पिंपरी चिंचवड : भारत बंदसाठी राजकीय पक्ष आणि कामगार संघटना एकत्र आल्या आहेत. कैलास कदम यांच्या अध्यक्षतेखाली आकुर्डी येथे महाआघाडी आणि कामगार नेत्यांंचे जनतेला भारत बंदसाठी आवाहन केले आहे.
आंबेडकर चौकात दि. 8 रोजी महाधरणे आंदोलन करण्यात येणार आहे.शहरात बंद यशस्वी करण्यासाठी कामगार संघटना सर्व राजकीय पक्ष शहरातून मिरवणुका काढून पिंपरी येथे येतील असे कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष कैलास कदम यांनी आज (दि.6) आकुर्डी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
पिंपरी चिंचवड शहर आणि औद्योगिक परिसरात दिल्ली किसान आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, इंदिरा कॉग्रेस सहित दोन्ही कम्युनिस्ट पक्षांनी भारत बंद मध्ये नागरिक, कामगार आणि व्यापाऱ्यांनी सामील व्हावे, असे आवहान केले आहे.
पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी कॉगेस पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, शिवसेनेचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार, कॉग्रेस कैलास कदम, शाम आगरवाल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे गणेश दराडे, क्रांतिकुमार कडुलकर, अपर्णा दराडे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अनिल रोहम, शेतकरी कामगार पक्षाचे नितीन बनसोडे, छाया देसले, मानव कांबळे, सचिन देसाई, स्वप्नील जेवळे, मारुती भापकर, दिलीप पवार, गजानन चिंचवडे, भाई विशाल जाधव, संतोष रणसिंग, ऍड.चंद्रशेखर भुजबळ आदी उपस्थित होते.
भारत बंद यशस्वी करण्यासाठी 40 संघटना सहभागी होणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. यावेळी स्वराज अभियान, सिटू, आयटक, बजाज कामगार संघटना, राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघ, डीवायएफआय, घरकामगार संघटना, आरपीआय, प्रहार संघटना, छावा संघटना, शिवशाही व्यापारी संघ, महात्मा फुले समता परिषद, समाजवादी पक्ष, नागरी हक्क सुरक्षा समिती, बारा बलुतेदार संघ आदीसह संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.