Friday, November 8, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC:हिंदू वीरशैव लिंगायत मंच,पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने निषेध सभा संपन्न.

PCMC:हिंदू वीरशैव लिंगायत मंच,पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने निषेध सभा संपन्न.

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:दि.११- कर्नाटक राज्यातील दावणगेरे येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभेच्या २४ व्या अधिवेशनात आगामी जनगणनेमधे धर्माच्या रकान्यात हिंदू शब्द लिहू नये, असे आवाहन केल्याचे निषेधार्थ महात्मा बसवेश्वर स्मारक, भक्ती शक्ती चौक निगडी येथे हिंदू वीरशैव लिंगायत मंच पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने निषेध सभा आयोजित केले होते.

भविष्यात होणाऱ्या जनगणना मध्ये धर्म या रकान्यात ‘हिंदू’ शब्द न लिहिण्याचा ठराव वीरशैव महासभेने कर्नाटकात संमत केले आहे. परिणामी जनगणनेसाठी गेलेला प्रगणक संबंधितांची नोंद O.R.P.(Other Religion in Persuasion – अन्य धर्मावलंबी ) किंवा R.N.S.(Religion Not Stated – धर्म सांगता येत नाही ) अशा रकान्यात नोंद होईल. त्यामुळे प्रत्यक्षात असूनही हिंदू अल्पसंख्याक असल्याचा आकडा समोर येईल. समाजात विद्रोह पसरवणाऱ्या, जाती-धर्मामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या संघटनेचा तीव्र शब्दात निषेध करीत वीरशैव लिंगायत समाज हा मूळ हिंदू आहे. त्यामूळे आगामी जनगणनेत हिंदु धर्म म्हणूनच नोंद करावी, तसेच वीरशैव लिंगायत समाजात फूट पडणाऱ्या फुटीरवादी संघटनेच्या विरोधात एकत्रित येऊन लढा उभारला जाईल. असे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष दानेश तिमशेट्टी यांनी आपल्या भाषणात सांगितले.

वीरशैव लिंगायत समाजाचा धर्म कोणता यावरून वाद निर्माण केला जात आहे, त्यावर आता पडदा पडला असून. जाणीवपूर्वक हिंदू धर्म आणि लिंगायत समाज याच्यात दरी निर्माण करण्यासाठी समाजकंटक अशा पद्धतीने धर्म वरून वाद निर्माण करत आहेत. लिंगायत समाजातील प्रत्येकाने हिंदू धर्म म्हणूनच नोंद करावी असे आवाहन महात्मा बसवेश्वर पुतळा समिती अध्यक्ष श्री नारायण बहिरवाडे यांनी केले.

वीरशैव लिंगायत समाज हा हिंदू समाजाचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. जी विद्या शिव म्हणजे लिंग आणि जीव म्हणजे अंग यांच्या ऐक्याचे ज्ञान करून देणारी आहे, त्या विद्येत जे शैव लोक रमतात ते वीरशैव होत. भगवान शंकराचे निस्सीम उपासक असलेल्या वीरशैव लिंगायत समाजाच्या पुनरुत्थानाचे युगप्रवर्तक कार्य केले ते महात्मा बसवेश्वरांनी. म्हणूनच त्यांना या पंथात अनन्यसाधारण महत्त्व आहे. तसेच वीरशैव मत संस्थापित करणार्‍या जगद्गुरू पंचाचार्यांनाही या पंथात अनन्यसाधारण महत्त्व आहे. अनेक हिंदू देवदेवतांच्या मस्तकावर, शरीरावर धारण केले गेलेले शिवलिंग हे वीरशैव तत्त्वज्ञान आणि विशाल हिंदू तत्त्वज्ञान यांच्या एकरूपतेचे प्रतीक आहे. खोलात जाऊन धांडोळा घेतला, तर एकरूपतेच्या अशा अनेक खुणा स्पष्टपणे आढळून येतात. वीरशैव लिंगायत व हिंदुस्थानात राहणाऱ्या प्रत्येक नागरिक हिंदूच आहे आणि त्यांनी होणाऱ्या जनगणने मध्ये धर्माचा राखण्यात हिंदूच लिहावे असे आवाहन शरद गंजीवाले यांनी केले.


प्रसंगी गुरुराज चरंतीमठ, एस बी पाटील, विजय जंगम, संजय गारुळे विश्वनाथ हिरेमठ, संजय मन्नूरकर, हेमंत हरहरे, सतीश गोरडे, शिवानंद चौगुले, अप्पा दिवाण, सुरेश वाळके, विजय बिराजदार, बी के हिरेमठ, राजेंद्र मैंदर्गीकर, शिवानंद पाटील, सिद्धाराम घोंगडे, विजयकुमार स्वामी, शिवपुत्र दरूर, आनंद बिराजदार, रवी पाटील, गुरुराज कुंभार, कृष्णा गोंडाळे, चंद्रकांत हलगे, अभिषेक चरंतीमठ, सुनील चौगुले, जयश्री पाटील, रागिनी बिराजदार, प्रमिला धरूर, आरती पाटील, लक्ष्मी स्पम्रानी आदी समाज बांधव, विविध संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते, पिंपरी चिंचवड शहरातील सुमारे १५० समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभेचे तीव्र शब्दात निषेध नोंदवत घोषणाबाजी करण्यात आली व निषेध पत्र पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील त्यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले.

संबंधित लेख

लोकप्रिय