Saturday, December 7, 2024
Homeराज्यराज्यात "या" भागात मेघगर्जना, वीजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वार्‍यासह पाऊसाची शक्यता

राज्यात “या” भागात मेघगर्जना, वीजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वार्‍यासह पाऊसाची शक्यता

पुणे : विदर्भ ते दक्षिण तमिळनाडूच्या अंतर्गत भागापर्यंत उत्तर – दक्षिण कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्याचाच परिणाम म्हणून शनिवार पासून पुढील चार दिवस संपूर्ण राज्यात मेघगर्जना आणि वीजांच्या कडकडाटात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज शुक्रवारी हवामान विभागाने वर्तविला.

महाराष्ट्रात मागील आठवड्यामध्ये कडक उन्हाळ्यामुळे अनेकांना घामांच्या धारा लागल्या होत्या. पण आता मध्य महाराष्ट्र सह, मराठवाडा, विदर्भ, कोकणातही पारा खाली उतरला आहे. सध्या महाराष्ट्रात ढगाळ वातावरण असूम हवामान खात्याकडून पावसासह गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान काल सातारामध्ये काही ठिकाणी तुरळक पावसाच्या धारा बरसल्याचे पहायला मिळाले.

कोकण आणि गोव्यात ढगाळ वातावरण असणार आहे. काही भागात पाऊस पडणार आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जना, वीजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वार्‍यासह पाऊस पडणार आहे. येत्या मंगळवारपर्यंत राज्यातील बहुतांश भागात पाऊस कायम असणार असल्याचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. दरम्यान, मागील 24 तासात विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडला. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे होते. काल राज्यात चंद्रपूर येथे उच्चांकी 43.4 अंश कमाल तपमानाची नोंद झाली.

IMD च्या के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (दि. 10 एप्रिल ) कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रमध्ये पावसासह वीजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट होण्याची शक्यता आहे.

यावेळेस जोरदार वारे देखील वाहू शकतात. तर विदर्भामध्ये वीजांच्या कडकडाटासह काही भागांत गारपीट होण्याची शक्यता आहे. वातावरणातील हा बदल रविवार पर्यंत कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सध्या उन्हाचा पारा 40 अंश पेक्षा खाली आल्याने सरासरी पेक्षा कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान राज्यात सध्या अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर असलेल्या विदर्भ ते दक्षिण तमिळनाडू या भागातील उत्तर – दक्षिण भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाची स्थिती आहे .


संबंधित लेख

लोकप्रिय