Monday, December 23, 2024
Homeविशेष लेखविशेष लेख : कॉ. शामराव परुळेकर : एक उत्तुंग कम्युनिस्ट व किसान...

विशेष लेख : कॉ. शामराव परुळेकर : एक उत्तुंग कम्युनिस्ट व किसान नेते

आज ३ ऑगस्ट हा कॉ. शामराव परुळेकरांचा ५८ वा स्मृतिदिन. ३ ऑगस्ट १९६५ रोजी वयाच्या ६३ व्या वर्षी त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात स्थानबद्ध असतानाच अकस्मात निधन झाले.

कॉ. शामराव तेव्हा आदल्या वर्षीच स्थापन झालेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पहिल्या केंद्रीय कमिटीचे सदस्य होते. ते अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य किसान सभेचे संस्थापक व अग्रगण्य नेते होते. कॉ. गोदावरी परुळेकर यांच्यासोबत ते ठाणे जिल्ह्यातील ऐतिहासिक वारली आदिवासी उठावाचे प्रणेते होते.

सुरुवातीची वर्षे

शामरावांचा जन्म २ ऑक्टोबर १९०२ रोजी कर्नाटक राज्याच्या विजापूर जिल्ह्यातील एका जमीनदार कुटुंबात झाला. त्यांचे वडील अक्कलकोट संस्थानाचे दिवाण होते. घरी गर्भश्रीमंती होती. शालेय व महाविद्यालयीन शिक्षण विजापूर व पुण्यात करून ते पदव्युत्तर शिक्षणासाठी मुंबईला आले. एम.ए. साठी तत्त्वज्ञान हा विषय घेऊन त्यांनी मुंबई विद्यापीठात फर्स्ट क्लास मिळवला. त्या काळात हा अत्यंत विरळ असा विक्रम होता.

पुढील शिक्षणासाठी त्यांनी इंग्लंडला जाऊन बॅरिस्टर बनावे ही त्यांच्या वडिलांची इच्छा होती. पण स्वातंत्र्यलढ्याच्या भावनेने शामरावांची पकड घेतली होती. त्यांनी इंग्लंडला जाण्याचे साफ नाकारले, मुंबईतच कायद्याची पदवी घेतली आणि १९२८च्या आसपास ते सर्व्हन्टस ऑफ इंडिया सोसायटी (भारत सेवक समाज) या संस्थेत अत्यल्प वेतनावर पूर्णवेळ कार्यकर्ते बनले. सुप्रसिद्ध कामगार नेते ना. म. जोशी तेव्हा तेथे प्रमुख होते.

या सर्व घटनाक्रमामुळे शामरावांचे वडील संतप्त होऊन शामरावांचा वारसाहक्क काढून घेण्याची त्यांनी धमकी दिली. तेव्हा शामरावांनी लगेच उत्तर पाठवले की, आपल्या वारसाहक्काचा त्याग करणारे कायदेशीर दस्तऐवज त्यांनी आधीच तयार करून ठेवले आहेत ! तेव्हापासून त्यांचे कौटुंबिक संबंध संपुष्टात आले.

त्याच वेळेस भारत सेवक समजामध्ये असेच पूर्णवेळ काम करत असलेल्या गोदावरी गोखले यांची नेमकी तशीच कहाणी होती. त्यांचा जन्म पुण्यात १४ ऑगस्ट १९०७ चा, काँग्रेसचे सुप्रसिद्ध नेते गोपाळ कृष्ण गोखले यांच्या घराण्यात. गोदूताई या महाराष्ट्रातील पहिल्या महिला वकील झाल्या. त्यांचे वडील प्रख्यात वकील होते. आपल्यासोबत मुलीने वकिली करावी ही त्यांची इच्छा. पण गोदूताईंनी स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली आणि १९३२ साली सत्याग्रहात भाग घेतल्याबद्दल त्यांना पहिला तुरुंगवास झाला. वडील नेमस्त विचारांचे होते. गोदूताई तुरुंगातून बाहेर पडताच त्यांनीही गोदूताईंशी सर्व संबंध तोडून टाकले. त्यानंतर मुंबईत येऊन त्याही भारत सेवक समाजात कार्यरत झाल्या आणि तेथे पहिल्या आजीव महिला सभासद बनल्या.

