Thursday, December 5, 2024
Homeराजकारणराजस्थान सरकार अडचणीत; सचिन पायलट भाजप अध्यक्षांची भेट घेण्याची शक्यता

राजस्थान सरकार अडचणीत; सचिन पायलट भाजप अध्यक्षांची भेट घेण्याची शक्यता

(जयपूर) : मध्यप्रदेश मध्ये सत्ता गमवावे लागलेल्या काँग्रेसच्या राजस्थान मधील सरकारच्या भवितव्यावरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. राजस्थान चे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी बंडाचे निशाण हाती घेतल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.  मागील काही दिवसांपासून ते मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर नाराज होते.

   दरम्यान, बंडखोरी केलेले पायलट हे भाजप मध्ये जाणार आहेत अश्या प्रकारच्या चर्चांना उधाण आले असतानाच स्वतः पायलट यांनी मात्र याला नकार दिला असून आपण भाजप मध्ये जाणार नाही, असं स्पष्ट केले आहे. सचिन पायलट यांनी आपल्याला पक्षातील ३० आमदारांचा पाठिंबा असून काही अपक्ष आमदारांचा ही पाठिंबा असल्याचे म्हंटले आहे. तसेच त्यामुळे आता अशोक गेहलोत सरकार अल्पमतात असल्याचा दावा ही त्यांनी केला आहे.

     काँग्रेस पक्षाने मात्र पायलट यांचा हा दावा फेटाळून लावला असून आपल्याकडे १०९ आमदारांचा पाठिंबा असून सरकार मजबूत असल्याचा दावा केला आहे. याबाबत पक्षाने रात्री उशिरा पत्रकार परिषद घेऊन पक्षातील सर्व आमदारांचा मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या व पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे, असं सांगितलं आहे.

    रविवारी सचिन पायलट हे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना भेटण्यासाठी दिल्लीला गेले होते. मात्र त्यांनी पायलट यांना परत जयपूरला जाण्यास सांगितले तसेच अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास सांगितले आहे. पक्षाच्या हाय कमांड ने मुख्यमंत्री गेहलोत यांना पाठिंबा दर्शविला आहे.

     हा सर्व घटनाक्रम पाहता सचिन पायलट हे भाजप मध्ये न जाता नवा पक्ष स्थापन करणार असल्याची देखील चर्चा आहे. असं जर झालं तर राजस्थान मध्ये तिसरी आघाडी अस्तित्वात येईल अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय