भोसे (ता. मिरज) : येथील सुमारे ४०० वर्षे जुना वटवृक्ष हायवेसाठी तोडला जात आहे. हे झाड वाचविण्यासाठी काही पर्याय आहेत. मात्र त्या पर्यायांचा विचार झालेला दिसत नाही. यासाठी अभिनेते सयाजी शिंदे आणि अरविंद जगताप सर यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यापासून आंदोलन उभे केले जाणार आहे.
या झाडाखाली वाटसरूना अनेकदा आसरा मिळालेला आहे, आम्ही देखील एक वाटसरू या नात्याने हे झाड वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. या झाडाने गेल्या तीन चार शतकात कोट्यावधी रुपयांचा ऑक्सिजन दिला आहे. वडाशेजारचे मंदिर विनंतीने वाचविले गेले आहे, पण ज्या झाडात खरा देव आहे, त्या झाडाची मात्र कत्तल होणार आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
पांडुरंगाच्या दर्शनाला जाणाऱ्या शेकडो वारकऱ्यांना हा वटवृक्ष आज पर्यंत आसरा देत आला आहे. त्याने कधीही त्याचा मोबदला कोणाकडे मागितला नाही, पण हा वटवृक्ष आज आपल्याकडे मला वाचवा म्हणून न्याय मागतो आहे. या वटवृक्षाला वाचविणे तुमचे आमचे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. चला तर मग या आंदोलनात आपल्या परीने सहभागी व्हा! कोरोना मूळे गर्दी टाळून उद्या पासून हे आंदोलन सुरू होते आहे.