स्वतंत्र मजूर पक्षासोबत कार्य, आमदार म्हणून निवड

तिशीच्या दशकाच्या मध्यात शामराव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या स्वतंत्र मजूर पक्षाशी संबंधित होते. जातपातविरोधी लढयांशी त्यांचा घनिष्ठ संबंध आला. १९३७ साली स्वतंत्र मजूर पक्षाच्या समर्थनाने शामरावांची कोकणाच्या रत्नागिरी जिल्ह्यातून अपक्ष आमदार म्हणून निवड झाली. खोती या जमीनदारी पद्धतीविरुद्ध आंबेडकरांनी विधानसभेत विधेयक मांडले. १९३८ साली त्याच्या समर्थनार्थ शामरावांनी कोकणातील १० हजार शेतकऱ्यांचा प्रचंड मोर्चा मुंबईत बोटींनी आणला! या लढ्यात बाबासाहेबांसोबत आर. बी. मोरे, अनंतराव चित्रे, शेकापचे नेते नारायण नागू पाटील हे होते.

कामगारांमधील लढाऊ कार्य

काही वर्षे शामरावांनी कामगार चळवळीत उत्कृष्ट काम केले. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथच्या कामगारांचे अनेक संपलढे त्यांनी लढवले आणि जिंकले.

१९३८ मध्ये जिनेव्हा येथे झालेल्या आय.एल.ओ. च्या आंतरराष्ट्रीय कामगार परिषदेसाठी स्वतंत्र मजूर पक्षातर्फे शामरावांची निवड झाली. भारतीय कामगारवर्गाच्या दैन्यावस्थेचे विदारक विश्लेषण करणारे त्यांचे भाषण इतके उत्कृष्ट होते की, ज्येष्ठ ब्रिटिश कम्युनिस्ट नेते रजनी पाम दत्त यांनी त्यांच्या “इंडिया टुडे” या गाजलेल्या पुस्तकात त्यातील काही उतारे दिले आहेत.

कम्युनिस्ट पक्षात प्रवेश

२४ मे १९३९ रोजी शामराव आणि गोदूताई विवाहबद्ध झाले आणि त्याच वर्षी त्या दोघांनी कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला.

दुसरे महायुद्ध त्याच वर्षी सुरू झाले आणि कम्युनिस्ट पक्षाने हे साम्राज्यवादी युद्ध असल्याचे योग्य विश्लेषण करून युद्धविरोधी मोहीम सुरू केली. त्यात शामराव, गोदूताई व इतर अनेक कम्युनिस्टांना १९४०-४२ अशी दोन वर्षे तुरुंगवास घडला.

महाराष्ट्र राज्य किसान सभेची स्थापना

१९४२ साली तुरुंगातून सुटल्यावर मात्र दोघांनी किसान सभेमार्फत शेतकऱ्यांमध्ये पूर्णतः काम करण्याचा निर्णय घेतला. ११ एप्रिल १९३६ रोजी (योगायोगाने महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीदिनी) स्थापन झालेल्या अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाने महाराष्ट्रात संघटना उभारण्याची जबाबदारी शामरावांवर सोपवली. तीन वर्षे ठाणे जिल्ह्याच्या बिगर आदिवासी शेतकऱ्यांत अथक काम करून, त्यांचे लढे लढवून, आणि त्याचबरोबर महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांशी संबंध जोडून, अखेर ७ जानेवारी १९४५ रोजी महाराष्ट्र राज्य किसान सभेचे स्थापना अधिवेशन ठाणे जिल्ह्यात टिटवाळा येथे यशस्वी झाले.

त्याची भरपूर तयारी करण्यात आली. ७०० खेड्यांत फिरून १६० सभा घेतल्याचे गोदूताईंनी लिहून ठेवले आहे. प्रचारासाठी अण्णा भाऊ साठे, अमर शेख व दत्ता गव्हाणकर यांचे तेव्हा नवेच असलेले लाल बावटा कलापथक गावोगाव फिरले. अनेक जिल्ह्यांतील ७०००हून अधिक शेतकरी अधिवेशनासाठी आले.

या स्थापना अधिवेशनात अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्याचे बुवा नवले (किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांचे चुलत आजोबा) महाराष्ट्र राज्य किसान सभेचे पहिले अध्यक्ष म्हणून निवडले गेले. शामराव यांची पहिले सरचिटणीस म्हणून आणि गोदूताईंची सहसचिव म्हणून निवड झाली.

