नवी दिल्ली : अमेरिकेच्या नौदलाचे (American Navy) युद्ध जहाज लक्षद्वीप बेटांच्या (Lakshadweep Islands) जवळ भारताच्या विशेष आर्थिक सागरी क्षेत्रात आतपर्यंत घुसलंय. अमेरिकेच्या नौदलाने लक्षद्वीप बेटांजवळ भारताच्या हद्दीत ‘नौपरिवहन स्वतंत्रता अभियान’ सुरु केलंय. या अभियानाची सुरुवात 7 एप्रिललाच झालीय. ‘फ्रीडम ऑफ नेविगेशन ऑपरेशन’ अंतर्गत आम्ही हे जहाज भारतीय हद्दीत आणलं आहे, असा दावा यूएस नौदलाने (US Navy) केलाय. अमेरिकेच्या या निर्णयाने भारत-अमेरिकेतील संबंधावर (India-US relations) वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे
अमेरिकेच्या सातव्या फ्लीट कमांडरकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटलंय, “7 एप्रिल 2021 रोजी यूएसएस जॉन पॉल जोन्सने (डीडीजी 53) भारताच्या परवानगीशिवाय आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार भारताच्या विशेष आर्थिक क्षेत्रात प्रवेश केला. लक्षद्वीप द्वीपसमूहाच्या पश्चिमेकडील जवळपास 130 समुद्री मील अंतरावर नौपरिवहन अधिकार आणि स्वतंत्रता अभियान सुरू करण्यात आले आहे. हे सर्व आंतरराष्ट्रीय कायद्याप्रमाणे करण्यात आलं आहे. नौपरिवहन स्वतंत्रता अभियानाला भारताच्या समुद्री दाव्यांना आंतरराष्ट्रीय कायद्यांनुसार आव्हान देत समुद्राच्या कायद्यांच्या वापराचा अधिकार आणि स्वातंत्र्य आहे.”
भारताच्या समुद्री हद्दीत घुसण्यासाठी आधी भारताच्या परवानगीची आवश्यकता
यूएस नौदलाच्या निवेदनाने भारताच्या चिंतेत वाढ होणार आहे. कारण अमेरिका भारताच्या सर्वात जवळच्या भागीदारांपैकी एक आहे. दोन्ही देशांनी दक्षिण चीन सागरात चीनच्या समुद्री विस्तारवादाला विरोध केला आहे. भारत आणि अमेरिका वर्षभर नौदल सराव करत असतात. असं असलं तरी भारताच्या विशेष आर्थिक क्षेत्रात सैन्य सराव किंवा अभियानासाठी भारताची आधी परवानगी घेणं आवश्यक आहे.
मोदी सरकारकडून या विषयावर कोणतीही प्रतिक्रिया नाही
भारतीय नौदल आणि परराष्ट्र मंत्रालयाकडून या घडामोडींवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. यंदा फेब्रुवारीत क्वाड ग्रुपच्या बैठकीत सदस्य देशांनी परस्पर सहकार्य आणि मुक्त हिंद-प्रशांत महासागर क्षेत्रासाठी प्रयत्न करण्याबाबत प्रण केलाय. यासाठी नेविगेशन आणि क्षेत्रीय अखंडता आणि स्वातंत्र्याला पाठिंबा देण्यात येणार आहे. या क्वाड ग्रुपमध्ये अमेरिका, भारत, जपान आणि ऑस्ट्रेलियाचा समावेश आहे. या गटाचा उद्देश हिंद आणि प्रशांत महासागर क्षेत्रात चीनची वाढती दादागिरी संपवणं हा आहे.