Friday, November 8, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : पुढील वर्षी तरी, महापालिकेने सुसज्ज पवना नदी घाट छठपूजेसाठी उपलब्ध...

PCMC : पुढील वर्षी तरी, महापालिकेने सुसज्ज पवना नदी घाट छठपूजेसाठी उपलब्ध करून द्यावा”..

उत्तर भारतीय बांधवांची छठ देवतेकडे प्रार्थना. (PCMC)

चिंचवडच्या पवना नदी घाटावर ” जय छठमाता ” च्या गजरात छठपूजा उत्सव संपन्न…

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : चिंचवडगावातील पवना नदी घाटावर हनुमान मित्र मंडळ आणि छठ पूजा समिती आयोजित उत्तर भारतीयांचा दोन दिवसीय छठपूजा उत्सव दिमाखात साजरा झाला. घाटावर भव्य गंगा आरती आणि पूजा, भजन, छट लोकगीत असे विविध धार्मिक, सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर करण्यात आले होते. भाविकांच्या ” जय छठमाता ” च्या गजराने वातावरण प्रसन्न झाले होते. (PCMC)

यावेळी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी येथील भाविकांना मतदान करण्याची शपथ दिली आणि निवडणूक जनजागृती केली.

बिहारच्या दिवंगत प्रसिद्ध गायिका शारदा सिन्हा यांना सर्वप्रथम श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी छठ पूजा समितीचे कार्याध्यक्ष विजय गुप्ता, मुंबईचे राजेश जैस्वाल, शहर भाजपचे राम वाकडकर, सामाजिक कार्यकर्ते खंडूशेठ चिंचवडे, महापालिकेचे अधिकारी आणि पोलीस प्रशासन उपस्थित होते. (PCMC)

या उत्सवात मोठ्या संख्येने उत्तर भारतीय कुटुंबांनी गुरुवारी (दि. ७) रोजी भक्तिभावाने सुर्योपासना केली. तसेच अखेरच्या दिवशी शुक्रवारी (दि. ८) रोजी सकाळी पवनामाईच्या पाण्यात उभे राहून सूर्यदेव बाहेर येण्याची पूर्ण भक्तिभावाने वाट पहिली. सूर्योदय झाल्यावर छठ मैयाचा जप करून सूर्याला अर्घ्य दिले. शेवटी दूध पिऊन व प्रसाद खाऊन आपला उपवास सोडला.

भाविकांनी गुरुवारी सायंकाळी सूर्यास्ताच्या अगोदरच छटमाईची पूजा मांडत तिथे विधिवत पूजा केली होती. या मांडणीमध्ये चारही बाजूने ऊस पुळणीत रोवून उसाचा मांडव करून त्यामध्ये पाण्याने भरलेला कलश ठेऊन त्यावर दिवा पेटवला. त्यावर विटाची मांडणी करून पूजेची मांडणी केली होती. त्यासमोर खवा, गव्हाचं पीठ आणि तुपापासून बनवलेला प्रसाद आणि फळं यांचा नैवेद्य दाखविण्यात आला होता. सूर्याचा अस्त होताना महिलांनी गाईच्या दुधाचे अर्घ्य दिले होते.

आपल्या कुटूंबाला सुख, समृध्दी, आरोग्य, ऐश्वर्य लाभावे यासाठी उत्तर भारतीय महिला सूर्याची उपासना म्हणून छटपुजेचे व्रत करतात. सर्व मनोकामना पूर्ण करणारे हे व्रत असल्याची प्राचिन काळापासूनची श्रध्दा असल्याचा अनुभव येथील भाविकांनी सांगितला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी छठ पूजा समिती अध्यक्ष जितेंद्र क. गुप्ता, कार्याध्यक्ष शशिकांत श्रीवास्तव, उपाध्यक्ष देवानंद आर. गुप्ता, सचिव अशोक डी. गुप्ता, सदस्य जितेंद्र जे. गुप्ता, प्रेम शंकर राय फिल्म प्रोड्युसर, विकास मिश्रा अध्यक्ष, पूर्वाचल विकासमंच, मुन्ना डी. गुप्ता, अनिल एस. गुप्ता, उमा के. गुप्ता, सचितानंद मिश्रा, टी. एन. तिवारी, सुभाष एम. गुप्ता, श्यामसुंदर गुप्ता, मदन आर. गुप्ता, पप्पु डी. गुप्ता, सुजित एम. गुप्ता, शंकर गुप्ता, शंभू गुप्ता, रमेश गुप्ता, भोला बी. गुप्ता, मनोज आर. गुप्ता, राजेश जे. गुप्ता, विनोद गुप्ता, संतोष गुप्ता आदींनी परिश्रम घेतले.

महापालिकेने छठ पूजेसाठी आता घाटाचा विस्तार करावा.

”हिंदू शास्रानुसार छठपूजेला सूर्यछठ अथवा छठपर्व म्हणतात. हा दिवस भगवान सूर्य नारायणाला समर्पित आहे. गेल्या २० ते २५ वर्षांपासून आम्ही या ठिकाणी छटपूजेचा उत्सव साजरा करत आहोत. महापालिका, पोलीस प्रशासन आणि स्थानिकांचे देखील सहकार्य या कार्यक्रमास नेहमीच असतं. उत्तर भारतीय नागरिकांची शहरात संख्या वाढली आहे. छठ पूजा कार्यक्रमास चिंचवडगावातील पवना नदी घाट अपुरा पडत आहे. त्यामुळे या घाटाचा विस्तार होणे गरजेचे आहे. पालिका प्रशासनाने हे काम जलदगतीने हाती घ्यावे. पुढील वर्षी तरी, आम्हाला महापालिकेने सुसज्ज पवना नदी घाट छठपूजेसाठी उपलब्ध करून द्यावा, अशी प्रार्थना यानिमित्ताने आम्ही देवाकडे केली.”
विजय गुप्ता, कार्याध्यक्ष – छठ पूजा समिती

संबंधित लेख

लोकप्रिय