ठाणे जिल्ह्यातील अभूतपूर्व वारली आदिवासी उठाव

या अधिवेशनाच्या तयारीसाठी शामराव प्रथमच ठाणे जिल्ह्याच्या उत्तरेच्या डहाणू-उंबरगाव (आता तलासरी) या आदिवासी विभागात गेले होते. तेथील अमानवी जमीनदारी-सावकारी शोषण पाहून ते थक्क झाले.

१५ आदिवासी प्रतिनिधी टिटवाळ्याच्या अधिवेशनाला आले आणि माह्या धांगडाने तेथील भयानक परिस्थिती मांडली. अधिवेशन स्तब्ध झाले आणि वेठबिगार रद्द करण्याचा ठराव केला. मंडपाला बांधलेले लाल बावटे घेऊन आदिवासी प्रतिनिधी घरी परतले.

शामराव आणि गोदूताईंनी अनेक सभा घेतल्यानंतर २३ मे १९४५ रोजी तलासरी तालुक्यात झरी या गावी ५००० आदिवासींची परिषद भरली आणि किसान सभेच्या नेतृत्वाखाली वेठबिगारीविरुद्ध जबरदस्त उठाव सुरू झाला. आदिवासींच्या विशाल आणि लढाऊ एकजुटीतून काही महिन्यांतच वेठबिगार, लग्नगडी आणि भूदास पद्धत नष्ट करण्यात आली.

त्यानंतर मजुरीच्या प्रश्नावर घनघोर लढे झाले. आधी ब्रिटिश व नंतर काँग्रेस सरकारची प्रचंड दडपशाही झाली. लढा चिरडण्यासाठी ब्रिटिश लष्कर पाठविण्याचे प्रयत्न झाले, पण मुंबईच्या कामगारवर्गाने संपाचा इशारा दिल्यामुळे ते प्रयत्न निष्फळ ठरले.

१० ऑक्टोबर १९४५ रोजी तलवाड्याच्या गोळीबारात जेठ्या गांगड व इतर चार आदिवासी शहीद झाले. ते या उठावातील पहिले हुतात्मे होते. पुढे नानिवली व इतरत्र अनेक गोळीबार झाले. आजवर ठाणे-पालघर जिल्ह्यात ब्रिटिश, काँग्रेस व भाजपच्या राज्यात मिळून लाल बावट्याचे एकूण ६१ हुतात्मे झाले आहेत.

१९४५-४७ अशी तीन वर्षे सातत्याने लढवल्या गेलेल्या या ऐतिहासिक संघर्षांत आदिवासींचा नेत्रदीपक विजय झाला. नंतर जमिनीची मालकी, फॉरेस्ट प्लॉट कसणाऱ्यांच्या नावावर करणे व इतर अनेक प्रश्नांवर संघर्ष झाले आणि अजूनही होत आहेत.

नगर हवेलीची मुक्ती, संयुक्त महाराष्ट्र चळवळ

१९५४ मध्ये शामराव आणि गोदूताईंच्या नेतृत्वाखाली कम्युनिस्ट पक्षाने पोर्तुगीज वसाहत असलेल्या नगरहवेलीला मुक्त करण्याचा आणखी एक ऐतिहासिक लढा यशस्वी केला. त्या लढ्यातील एक प्रमुख नेते एल. बी. धनगर आज ९५ वर्षांचे आहेत. काही महिन्यांपूर्वीच डहाणू तालुक्यात त्यांच्या घरी जाऊन मुक्काम करण्याची आणि मध्यरात्रीपर्यंत जुन्या इतिहासाची उजळणी करण्याची संधी मला मिळाली.

संयुक्त महाराष्ट्र चळवळीने पन्नाशीच्या दशकाच्या उत्तरार्धात पेट घेतला. ठाणे जिल्ह्याचा आदिवासी भागही त्यात अग्रेसर होता आणि शेकडो आदिवासीना तुरुंगवास घडला. संयुक्त महाराष्ट्राच्या या लढयामुळे १९५७च्या लोकसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातून सर्वसाधारण जागेवरून शामराव परुळेकर आणि आदिवासी जागेवरून लक्ष्मण मातेरा हे दोन कम्युनिस्ट खासदार लोकसभेवर निवडून गेले. तसेच क्रांतिसिंह नाना पाटील, दादासाहेब गायकवाड, उद्धवराव पाटील, श्रीपाद अमृत डांगे व इतर डावे नेते संसदेत व विधानसभेत निवडून गेले.

