Monday, December 23, 2024
Homeराज्यमराठा समाजाला शिक्षण आणि रोजगारासाठीच्या आरक्षणापासून वंचित ठेवण्यास भाजप सरकारच जबाबदार –...

मराठा समाजाला शिक्षण आणि रोजगारासाठीच्या आरक्षणापासून वंचित ठेवण्यास भाजप सरकारच जबाबदार – माकप

मुंबई : जालन्याजवळील आंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सनदशीर मार्गाने आंदोलन करणाऱ्या गावकऱ्यांवर पोलिसांनी निर्घृण अत्याचार केला. महाराष्ट्र सरकारच्या या अमानुष कृत्याचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने निषेध केला आहे. या पोलिसी अत्याचारास कारणीभूत असलेल्या अधिकाऱ्यांस ताबडतोब निलंबित करून या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव डॉ. उदय नारकर यांनी केली आहे. The BJP government is responsible for depriving the Maratha community of reservation for education and employment – ​​CPIM

डॉ. नारकर म्हणाले, या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले निवेदन केवळ अपुरे नसून मराठा तरूणांची दिशाभूल करणारे आहे. ते आणि भाजपचे नेते सांगत असलेले उपाय ही समाजाच्या डोळ्यात केलेली धूळफेक आहे. आज घटनेच्या चौकटीत हा विषय सुटण्यासाठी ठोस उपाय करण्याची गरज आहे.

मराठा समाजाला शिक्षण व रोजगारात आरक्षण देण्यासाठी ५० टक्क्यांची मर्यादा काढून टाकण्यासाठी घटना दुरूस्ती हा एकमेव पर्याय आहे. त्या दृष्टीने भाजपच्या मोदी सरकारने काडीचाही प्रयत्न केला नाही. उलट आता मराठा समाजबांधव लोकशाही मार्गाने आंदोलन करत असताना शिंदे-फडणवीस-अजित पवार सरकार त्यांच्यावर लाठीमार आणि गोळीबार करत आहे.

राज्यातील शेतीत घाम गाळून आजवर सोने पिकवणारा हा शेतकरी समुदाय सरकारच्या धोरणाने कंगाल होऊ लागला आहे. त्याचा शेतीमाल कवडीमोलाने विकला जात आहे. दुसरीकडे लाखो सुशिक्षित तरूण तरूणी शासकीय पदांना पात्र असूनही त्यांना नोकरी दिली जात नाही. योग्य शिक्षणाची तसेच शासकीय व निमशासकीय नोकरीची हमी न देता इतर उपायांची भलावण फजूल आहे. 

शेती संकटाने जर्जर झालेल्या या समाजाला आरक्षण देण्यासाठी केंद्रातील भाजप सरकारने त्वरित घटनादुरूस्ती करण्यासाठी पावले उचलावीत, या मागणीचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष पुनरुच्चार करत आहे. त्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे तसा ठोस आग्रह धरला पाहिजे. जनतेची कसलीही मागणी नसलेल्या प्रश्नांसाठी मोदी सरकार संसदेचे विशेष अधिवेशन भरवण्याचा प्रयत्न करत आहे. अशा प्रस्तावित अधिवेशनात केंद्र सरकारने मराठा आणि आरक्षणाला वंचित असलेल्या तत्सम समाजांना आरक्षण देण्यासाठी घटनादुरूस्ती करणारे विधेयक लगेच सादर केले पाहिजे.

असे न करता भाजप राजकीय स्वार्थासाठी जाती आणि धर्माच्या आधारे समाजासमाजात वितुष्ट निर्माण करत आहे. मराठा समाजाला आरक्षण हे सामाजिक न्यायाच्या लढाईतील महत्त्वाचे सकारात्मक पाऊल आहे. सामाजिक न्यायाशी कटिबद्ध असलेल्या सर्व शक्तींनी मराठा समाजाच्या न्याय्य लढ्यात अग्रभागी राहावे, असे आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केले आहे. 

संबंधित लेख

लोकप्रिय