मुंबई : एसटी कर्मचारी विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुन्हा एकदा आक्रमक झाले असून ऐन गणपतीच्या तोंडावर त्यांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे. पगारवाढ, पदोन्नती या प्रलंबित आर्थिक मुद्द्यांच्या सोडवणुकीसाठी एसटी कर्मचाऱ्यांच्या मान्यताप्राप्त संघटनेने 11 सप्टेंबर ला संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. (ST Strike)
मुंबईतील आझाद मैदानात 13 सप्टेंबर पासून हे कर्मचारी बेमुदत उपोषण करणार आहेत. जर सरकारने ऐकले नाही तर 13 सप्टेंबरपासून प्रत्येक जिल्ह्यात, तसेच प्रत्येक आगारात कर्मचारी काम बंद करून उपोषणाला बसणार आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीतहा निर्णय घेण्यात आला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या मान्यताप्राप्त संघटनेने प्रलंबित मागण्यांसाठी संपाची हाक दिली आहे. या बैठकीत करारातील तरतुदीनुसार सरकारने 42% महागाई भत्ता त्वरीत लागू करावा, घरभाडे भत्ता, वेतनवाढीचा दर यांचा फरक त्वरीत अदा करावा, मूळ वेतनात जाहीर झालेल्या पाच हजार, चार हजार, अडीच हजारामुळे सेवाज्येष्ठ कर्मचा-यांच्या वेतनात निर्माण झालेल्या विसंगती दूर कराव्यात अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे. दरम्यान गणपतीचा सण 19 सप्टेंबरला आहे. 11 सप्टेंबरला ही संपाची हाक देण्यात आली आहे.
दहा वर्षांसाठी सातवा वेतन आयोग लागू करावा. एसटीची धाववेळ (रनिंग टाईम) निश्चित करावी.तसेच वाहकांचे (कंडक्टर) बदली धोरण रद्द करावे, खाजगी गाड्यांऐवजी स्वमालकीच्या नवीन बसेसचा पुरवठा त्वरीत करण्यात यावा. लिपिक- टंकलेखक पदाच्या बढतीसाठी 240 हजर दिवसांची अट रद्द करावी. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पत्नीसह व विद्यमान कर्मचाऱ्यांना महामंडळाच्या सर्व प्रकारच्या गाड्यांचा वर्षभर मोफत फॅमिली पास देण्यात यावा.अनेक विभागात 10-12 वर्षापासून कर्मचारी TTS आहेत त्यांना एकवेळची बाब म्हणून TS करण्यात यावे, जुल्मी शिस्त व आवेदन कार्यपद्धती त्वरीत रद्द करावी, अशा मागण्या संघटनेने केल्या आहेत.