मे १९५५ साली अखिल भारतीय किसान सभेचे १३वे राष्ट्रीय अधिवेशन डहाणू येथे भरले. ह्या अधिवेशनात क्रांतिसिंह नाना पाटील यांची अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना

प्रदीर्घ पक्षांतर्गत संघर्षानंतर कोलकाता येथे झालेल्या ७व्या पक्ष काँग्रेसमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली. पण त्यापूर्वीच १९६२ ते १९६६ अशी साडेतीन वर्षे देशातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील पक्ष नेतृत्व सरकारने तुरुंगात डांबून ठेवले होते. तुरुंगात असतानाच बी. टी. रणदिवे यांची मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पहिल्या पॉलिटब्युरोत, आणि एस. वाय. कोल्हटकर व शामराव परुळेकर यांची पहिल्या केंद्रीय कमिटीत निवड झाली.

“एक बार उडाला”

मात्र त्यानंतर काही महिन्यांतच ३ ऑगस्ट १९६५ रोजी शामराव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने तुरुंगातच धक्कादायक निधन झाले. एक अत्यंत असामान्य कम्युनिस्ट व किसान नेते अवेळी गेले. त्यामुळे महाराष्ट्रातील पक्षाची आणि किसान सभेची अपरिमित हानी झाली.

शामरावांच्या अंत्ययात्रेसाठी हजारोंचा जमाव होता. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी पुढील उदगार काढले, “शामराव आणि गोदूताई हे दोघेही शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करणारी एक डबल बॅरलची बंदुक होती. त्यातील एक बार आज उडाला आहे.”

गोदूताईंचे भरीव कार्य

शामरावांचे निधन म्हणजे गोदूताईंवर वज्राघातच होता. पण त्यातूनही सावरून गोदूताईंनी लिहिलेले अविस्मरणीय पुस्तक “जेव्हा माणूस जागा होतो” १९७० साली प्रकाशित झाले. त्याला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. त्याच्या प्रस्तावनेत गोदूताईंनी लिहिले, “अनेक वेळा मी प्रस्तावना लिहावयास बसले. दर वेळी डोळ्यांतून ओघळणाऱ्या अश्रूंमुळे कागद बाजूला करावे लागले. निवेदन लिहावयास घेतले की माझे प्रिय पती कॉ. शामराव यांच्या स्मृती दाटून येतात. अंतःकरणाला असह्य वेदना होतात. हृदयातून कळा येतात. आसवे ओघळू लागतात. मला स्वतःला मी अपराधी आहे हे जाणवू लागते.”

महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या स्थापनेचे आणि वारली आदिवासी उठावाचे २०२० हे जसे अमृतमहोत्सवी वर्ष होते, तसेच या पुस्तकाच्या प्रकाशनाचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष होते.

गोदूताईंनी पुढेही अत्यंत भरीव कार्य केल्यानंतर १९८६ साली पाटणा येथे झालेल्या अखिल भारतीय किसान सभेच्या २५व्या सुवर्णमहोत्सवी राष्ट्रीय अधिवेशनात गोदूताईंची अखिल भारतीय किसान सभेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली. त्या आजवर किसान सभेच्या एकमेव महिला राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.

८ ऑक्टोबर १९९६ रोजी वयाच्या ९०व्या वर्षी गोदूताईंची प्राणज्योत मालवली. १० ऑक्टोबर रोजी तलासरीत झालेल्या त्यांच्या अंत्ययात्रेला त्यांचे हजारों हजार प्रिय आदिवासी शेतकरी संपूर्ण जिल्ह्यातून आले होते. राज्यातून आणि देशातून पक्षाचे, किसान सभेचे, सीटूचे, अन्य जनसंघटनांचे आणि मित्रपक्षांचे नेतृत्व हजर होते.

गोदूताईंचे मृत्युपत्र पक्षाचा एक अमोल ठेवा आहे. त्यात त्यांनी आपली सर्व स्थावर आणि जंगम संपत्ती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला देऊन टाकली. अशी खूपच विरळ उदाहरणे आहेत.

असे होते शामराव आणि गोदूताईंचे असामान्य कर्तृत्वाचे क्रांतिकारक जीवनकार्य – येणाऱ्या पिढयांना व समग्र देशप्रेमी जनतेला सदैव स्फूर्ती व अखंड प्रेरणा देणारा, कधीही न आटणारा एक अभूतपूर्व क्रांतिकारक झरा !

डॉ. अशोक ढवळे
(लेखक, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरोचे सदस्य असून अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.)

संबंधित लेख

लोकप्रिय