भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहासप्रमाणेच आदिवासी क्रांतिकारकांचा इतिहास महत्त्वाचा आहे. सातपुडा प्रदेश हा प्रामुख्याने भिल्ल प्रदेश म्हणून ओळखला जातो. त्यात राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेशातील पर्वतरांगा विंध्य आणि अरवली पर्वताचा भाग, महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव आणि औरंगाबाद जिल्ह्यातील सातपुडा आणि अजिंठा पर्वतरांगांचा समावेश होतो. तापी आणि नर्मदा नद्यांच्या मधील प्रदेश ‘भिलवाडा प्रदेश’ म्हणून ओळखला जातो. सातपुडा, सातमाळा, अजिंठ्याच्या डोंगरातील अनेक भिल्ल नायकांनी इंग्रजांविरुद्ध प्रखर लढा दिला. यात भीमा नाईक, तंट्या मामा भिल, भागोजी नाईक आणि कजरसिंग नाईक भिल्लांच्या संघर्ष भारतीय लढ्यातील काही सोनेरी पाने आहे.
तंट्या मामाचा जन्म इ. स. १८४२मध्ये मध्य प्रांतातील निमाड जिल्ह्यातील (आताचा खंडवा जिल्हा) बिरडा गावात झाला. तंट्या मामांनी लहानपणापासूनच धनुष्यबाण चालविणे, भालाफेक करणे ही भिल्लांची पारंपारिक विद्या आत्मसात केली. माणूस म्हणून शांत जीवन जगण्याची धडपड करणाऱ्या तंट्या मामाला आदिवासींची जमीन हडप करणारे, शोषण, अन्याय करणारे इंग्रज, सावकार, जमीनदार, मालगुजार, पोलीस अन सर्वच शासन यंत्रणेने जगणे असह्य केले. या अन्यायाविरुद्ध लढा सुरू केला.त्यांनी पोलिसांच्या वेशात दरोडा टाकणे सुरू केले. हरसवरा गावांत सावकार, बनिया गरीब शेतकऱ्यांची पिळवणूक करीत होते. १७ जानेवारी १८८० रोजी तंट्या मामानी गरीबांची पिळवणूक करणाऱ्या बनियाची दुकाने लुटली. तंट्या मामांनी एका महिन्यात अठरा ठिकाणी सावकार, मालगुजार, बनियांना लुटले.
तंट्या मामा यांच्या सावकारांविरूद्ध कारवाईमुळे भिल्लांची हिंमत वाढू लागली आणि सावकारांच्या जुलमी जोखडातून मुक्ती देण्यासाठी जणू तंट्या मामा आलेला आहे अशी भावना सर्वत्र वाटू लागली. तंट्या मामांना भिल्ल लोक राजा समजू लागले. ब्रिटिशांचा दृष्टीने एक दरोडेखोर, चोर म्हणून नावारूपाला आला होता. परंतु निमाड, बेतुल, हौशंगाबाद, सातपुड्यातील पट्ट्यात शेतकरी आणि आदिवासींना मदत करणारा, रक्षणकर्ता अशी प्रतिमा तयार झाली होती. वर्षोनुवर्षे निवाड्याच्या भूमीन फक्त अन्यायच सहन केला होता. अनेक वर्षाचा इतिहासात निमाडमधील सर्वसाधारण गरीब शेतकरी श्रीमंत सावकार, मालगुजारांकडे सालदार नोकर म्हणून असलेला आदिवासीच असायचा. सावकारांकडे जानवरासारखं राबायचं. जनतेला लुटणाऱ्या सावकारांना धाक बसविण्याच काम तंट्या मामांनी सुरू केले. संपत्ती लुटून गरिबांना वाटणे, सावकारांकडेची गहाण जमीन सोडविण्यात मदत करणे, बैलजोडीसाठी मदत करणे, दुष्काळात सरकारी धान्यांचे ट्रक, रेल्वे वगनमधील धान्य लुटून गरिबजनतेला वाटणे. त्यामुळे तंट्या मामांची प्रतिमा अल्पकाळात जननायक अशी बनत गेली.
तंट्या मामा यांच्या लढा अन्याय, शोषण, विषमता दूर करण्याचा होता. त्यांच्या वागण्यातून सत्य, न्याय, दया आणि प्रेम ही तत्वे प्रकट होत होती. नैतिकतेची इमारत ज्या पायावर उभी असते तो निस्वार्थीपणा हा तंट्या मामा यांच्या जगण्याचा कणा होता. तंट्या एकलव्याचे वंशज होते. धनुष्यबाण मारण्याचे कौशल्य अप्रतिम होते. दुर्बलांचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी आपल्या शक्तीचा वापर केला. तंट्या मामांनी ४०० पेक्षा जास्त दरोडे घातले. इ. स. १८७८ ते १८८९ हा काळ तंट्या मामा यांच्या कर्तबगारीने विशेष गाजला. त्यांच्या धाडशी व लढाऊ वृत्तीमुळे लोक त्यांची तुलना रॉबिनहूडशी करू लागले.
ब्रिटिश अधिकाऱ्यांनी तंट्या मामा व साथीदारांना पकडण्यासाठी १०,५०० रूपये आणि पंधराचे एकरचा मालगुजारीचे बक्षीस जाहीर केले. तंट्या मामांना पकडण्यासाठी मध्य भारताचा गव्हर्नरचे विशेष अधिकारी सर लेपेल ग्रिफील यांनी आव्हान स्वीकारले. त्यासाठी ‘तंट्या पोलीस’ या स्वतंत्र सैन्यदलाची स्थापना करण्यात आली. या फौजेला ही यश मिळाले नाही. ११ऑगस्ट १८८९ रोजी रात्री तंट्या मामा गणपतसिहचा घरी आले. घरात लपून बसलेल्या पाच फौजीने तंट्या मामा आणि नकुला अटक केली. गणपतसिह या जवळचा माणसांनीच प्रचंड बक्षीसचा लालसेने खोटे बोलून पकडून दिले. २८ ऑगस्ट १८८९ रोजी जबलपूर जेलमध्ये आणण्यात आले. ४ डिसेंबर १८८९ रोजी या महान जननायकाला फाशी देण्यात आली.
राजेंद्र पाडवी,
नंदुरबार