Friday, December 27, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडरेल्वेमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा- अजित गव्हाणे यांची मागणी

रेल्वेमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा- अजित गव्हाणे यांची मागणी

ओडिशा रेल्वे अपघातातील मृतांना शहर राष्ट्रवादीकडून श्रद्धांजली

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : दि. ०३
– ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात झालेल्या कोरोमंडल एक्सप्रेस, बंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्सप्रेस आणि मालगाडी यांच्यात धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात मरण पावलेल्या २८० पेक्षा जास्त प्रवाशांना पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. मृत प्रवाशांच्या परिवाराच्या दुःखात आपण सामील असल्याचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी एका पत्रकाद्वारे सांगितले. दरम्यान, या भीषण अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही अजित गव्हाणे यांनी केली.



पत्रकात पुढे गव्हाणे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या गाजावाजा करत सुरक्षा कवच योजना जाहीर केली होती. साल २०१६ नंतरचा हा सर्वात मोठा रेल्वे अपघात आहे. गेल्या सात वर्षांत एवढ्या मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाल्यानंतर पुन्हा एकदा रेल्वेच्या सुरक्षा कवच योजनेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आपली जाहिरातबाजी कमी करून देशभरात होणाऱ्या रेल्वे तसेच रस्ते अपघातांबाबत चिंतन करण्याची गरज आहे.



याआधी २०१६ मध्ये कानपूरमधील पुखरायनजवळ इंदूर-पाटणा एक्सप्रेस रुळावरून घसरली होती. या अपघातात १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. तर २०१२ मध्ये हुबळी-बंगलोर हम्पी एक्स्प्रेस अपघातात २५ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. शुक्रवारी ओडिशात झालेल्या भीषण अपघातात तर मृतांची आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे. सरकार फक्त लक्झरी गाड्यांवर लक्ष केंद्रित करत आहे. सर्वसामान्यांचे गाड्या आणि ट्रॅक दुर्लक्षित आहेत. ओडिशातील मृत्यू हा याचाच परिणाम आहे. रेल्वे प्रवासावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांच्या जीविताची किंमत कोण ठेवणार? असा संतप्त सवालही गव्हाणे यांनी पत्रकाद्वारे केला.


भाजप नेते शास्त्रीजींचा आदर्श घेतील काय?

ओडिशा येथील भीषण रेल्वे अपघातानंतर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी करतानाच अजित गव्हाणे यांनी माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांनी त्यांच्या कार्यकाळात घडलेल्या एका लहान अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून ताबडतोब पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता, या घटनेची आठवण करून दिली. भाजप नेत्यांमध्ये तेवढी नैतिकता आणि संवेदनशीलता आहे काय? असा सवालही गव्हाणे यांनी केला.

संबंधित लेख

लोकप्रिय