Thursday, May 2, 2024
Homeविशेष लेखविशेष लेख:तृणधान्य नियमित आहारात,आरोग्य नांदेल घराघरात

विशेष लेख:तृणधान्य नियमित आहारात,आरोग्य नांदेल घराघरात

तृणधान्याचे जाणू महत्त्व…मिळेल त्यातून जीवनसत्व

पौष्टिक तृणधान्य हे आपले पारंपरिक, पोषणयुक्त, पौष्टिक,आरोग्यदायी अन्न असून त्याचा दिवसेंदिवस आहारातील वापर कमी होत आहे. त्यामुळे आपल्याला विविध आजारांचा सामना आपल्याला करावा लागत आहे,बदलत्या जीवनशैलीत आहाराकडे होत असलेले दुर्लक्ष आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या आजारावर मात करण्याकरीता ज्वारी,बाजरी,नाचणी,राळा,वरई, कोदो,कुटकी,सावा,राजगिरा यासारखी पौष्टिक तृणधान्यांचा आहारात समावेश करण्याची गरज भासत आहे.
आगामी काळात निरोगी आयुष्य जगण्यासाठी आहारात तृणधान्याचे महत्व अधिक प्रमाणात वाढणार आहे.त्यामुळे प्रत्येकांनी आपल्या आहारात तृणधान्यांचा अधिकाधिक समावेश करुन शेतकऱ्याला आर्थिकदृष्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
तृणधान्याच्या सेवनामुळे शरीरपोषणासाठी कमी खर्चात अधिक प्रमाणात ऊर्जा तृणधान्यांतून मिळतात.तंतूमय पदार्थाव्यतिरिक्त तृणधान्ये ही खनिजे,बी कॉम्प्लेक्स,जीवनसत्वे, लोह, कॅल्शियम व जस्त यांसारख्या सूक्ष्म पोषक घटकांनी समृद्ध आहेत.तृणधान्याच्या सेवनामुळे रक्तातील ग्लुकोज नियंत्रणात राहते.तृणधान्ये ही आरोग्याला चालना देणाऱ्या फायटोकेमिकल्स, फिनोलिक संयुगे,टॅनिन यांसारख्या घटकांनी समृद्ध असून त्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स गुणधर्म आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या २०२१ च्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, तृणधान्यांमुळे टाईप २ च्या मधुमेहाचा धोका कमी होण्यास व मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये एचबीए १ सी चे प्रमाण कमी होण्यास मदत होऊ शकते.

तृणधान्ये पचनक्रिया सुधारण्यास मदत

तृणधान्ये आपल्याला पोषणविषयक सुरक्षा पुरवितात.तृणधान्ये ही तंतूमय पदार्थांनी समृद्ध असलेली धान्य असून ती मानवी आतड्यामधील सूक्ष्म जीवसमूहासाठी चांगले जीवाणू म्हणून कार्य करतात, तृणधान्यांतील तंतूमय  पदार्थ स्थूलांत्रे सजल ठेवतात आणि चयापचय क्रिया अतिशय चांगल्या स्थितीत ठेवतात. अशा प्रकारे तृणधान्य ही पचनविषयक आरोग्य चांगले ठेवण्यात योगदान देतात व आतड्यातील हालचाली नियमित ठेवण्यास मदत करतात.

रागी किंवा नाचणी (फिंगर मिलेट)

नाचणी एक अत्यंत महत्त्वाचे तृणधान्य पीक आहे. नाचणीमध्ये असणाऱ्या पौष्टिक घटकांचा विचार करता या धान्यास तत्सम तृणधान्य न संबोधता सत्त्वयुक्त धान्य म्हणणे जास्त योग्य ठरेल. नाचणी हे प्रामुख्याने डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या‍ आदिवासी लोेकांचे प्रमुख अन्न आहे.
 नाचणी हे सर्वाधिक पोषक तृणधान्य मानले जाते. प्रथिने,तंतूमय  घटक व खनिजे यांचा उत्तम स्रोत आहे. नाचणीमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम व पोटॅशियम असते नाचणीमध्ये असलेल्या कमी ग्लायसेमिक संवेदनशीलतेमुळे नाचणीयुक्त आहारामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तीच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यात मदत होते. रक्तदाब, यकृताचे विकार व दमा आजराच्यावेळी तसेच स्तनपान करणाऱ्या मातांसाठी नाचणीयुक्त आहार घेण्याची शिफारस करण्यात येते. नैसर्गिक लोह भरपूर प्रमाणात असते आणि त्याच्या सेवनामुळे अशक्तपणा दूर होण्यास मदत होते.


