मिडीयामध्ये जी कोरोनाची परिस्थिती दाखवली जात आहे, त्यापेक्षा किती तरी भयंकर परिस्थिती देशभरात निर्माण झालेली आहे. ऑक्सिजन नाही, व्हेंटिलेटर नाही, बेड शिल्लक नाही, रुग्णांसाठी रुग्ण वाहिका कमी पडत आहे, इतकेच काय तर वेळेवर योग्य ते उपचार न मिळाल्याने, ऑक्सिजन न मिळाल्याने जीव तर जातोच मात्र मृत्यू झाल्यानंतर सुद्धा स्मशानभूमीत मृत देह जाळण्यासाठी रांगा लावाव्या लागत आहे. मृतदेह जाळण्यासाठी जर रांगा लावाव्या लागत आहेत. त्यात लाकडेही कमी पडत असल्याने शेकडो मृतदेह नदी मध्ये फेकून दिल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पुढे नदीमध्ये वाहून आलेल्या मृतदेहांचे लचके कुत्रे आणि इतर प्राणी तोडतानाचा भयंकर प्रकार समोर आला आहे. यावरून देशभरात काय परिस्थिती निर्माण झाली असेल याचा अंदाज यावा. आपल्या आजूबाजूला कितीही भयंकर परिस्थिती असली तरी जो पर्यंत आपल्या जवळची व्यक्ती त्या परिस्थितीची शिकार होत नाही तो पर्यंत त्या गोष्टीची जाणीव आपल्याला होत नाही.
देशभरात सगळीकडे आपापल्या कुटुंबातील व्यक्तीला वाचवण्यासाठी धावपळ सुरू आहे. सर्व रुग्णालये तुडुंब भरलेली आहेत. दवाखान्यातुन मदत मिळत नाही म्हणून लोक आता सोशल मीडियावर मदत मागत आहेत. मिनिटांमिनिटाला व्हाट्सऍप, ट्विटर आणि इतर सोशल मीडियावर कुठं ऑक्सिजन बेड शिल्लक आहे का?, कुठे व्हेंटिलेटर बेड मिळेल का? या रक्तगटाचा प्लाझ्मा मिळेल का? त्या रक्तगटाचे रक्त मिळेल का? अशा किती तरी गोष्टींची मागणी मरणाच्या दारात उभे असलेल्या व्यक्तीचे नातेवाईक आज सोशल मीडियावरून करत आहेत. मात्र काही राज्य सरकारे आपलं अपयश लपविण्यासाठी सोशल मीडियावर मदत मागणाऱ्यांवर गुन्हा दाखल करीत आहे. मोठे दुर्दैव आहे की, जीव वाचवण्यासाठी मदत मागणे हा देखील आता गुन्हा झाला आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेने आपल्याला खूप काही शिकविले, परंतु आपण दुसऱ्या लाटे पर्यंत बरंच काही विसरून गेलो. जगासह आपल्या देशाचा सुद्धा प्राधान्यक्रम चुकलाच, आपण जगातील सर्वात उंच पुतळा बांधला, जगातील सर्वात मोठे स्टेडियम नाव बदलून ते स्वतःच्या नावेही केले. नको त्या ठिकाणी करोडो रुपये खर्च केले परंतु आपली आरोग्य व्यवस्था इतकी खराब ठेवली की देशातील एक टक्का लोकांची सुद्धा आपण व्यवस्थित काळजी घेऊ शकत नाही. त्यांना आपण वाचवू शकत नाही रोज शेकडो लोक ऑक्सिजन मिळत नसल्याने मरत पावत आहेत त्यात कुटुंबाच्या कुटुंबे मरण पावत आहेत. कोरोना पॉझिटिव्ह आलेले आई वडील आपल्या लहान मुलांना आठ दिवसांत पुन्हा बरे होऊन घरी येतो म्हणून सांगून जातात मात्र त्याचा मृतदेह सुद्धा घरी येत नाही. अशा गंभीर परिस्थितीत आपली आरोग्य व्यवस्था कशी आहे? मंदिर मजीदवरून खून पडे पर्यंत भांडणाऱ्या लोकांना आता तरी रुग्णालयाचे महत्त्व समजेल का?
ज्यावेळी कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्याजोगी होती त्यावेळी मात्र आपले राज्यकर्ते निवडणूक प्रचारात इतके व्यस्त होते की त्यांना देशाचा म्हसनवटा होतोय हे लक्षातच आले नाही. ज्यावेळी स्मशानभूमीत मृतदेह जाळण्यासाठी रांगा लावाव्या लागत होत्या त्यावेळी देशाच्या पंतप्रधान लाखों लोकांना बोलवून पक्षाच्या प्रचार सभा घेत होता. देशात दररोज कोरोनाचे लाखो लोक सापडत असताना आणि रोज हजारो लोक मरत असताना प्रधान सेवकांनी ना कोणते पॅकेज जाहीर केले ना कोणती मोठी घोषणा केली आहे. परंतु ज्या राज्यात निवडणूका आहेत त्या ठिकाणी मात्र मोठे स्वप्न दाखवून, खोट्या आश्वासनांचा पाऊस पाडला.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत PM केअर फंड मध्ये हजारो कोटी रुपये जमा झाले परंतु ना त्याचे जमा जाहीर झाले ना त्याचे ऑडिट झाले. जे पैसे लोकांना वाचवण्यासाठी जमा झाले ते पैसे कुठं गेले ते कुणी पाहिले नाही मात्र स्मशानातील लोकांचे मृतदेह अवघा देश पाहतो आहे. देशातील या आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये सुद्धा मोदी सरकारने जीवनावश्यक वस्तूंवरील कर माफ केला नाही अथवा कमी केला नाही. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, पीपीई किट, औषधे अशा जीवन मरणाच्या वस्तूंवर सुद्धा बारा बारा टक्के कर घेतला जातोय अशा परिस्थितीत हे राज्यकर्ते मढ्यावरील लोणी सुद्धा खाताना मागे पुढे पाहत नाहीत असे दुर्दैवाने म्हणावं लागतंय.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात रोज लाखो लोकांना कोरोनाची लागण होत असताना देशभरात लसीकरणाचा तुटवडा निर्माण झाला असताना दिवस रात्र पाकिस्तानला शिव्या घालून आपली पोळी भाजणाऱ्या राज्यकर्त्यांना पाकिस्तानची मोठी काळजी आहे. ज्या देशात ज्या पुण्यात लस तयार केली जाते त्या देशात त्या पुण्यात लस नसल्याने लसीकरण केंद्र बंद ठेवण्याची वेळ येते आहे.
अशा भयंकर परिस्थितीमध्ये विदेशातून आलेली मेडिकल मदत सुद्धा लोकांपर्यंत पोहतच नाही, नेमकी कुठे जात आहे ही मदत याचा खुलासा सुद्धा सरकार व्यवस्थित देऊ शकलेले नाही. त्यामुळे देशाचा म्हसनवटा झाला असतानाही अशा भीषण परिस्थितीत पंतप्रधानांना आपली प्राथमिकता नवी संसद वाटत असेल तर त्या व्यक्तीला खरंच तुमच्या जीवाची काळजी असेल का?
स्वतःला विश्वगुरु म्हणवून घेत स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घेणारे आपले राज्यकर्ते खरंच आपल्याला वाचवण्यासाठी किती आणि काय करत आहेत? ज्यांना आपण निवडून दिले आहे त्यांना खरंच आपल्या जीवाची काळजी आहे का?
– विशाल पेटारे