पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड मनपाच्या ‘अ’ प्रभाग आकुर्डी बालसंगोपन कुटुंब कल्याण आणि प्रसूती विभाग हॉस्पिटल मधील कर्मचाऱ्यांनी दैनंदिन रुग्णसेवा खंडित न करता अथक परिश्रम करून 33 हजार नागरिकांचे लसीकरण केले आहे.
मनपाचे एकूण आठ प्रभाग असून अंदाजे 26 लाख लोकसंख्या आहे. ‘अ’ क्षेत्रीय आकुर्डी (झोन) प्रभागात एकूण 3 लाख लोकसंख्या आहे. त्यामध्ये असंघटित कामगार आणि अल्पउत्पन्न गटातील श्रमिक वर्ग मोठ्या प्रमाणात आहे.
मनपा आयुक्त राजेश पाटील आणि त्यांच्या नेतृत्वाखालील आरोग्य विभागाने व्यापक लोकशिक्षण करून 16 जानेवारी पासून 12 एप्रिल पर्यंत 33 हजार लसीकरण केले आहे. आकुर्डी येथील दवाखाना गेली 35 वर्षे माता संगोपन, कुटुंब कल्याण आणि प्रसूतिगृह म्हणून लोकप्रिय आहे. कोरोना 2020 च्या लाटेत येथील गोरगरीब श्रमिक वर्गाला तत्पर सेवा देण्यात आली होती. कोरोनाच्या या नव्या लाटे मध्ये अँटिजेन/आरटी पीसआर टेस्ट/लसीकरण केंद्राचे व्यवस्थापन हॉस्पिटलच्या नियंत्रण कक्षामधून केले जाते.
रुग्णसेवेचे प्रमुख केंद्र असलेल्या आकुर्डी प्रभागा अंतर्गत दवाखाना(आकुर्डीगाव), ई. एस. आय। दवाखाना (मोहननगर), बीएसएनएल ऑफिस(शाहूनगर), मनपा दवाखाना(संभाजी नगर), हेगडेवार स्विमिंग पूल ऑफिस, कै. संजय काळे सभागृह (प्राधिकरण), मनपा शाळा(चिखली), मनपा शाळा(जाधववाडी) या लसीकरण सेंटर वर नागरिकांना लसीकरण केले जाते.
आकुर्डी आरोग्य अधिकारी डॉ.सुनीता साळवे, नोडल ऑफिसर डॉ. विकास बोरकर, डॉ.राहुल फरांदे (आय टी डेटा इन्फो) यांच्या नेतृवाखाली एक उत्कृष्ट टीम कर्तव्य बजावत आहे. डॉ.श्रुती मुधळे आणि लता जगताप, शाहीन खान(वरिष्ठ परिचारिका) सह अर्चना गरीबे, सिस्टर कांबळे, सपना माशाळ, राजेश्वरी वीनेरकर हे या टीमचे सदस्य आहेत.
आरोग्य सेविकाचे कामही मोलाचे आहे. लसीकरणाचे पूर्ण नियोजन तसेच लसीकरण केलेल्या नागरिकांचा संगणकीय डेटा संकलित करून मनपा आयुक्त यांच्या कार्यालयाकडे निर्धारित वेळेत पाठवण्याचे काम
प्रगती दरनाळ, अमित खत्री, अभिजित गायकवाड हे डेटा ऑपरेटर करतात.
आरोग्य अधिकारी डॉ.सुनीता साळवे यांनी सांगितले की, भीती आणि गैरसमजामुळे लोक सुरवातीचे तीन आठवडे सेंटर ला येत नव्हते. सरकार, मनपा, सामाजिक संस्था आणि जागरूक नागरिकांच्या सकारात्मक प्रचारामुळे लोकांमधील भीती कमी झाली आहे. आता लोक येत आहेत. त्यांना सुलभ सेवा देण्यासाठी आम्ही अथक काम करत आहोत. 2020 मध्ये आम्ही थकलो नाही, कोरोना विरोधातील लढाई आपण जिंकू असा आम्हाला आत्मविश्वास आहे. आम्ही झोनमधील प्रत्येक सेंटरमध्ये एक डॉक्टर, दोन परिचारिका, दोन डेटा ऑपरेटर, एक स्वछता कर्मचारी नियुक्त केला आहे.
डॉ.राहुल फरांदे म्हणाले, लसीकरणाची संपूर्ण अचूक माहिती आयुक्तांपर्यंत वेळेवर देण्यासाठी प्रत्येक केंद्रावरील ऑपरेटरशी सतत संपर्क ठेवावा लागतो आणि नागरिकांना लसीकरण झाल्याचा मनपाचा संदेश अतिशय अचूक पाठवला जातो.