वरई (प्रोसो मिलेट)

वरी, वरई किंवा भगर हे भारतात उगवणारे एक भरड तथा तृणधान्य आहे. महाराष्ट्रात याच्यापासून भात, पुऱ्या, भाकरी, थालपिठे आदी उपवासाचे अन्नपदार्थ बनतात. हे धान्य वऱ्याचे तांदूळ किंवा भगर म्हणूनही ओळखले जाते.कांग,कोदरी,कोदो,कुटकी,नाचणी,राळे प्रमाणेच या धान्यालाही कनिष्ठ प्रकारचे धान्य समजतात.प्रथिने व फायबर यांचे प्रमाण जास्त असल्याने आरोग्यास हे धान्य पोषक समजले जाते.महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागात याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते.यामध्ये खनिजे,पचनशील तंतूमय  घटक, पॉलिफिनॉल्स,जीवनसत्वे (विटॅामिन) व प्रथिनांनी समृद्ध असल्यामुळे आरोग्यासाठी ते बहुगुणी ठरते. ग्लुटेनयुक्त आहाराचा त्रास असलेल्या लोकांसाठी फायदेशीर आहे.वरईमध्ये उच्च पातळीचे लेक्टिनिन असते त्यामुळे मेंदू विषयक आरोग्यासाठी ते उपयुक्त ठरते.याचा ग्लायसेमिक निर्देशांक कमी असून टाईप २ मधुमेह असलेल्या मधुमेहींसाठी उत्तम अन्न ठरते.

कांगणी किंवा राळा फॉक्सटेल तृणधान्य 

राळा साधारणपणे हलक्या पिवळसर रंगाचे आणि मोहरीच्या बियांच्या आकाराचे असते. राळ्यामध्ये अनेक पौष्टिक गुणधर्म असतात.हे सर्व गुणधर्म बघता राळ्याचा नियमित वापर आहारामध्ये होणे गरजेचे आहे,राळ्याला इंग्रजीमध्ये फॉक्सटेल मिलेट किंवा इटालियन मिलेट आणि हिंदीमध्ये कांगणी किंवा ककूम असे संबोधले जाते.राळा साधारणपणे हलक्या पिवळसर रंगाचे आणि मोहरीच्या बियांच्या आकाराचे असते. राळ्यामध्ये अनेक पौष्टिक गुणधर्म असतात,हे सर्व गुणधर्म बघता राळ्याचा नियमित वापर आहारामध्ये होणे गरजेचे आहे.फॉक्सटेल तृणधान्य (सेक्टारिआ इटॅलिका) ही मराठीमध्ये कंगणी किंवा राळ या नावाने ज्ञात असून ग्लुटेनमुक्त धान्य आहे, ज्यात तंतूमय  पदार्थ, प्रथिने व खनिजे अधिक प्रमाणात असतात. थियामिन, नियासिन व जीवनसत्व बी-६ आणि मॅग्रेशियम, पोटॅशियम व जस्त या खनिजांचा समावेश असलेला उत्तम स्त्रोत आहे.जाडसर बारीक केलेल्या राळ्याचा उपमा बनवता येतो. तसेच इडली मिक्स, अप्पे मिक्स मध्ये याचा वापर केला जातो.मकर संक्रातीला भोगीला राळ्याचा भात खाल्ला जातो.आंबवून  राळ्याचे पीठ तांदूळ आणि  आणि उडीद डाळीबरोबर आंबवून इडली, डोसा, उत्ताप्पा असे चविष्ट पदार्थ बनवले जातात. हे पदार्थ पचायला हलके तसेच मूल्यवर्धक असतात.कमी शर्करा असलेले अन्न असल्यामुळे रक्तातील साखरचे प्रमाण वाढत नाही. ऑक्सिडीकरण रोधी पदार्थांचा देखील चांगला स्त्रोत असून त्यामुळे आजारांपासून शरीराचे संरक्षण होण्यास मदत होते.


