Thursday, May 2, 2024
HomeNewsPCMC:‘वाहतूक कोंडीमुक्त तळवडे’’च्या दिशेने आश्वासक ‘पाऊल’

PCMC:‘वाहतूक कोंडीमुक्त तळवडे’’च्या दिशेने आश्वासक ‘पाऊल’

– त्रिवेणीनगर चौक ते तळवडे रस्त्याची निविदा प्रसिद्ध

– भाजपा आमदार महेश लांडगे यांचा पाठपुरावा


पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:तळवडे आणि त्रिवेणीनगर या अत्यंत वर्दळीच्या रस्त्याला पर्यायी रस्ता होणार असून, या भागातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. महापालिका प्रशासनाने त्रिवेणीनगर चौक ते तळवडे गावठाण या रस्त्याच्या कामासाठी निविदा प्रसिद्ध केली आहे. हे वाहतूक कोंडीमुक्त तळवडेच्या दिशेने प्रशासनाचे आश्वासक ‘पाऊल’ ठरणार आहे. यासाठी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी पाठपुरावा केला आहे.
तळवडेतील वाहतूक कोंडी आणि नियोजनाअभावी झालेल्या अपघातामध्ये गेल्या तीन महिन्यांमध्ये चार अपघात झाले असून, दोन निष्पाप नागरिकांना प्राण गमवावा लागला आहे. त्यामुळे महापालिका विकास आराखड्यातील डी.पी. रस्ते तात्काळ मार्गी लावावेत, अशी मागणी जोर धरु लागली होती.

दरम्यान, आमदार महेश लांडगे यांनी चिखली आणि तळवडे परिसरातील एकूण सात रस्ते विकसित करण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला होता.त्यापैकी ४ रस्ते चिखली आणि ३ रस्ते तळवडेतील होते.तळवडेतील त्रिवेणीनगर चौक ते तळवडे चौकापर्यंत २४ मीटर रुंद रस्ता, तळवडे कॅनवे चौक ते निगडी स्पाइन रस्त्याला जोडणारा १८ मीटर रस्ता आणि इंद्रायणी नदीच्या कडेने जाणारा १२ मीटर रस्ता व चिखली तळवडे शिवेवरील २४ मीटर रस्ता मार्गी लावण्याबाबत आमदार लांडगे यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी राजेश देशमुख आणि महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यासोबत बैठक घेतली होती.

माजी नगरसेवक शांताराम भालेकर म्हणाले की, वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या मालिकांमुळे स्थानिक नागरिक, ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी होती. त्यामुळे विकास आराखड्यातील रस्ते पूर्ण करावेत आणि वाहतूक सक्षमीकरणासाठी उपाययोजना कराव्यात यासाठी वारंवार आम्ही पाठपुरावा केला आहे.मात्र,तळवडे कॅनवे चौक ते निगडी रस्त्याला संरक्षण विभागाने हरकत नोंदवली आहे.तसेच, इंद्रायणी नदीच्या कडेने जाणारा १२ मीटर रस्ता व चिखली तळवडे शिवेवरील रस्त्यासाठी भूसंपादन प्रक्रियेतील अडथळ्यांमुळे विलंब होत आहे,अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली.तसेच, तळवडेतील त्रिवेणीनगर चौक ते तळवडे चौकापर्यंत २४ मीटर रुंद रस्त्यासाठी निविदा प्रसिद्ध केली असून, लोकसभा निवडणूक आचार संहितेपूर्वी सदर रस्त्याचे भूमिपूजन केले जाईल, अशी शक्यता आहे.

प्रतिक्रिया :

तळवडे औद्योगिक पट्टा आणि निवासी क्षेत्रातील वाहतूक कोंडी आणि अपघातांची वाढती संख्या हा चिंताजनक मुद्दा बनला होता. त्यासाठी प्रस्तावित रस्ते मार्गी लावण्याबाबत जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांची बैठक घेतली होती. त्याला यश मिळाले. ३ रस्ते प्रस्तावित होते,संरक्षण विभागाकडील तांत्रिक अडचणी आणि भूसंपादन प्रक्रिया यामधील अडथळ्यांमुळे दोन रस्ते अद्याप प्रलंबित आहेत. त्यासाठी आगामी काळात प्रभावीपणे पाठपुरावा करणार आहोत. तळवडेतील त्रिवेणीनगर चौक ते तळवडे चौकापर्यंत २४ मीटर रुंद रस्त्याचे काम आता प्रशासनाने तात्काळ हाती घ्यावे, अशी अपेक्षा आहे.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय