दादर : जेष्ठ कम्युनिस्ट नेत्या कॉम्रेड सुंदर नवलकर यांचे आज दादरच्या राहत्या घरी दु:खद निधन झाले. त्या ९८ वर्षांंच्या होत्या.
मुंबईतील बांधकाम कामगार, असंघटित कामगार, एअर इंडियाच्या कंत्राटी कामगारांना कायम नोकरी मिळविण्यासाठी सुप्रिम कोर्टात दाद मागून लढा यशस्वी करणाऱ्या लढाऊ नेत्या होत्या. तसेच जासूद या मासिकाच्या ही संपादिका होत्या. त्यांनी मार्क्सवादाशी व कम्युनिस्ट चळवळीशी संबंधित अनेक पुस्तके अनुवाद केली होती. माओ यांचे पाच सिद्धान्त, लेनिन पत्नी क्रृपस्कायाचे चरित्र, स्टॅलिन चे चरित्र आदी त्यांची गाजलेली पुस्तके होती. त्या वर्तमानपत्रात लेखनही करीत असत.
कॉम्रेड नवलकर यांनी ॲड. के. के. सिंघवी यांच्या सहकाऱ्याने एअर इंडियाच्या हजारो कंत्राटी कामगारांना कायम नोकरीची हमी मिळवून दिली. मुंबईतील कामगार संघटना कृती समिती तर्फे त्यांचा त्यांच्या इच्छे विरोधात गौरव समारंभही झाला होता. त्यानंतर त्या म्हणाल्या होत्या, ” हे ट्रेड युनियनचे नेते माझ्या शवपेटीवर शेवटचा खिळा मारायला निघालेत, पण मी अशी मरणार नाही, अरे सत्कार कसला करताय, आपल्याला समाजसत्तावाद आणण्यासाठी अजून लढायचे बाकी आहे.” एवढा समाजसत्तावाद आणण्यासाठी त्यांच्यात दुर्दम्य आशावाद मला शेवट पर्यंत पहायला मिळाला. अशी भावना ज्येष्ठ नेते सुबोध मोरे यांनी व्यक्त केली.
“ज्येष्ठ व लढाऊ कम्युनिस्ट नेत्या कॉ. सुंदर नवलकर यांना भेटण्याचे पूर्वी काही प्रसंग आले, तेव्हा त्यांच्या साम्यवादी ध्येयनिष्ठेची आणि लढाऊपणाची प्रकर्षाने प्रचिती आली. त्या संपादक असलेल्या ‘जासूद’चे अंक आणि इतर प्रकाशनांच्या त्यांनी मला खूप आस्थेने दिलेल्या प्रती मी अजून जपून ठेवल्या आहेत. आपल्या पक्षाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय कमिटीचे माजी सदस्य कॉ. के. एल. बजाज यांनी पूर्वी कॉ. सुंदरताईंसोबत कामगार चळवळीत काम केले होते. त्या गेल्याने एका जुन्या व असामान्य कम्युनिस्ट पिढीचा अस्त झाला आहे, अशी दु:खद भावना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ. अशोक ढवळे यांंनी व्यक्त केली.