भगर मिलेटस (इथिनोक्लोआ एस्कुलेंटा किंवा जापानी तृणधान्य)

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगातील आदिवासी पारंपरिक पीक म्हणून भगरीचे नियमित उत्पादन घेत असतात.तेथील आदिवासी भगरीला पादी, बर्टी आणि मोर असे म्हणतात.त्यानुसार त्याभागात पांढरी मोर,मोठी मोर,काळी मोर असे भगरीचे पारंपरिक प्रकार दिसून येतात.कृषी विज्ञान केंद्र आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांनी मोठ्या प्रयत्नाने या भगरीला प्रोत्साहन आणि बाजारपेठ मिळवून देऊन हे प्रकार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवले.
भगर हे एक बहुउद्देशीय पिक असून खाद्यान्न व चारा या दोन्हीसाठी त्याची लागवड केली जाते. त्याचे हिंदीमधील सर्वसाधारण नाव सावा व मराठीतील नाव शामुळ आहे.तृणधान्यात प्रथिने, पाचक तंतू,आणि लोह भरपूर प्रमाणात असतात. मॅग्नेशियम, पोटॅशियम व जस्त यासारख्या खनिजांचा उत्तम स्त्रोत आहे,ग्लुटेनयुक्त पदार्थाची संवेदनशीलता असणाऱ्या लोकांसाठी चांगला पर्याय ठरु शकते.


कोद्रा-(ब्राऊन टॉप)

कोद्रा  हे एक अशी खंडातील, विशेषतः भारत आणि नेपाळ मधील भरड आहे.हे एक वार्षिक धान्य असून अनेकदा याला चुकून नाचणी समजले जाते.आणि भारत,फिलीपिन्स,इंडोनेशिया,व्हिएतनाम,थायलंड आणि पश्चिम आफ्रिकेत जिथे ते उगम पावले आहे. भारतातील दख्खनच्या पठाराचा अपवाद वगळता, यापैकी बहुतेक भागात हे किरकोळ पीक म्हणून घेतले जाते ज्यात तमिळनाडू, कर्नाटक,मध्यप्रदेश, गुजरात व महाराष्ट्र इत्यादी राज्यांचा समावेश होतो. हे एक अन्नाचा प्रमुख स्रोत म्हणून पिकवले जाते.हे एक अत्यंत चिवट पीक असून दुष्काळ सहन सहन करणारे असून जिथे इतर पिके जगू शकत नाहीत अशा सीमांत जमिनीवर हे वाढते. साधारणतः ४५० ते ९०० किलो धान्य व १,२०० ते १,५०० किग्रॅ. पेंढा प्रति हेक्टर इतके याचे उत्पन्न होते.भारतात, कोद्रा चे पीठ बनवून त्याची खीर केली जाते.आफ्रिकेत ते भाताप्रमाणे शिजवून खाल्ले जाते.जनावरांच्या चाऱ्यासाठी देखील हा एक चांगला पर्याय आहे.
कोद्रा तृणधान्यात सुमारे ११ टक्के प्रथिने आहेत, आणि प्रथिनांचे पौष्टिकमुल्य फॉक्सटेल बाजरीपेक्षा किंचित चांगले असल्याचे आढळले आहे, परंतु इतर लहान बाजरींच्या तुलनेत ते जास्त आहे.


राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान

पौष्टिक तृणधान्यांचे राज्यातील लागवडीखालील क्षेत्र,उत्पादन व उत्पादकता वाढावी.यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान राबविण्यात येत आहे.या माध्यमातून तृणधान्य उत्पादनाला प्रोत्साहन आणि तृणधान्याच्या महत्त्वाबाबत जनजागृती करण्यात येत आहे.शेतकऱ्यांसाठी पीक प्रात्याक्षिके,सुधारित व संकरीत प्रमाणित बियाण्याचे वितरण, कीड व रोग व्यवस्थापनासाठी औषधांचे वितरण,जैविक खते व सूक्ष्म मूलद्रव्यांचा पुरवठा,विविध यंत्रे व कृषी औजारांचे वाटप,शेतीशाळा व शेतकरी प्रशिक्षणांचे आयोजन होत आहे.जिल्हास्तरीय कार्यशाळांद्वारे पौष्टिक तृणधान्य पिकांच्या उत्पादन वाढ व आहारातील वापर वाढ यासाठी विविध उपक्रम राबविण्याकरिता ११० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.नागरिकांसाठी पौष्टिक आहार आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ असे दोन्ही फायदे असल्याने हे अभियान उपयुक्त ठरणारे आहे.

संकलन- क्रांतिकुमार कडुलकर 

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय