सांगली : रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 बाधीत शेतकर्यांच्या बाधीत क्षेत्रात झालेल्या पुनः सर्वे च्या निवाडा नोटीस तातडीने द्यावे व शिरढोण तालुका कवठेमहांकाळ येथे नव्याने बाधीत शेतकर्यांच्या निवाडा नोटीस तातडीने द्यावे, या मागणीसाठी किसान सभेच्या वतीने गेली 27 दिवस धरणे आंदोलन सुरू आहे. त्याच बरोबर गेली 8 दिवस साखळी उपोषण सुरू आहे.
फेब्रुवारी 2020 ला राजपत्र झालेल्या महामार्गासाठी अतिरिक्त जमिनी बाधीत होत असल्याने किसान सभेच्या मागणीप्रमाणे सर्वे करण्यात आला. मिरज तालुक्यातील 50 व कवठेमहांकाळ तालुक्यातील 41 गट नंबर पैकी फक्त दोनच निवाडा नोटीस मिळाल्या आहेत. उर्वरीत निवाडा नोटीस तातडीने द्या त्याच बरोबर नव्याने बाधीत अतिरिक्त क्षेत्राचा सर्वे करा, या सर्व बाधीत शेतकर्यांच्या मागण्या असल्याचे अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड दिगंबर कांबळे यांनी आमदार सुमनताई पाटील यांना सांगितले.
यावेळी आमदार सुमनताई पाटील म्हणाल्या, प्रांत अधिकाऱ्यांसोबत याबाबत चर्चा झाली आहे. लवकरच सर्व नोटीसा दिला जातील. तसेच मंगळवारी एकत्रित बैठक घेऊयात, तोपर्यंत आंदोलन स्थगित करावे, असेही आ. पाटील म्हणाल्या.
जोपर्यंत बाधित शेतकर्यांच्या संपूर्ण निवाडा नोटीस मिळणार नाहीत, तो पर्यंत आंदोलन स्थगित करणार नाही. प्रशासनाकडून लिखित पत्र आल्यास चर्चेला येण्यास तयार आहे, असे किसान सभेचे जिल्हा सरचिटणीस दिगंबर कांबळे म्हणाले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कवठेमहांकाळ तालुका अध्यक्ष टि. व्ही. पाटील, दिग्विजय खानविलकर, सर्कल गब्बरसिंग गारळे व बाधीत शेतकरी उपस्थित होते.