पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : नखाते वस्ती, सिंहगड कॉलनीत नाल्याचे अर्धवट काम सोडून जाणाऱ्या ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवशाही व्यापारी संघटनेचे अध्यक्ष व शिवसेना नेते युवराज दाखले यांनी पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह यांचेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रहाटणी नखाते वस्ती सिंहगड कॉलनी मध्ये 2022 रोजी नोव्हेंबर डिसेंबरच्या कालावधीत या भागामधून जाणारा मोठा नाला दुरुस्ती करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने विजय पवार ठेकेदार यांना काम दिले, त्यांनी ते काम सुरू ही केले. स्लॅब व नाला तोडण्यात आला, नाल्याच्या आतील बाजूस सिमेंट प्लास्टर करण्यात आले.
परंतु त्याच्यानंतर मागील 10 महिन्यापासून नाल्यावरील स्लॅब अद्यापही टाकण्यात आलेला नाही, या ठिकाणी पाहणी केली असता काम पूर्णपणे बंद आहे. स्थानिक नागरिकांनी ठेकेदार यांना अनेक वेळा कॉल केला, येतो – करतो असे बोलत उडवाउडवीची उत्तरे दिली गेल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
पावसाळ्याचे दिवस आहेत, नागरिकांच्या दारामध्ये लहान मुलं खेळतात. पावसाळा चालू असल्यामुळे नाल्यात पडून लहान मुलं वाहून जाण्याची एखादी घटनाही घडू शकते, तसेच पाऊस थांबला की घाण गटरामध्ये थांबली जाते, त्या वासाचा त्रास व त्यामुळे मच्छर होतात. मग डेंगू मलेरिया यासारख्या आजाराला रोगाला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.
त्यातच आता डोळ्याच्या साथीने डोके वर काढले आहे, याही आजाराचा नागरिकांना त्रास होत आहे. लहान मुलं खेळताना गटारात पडू शकतात रात्रीचा या ठिकाणी लाईटचे खांब होते, ते सुद्धा ठेकेदाराने सिमेंट काँक्रीट रोडच्या कामाच्या वेळी तोडून टाकले असल्याचे नागरिक सांगतात, ते अद्यापही परत नवीन बसवण्यात आले नाहीत.
येथील कामाची तात्काळ गंभीर दखल घेऊन संबंधित ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करून कामे पूर्ण करावीत, अन्यथा शिवसेना व शिवशाही व्यापारी संघाच्या वतीने येथील नागरिकांना सोबत घेऊन आंदोलन केले जाईल, अशी मागणी युवराज दाखले यांनी केली आहे.