बारामती – आगामी काळात बारामती आर्टिफिशियल इंटेलिजेन्सचे हब होईल, आयबीएम व विद्या प्रतिष्ठान यांच्यात होत असलेला करार ऐतिहासिक आहे.
रोजगाराची निर्मिती, नवशिक्षण आणि संशोधन अशा तीन पातळ्यांवर बारामतीत काम होईल, असे प्रतिपादन आयबीएमचे आशिया खंडाचे राष्ट्रीय व्यवस्थापक विठ्ठल मद्यालकर यांनी केले.
कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञानात विद्यार्थ्यांना पारंगत करण्यासाठी विद्या प्रतिष्ठानने आयबीएम कंपनीसोबत करार केला आहे. या अंतर्गत आयबीएम इनोव्हेशन सेंटर फॉर एज्युकेशनचे या उपक्रमाचे उदघाटन ज्येष्ठ नेते शरद पवार, सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, आयबीएमचे आशिया खंडाचे प्रमुख हरी रामसुब्रमण्यन, राष्ट्रीय व्यवस्थापक विठ्ठल मद्यालकर, बी. बी. आहुजा, विकास खानविलकर, अँड. ए. व्ही. प्रभुणे, सुनेत्रा पवार, राजेंद्र पवार, युगेंद्र पवार, अँड. नीलीमा गुजर, किरण गुजर, डॉ. राजीव शहा, मंदार सिकची यांच्या उपस्थितीत झाले, त्या प्रसंगी मद्यालकर यांनी ही अपेक्षा व्यक्त केली.
या प्रसंगी शरद पवार म्हणाले, आयबीएमचे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर जागतिक पातळीवर मुलांना रोजगाराच्या संधी प्राप्त होतील. पहिल्याच टप्प्यात बारामतीच्या 983 विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमासाठी नावनोंदणी केली आहे, याचा अर्थ विद्यार्थ्यांना याबाबत आस्था वाटते. आर्टिफिशियल इंटेलिजेन्सचा अभ्यासक्रमा बारामतीपुरता सीमीत ठेवायचा नाही, तर ज्या शिक्षण संस्थांना यात पुढे जायचे आहे, त्यांना यात संधी दिली जाईल. जेथे विद्यार्थी संख्या अधिक असेल तेथे आयबीएमचे प्रशिक्षक येऊन प्रशिक्षण देतील. आयबीएमने ही शरद पवार यांची विनंती मान्य केली आहे. अँड. ए.व्ही. प्रभुणे यांनी प्रास्ताविक केले.
एआय ही काळाची गरज….
चीनने वीस वर्षांपूर्वी आर्टिफिशियल इंटेलिजनेसवर काम सुरु केले आहे. आपल्याला जगाशी स्पर्धा करायची आहे, हजारो विद्यार्थ्यांना याचा लाभ व्हावा, नवीन तंत्रज्ञानाचा स्विकार करुन स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजेन्स ही काळाची गरज आहे. अभ्यासक्रमाच्या शुल्कासाठी कर्जप्रस्तावाबाबत बँकांशी बोलणी सुरु आहेत.
– प्रतापराव पवार, अध्यक्ष, सकाळ माध्यम समूह.
बारामती होईल एआय हब…
आयबीएमची जगात फक्त तीस ठिकाणीच शैक्षणिक केंद्र आहे. आता त्यात बारामतीचा समावेश होणार असल्याने येत्या काळात बारामती हे एआय सेंटर, एआय सिटी व एआय हब म्हणून नावलौकीकास येईल. ही पदवी प्राप्त केल्यानंतर जगात आयबीएम पदवी असलेला सक्षम पदवीधर म्हणून युवकांना मान्यता मिळेल.
– बी. बी. आहुजा, सल्लागार, विद्या प्रतिष्ठान.
विद्या प्रतिष्ठानसोबत कराराचा आनंद…
विद्या प्रतिष्ठानसोबत करार झाला याचा आयबीएमला आनंद आहे. विद्यार्थ्यांनी स्पर्धेला सामोरे जाताना स्वताःचे वेगळेपण सिध्द करायला हवे, जे इतरांकडे नाही ते प्राप्त करावे आणि धोका पत्करत बदलांची तयारी कमफर्ट झोनच्या बाहेर येत करायला हवी. योग्य वेळी योग्य ठिकाणी म्हणजे बारामतीत विद्या प्रतिष्ठानमध्ये हे अभ्यासक्रम सुरु होतात ही आनंदाची बाब आहे. मुळ अभ्यासक्रमासह मुलांना सॉफ्टस्किल प्रशिक्षणही दिले जाणार आहे.
– विठ्ठल मद्यालकर, एशिया पॅसिफिक प्रमुख, आयबीएम.