घोडेगाव : जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने आदिम संस्कृती अभ्यास, संशोधन व मानव विकास केंद्राच्या वतीने घोडेगाव येथे आदिवासी विषयींचे संदर्भ ग्रंथालय सुरु करण्यात आले. या ग्रंथालयात आदिवासी विषयक राज्यातील व देशातील आदिवासी विषयक पुस्तके ठेवण्यात येणार आहे. ज्याचा संशोधक, अभ्यासक यांना फार मोठा उपयोग होणार आहे.
या आदिवासी विषयक संदर्भ ग्रंथालयाचे उद्घाटन, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, घोडेगाव चे प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड, बी.डी.काळे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ.ज्ञानेश्वर वाल्हेकर यांच्या हस्ते झाले.
या उद्घाटन प्रसंगी बोलताना बळवंत गायकवाड म्हणाले कि, आदिवासी विषयक जे संदर्भ ग्रंथालय सुरु होत आहे, हा अत्यंत महत्वपूर्ण उपक्रम आहे. या संदर्भ ग्रंथालयासाठी आदिवासी विकास विभागाच्या वतीने सहकार्य करण्यात येईल.
प्रो.डॉ.वाल्हेकर म्हणाले कि, जागतिक आदिवासी दिन अशा प्रकारे साजरा होणे हे खूप अभिनंदनीय आहे. आदिवासी विषयक संदर्भ ग्रंथालय हे आदिवासींवर अभ्यास करणाऱ्या अभ्यासक, संशोधक यांना नक्कीच उपयुक्त ठरेल. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक समीर गारे, सूत्रसंचालन बाळू काठे व आभार रोशन पेकारी यांनी मानले.
यावेळी संस्थेचे सचिव डॉ.अमोल वाघमारे, प्रा.स्नेहल साबळे, अखिल भारतीय किसान सभेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष राजू घोडे, एसएफआय महाराष्ट्र चे राज्य समिती सदस्य संदीप मरभळ, एस.एफ.आय.पुणे जिल्हा अध्यक्ष अविनाश गवारी, रुपाली काठे, रीना मरभळ आदी उपस्थित होते.