्या नोकरी नंतर १९८९ मध्ये मनपा मध्ये आरोग्य विभागामध्ये त्या कामाला रुजू झाल्या. आकुर्डी येथील मनपा दवाखाना आणि तेथील सार्वजनिक आरोग्य, बालसंगोपन आणि कुटुंब कल्याण केंद्रामध्ये त्या वरिष्ठ परिचारिका आहेत.
प्रत्येक गर्भवती माता आकुर्डीच्या दवाखान्यातून बाळाला घेऊन जाताना तिच्या चेहेऱ्यावर आनंदाचा चंद्र दिसतो. कारण आम्ही सरकारचे नोकर जरी असलो तरी आम्ही जनतेचे सेवक आहोत असे ते सांगतात.
आकुर्डी, निगडी परिसरातील नागरिकांच्या त्या खऱ्या अर्थाने सिस्टर आहेत, कारण कोरोनाच्या काळात त्यांनी काम करताना घड्याळाकडे पाहिले नाही. त्यांच्या सुखी कुटुंबात एक मुलगी आणि एक मुलगा आहे. दोन्ही विवाहित असून मुलगा आयटी कंपनीत कामाला आहे. माझ्याकडे भरपूर वेळ आहे आणि या कोरोनाच्या नव्या लाटेमध्ये महापालिका देईल ती जबाबदारी मी पूर्ण करेन कारण रुग्ण सेवा हीच ईशसेवा आहे.